चीनने हाँगकाँगमध्ये लोकशाहीचा आणखी एक आवाज दाबला आहे. अॅपल डेली वृत्तपत्राचे संस्थापक पत्रकार जिमी लाई २०२० पासून चीनच्या तुरुंगात आहेत. हाँगकाँगच्या लोकशाहीचे समर्थक मीडिया टायकून जिमी लाई यांच्यावर चीन सरकारानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा आरोप ठेवला आहे. ( Jimmy Lai )
जिमी लाई यांनी इतर देशांना हाँगकाँग आणि चीनविरुद्ध कारवाई करण्यासाठी चिथावणी दिल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिमी लाई यांना जन्मठेपेची शिक्षा मिळण्याची शक्यता आधिक आहे. पत्रकार जिमी लाई गेल्या पाच वर्षांपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. जिमी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांना अमेरिकेसह अन्य देशांचा पाठिंबा आहे. मात्र जिमी यांची चीनच्या न्यायालयातून सुटका होईल, अशी आशा धूसर आहे.

७८ वर्षीय ब्रिटिश नागरिक आणि पत्रकार जिमी लाई यांच्यावर चीनमध्ये चालू असलेला खटला अंतिम टप्प्यात आला आहे. चिमी लाई आणि त्यांच्या सह-आरोपींना शिक्षा सुनावण्याबाबत हाँगकाँगच्या न्यायालयाने युक्तिवाद ऐकले आहेत. यानंतर जिमी लाई यांच्या शिक्षेची सुनावणी होणार आहे. ( Jimmy Lai )
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास जिमी यांना जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता अधिक आहे. ७८ वर्षीय लाई हे अॅपल डेली वृत्तपत्राचे संस्थापक होते. २०२१ मध्ये, पोलिसांनी त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर, अनेक वरिष्ठ पत्रकारांना अटक केली. सोबतच पत्रकारांची मालमत्ताही जप्त केली. त्यानंतर अॅपल डेली वृत्तपत्र अखेर बंद करण्यात आले.
जिमी लाई हे हाँगकाँगच्या लोकशाहीचे समर्थक मीडिया टायकून मानले जातात. त्यांचे समर्थक त्यांना स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीकही मानतात. बीजिंगमध्ये त्यांच्यावर २०१९ च्या निदर्शनांचा सूत्रधार आणि हाँगकाँग आणि चीनविरुद्ध अमेरिकेच्या निर्बंधांना चिथावणी देणारा असल्याचा आरोप आहे. ( Jimmy Lai )
सोबतच जिमी लाई हे पहिल्यापासून चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यांना २०२० मध्ये बीजिंगने लागू केलेल्या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. तेव्हापासून जिमी तुरुंगात आहेत. देशाच्या हिताविरोधात अन्य देशांबरोबर मैत्री करुन कट रचल्याबद्दल आणि देशाविरुद्ध लेख प्रकाशित केल्याबद्दल जिमी यांच्यावर मग खटला चालवण्यात आला.
जिमी यांच्यावरील या खटल्यावर जगभरातील पत्रकारांचे लक्ष आहे. जिमी यांच्या अटकेवर अनेक देशांनी चीनवर टीका केली आहे. त्यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी या देशांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही जिमी लाई यांना अटक झाल्यावर चीनच्या दडपशाहीवर टीका केली. तसेच त्यांना शिक्षा झाल्यास पत्रकारिकेतील काळा दिवस असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी यासंदर्भात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा केल्याचीही माहिती आहे. सोबतच ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर हे सुद्धा जिमी यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील आहेत. ( Jimmy Lai )

जिमी लाई हे किती लोकप्रिय आहेत, याची झलक त्यांच्यावर चालू असलेल्या खटल्याच्यावेळीही मिळाली. जिमी यांचा खटला सुरु झाल्यावर अनेक नागरिक न्यायालयात बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून रांगेत उभे असायचे. मात्र या सर्वांमुळे जिमी यांच्यावरील आरोप आणि त्यांनी केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही, असे चिनी सरकारनं स्पष्ट केलं होतं, त्यामुळेच जिमी यांना कठोर शिक्षा मिळणार असा अंदाज आहे. ( Jimmy Lai )
जिमी यांच्यावर राष्ट्राच्या सुरक्षेला बाधा येईल, असे पुस्तक लिहिल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुरक्षा कायद्याअंतर्गत सहभागाच्या आरोपात त्यांना दोषी ठरवल्यास तीन वर्ष ते जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यांच्या खटल्याच्यावेळी न्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे की, जिमी यांनी त्यांच्या तरुणपणापासून चिनी सरकारविरोधात संताप आणि द्वेष बाळगला होता.
=======
हे देखील वाचा : Chinese Funerals : चीनमध्ये लक्झरी अंत्यसंस्काराचे फॅड
=======
हाँगकाँगच्या लोकांना मदत करण्याच्या नावाखाली, त्यांनी वारंवार अमेरिकेला भेट देऊन चीन सरकार उलथवून टाकण्यासाठी मदत मागितली. हे कॅलिफोर्निया राज्याला मदत करण्याच्या नावाखाली अमेरिकन सरकार उलथवून टाकण्यासाठी रशियन मदत मागणाऱ्या अमेरिकन नागरिकासारखे असल्याचे मत न्यायालयानं नोंदविले आहे. ( Jimmy Lai )
जिमी लाई गेल्या पाच वर्षापासून तुरुंगात असून त्यांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यांना ह्दयासंबंधी काही आजार आहे. जिमी लाई यांच्या सुटकेसाठी त्यांचा मुलगा सेबस्टियन लाई हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दाद मागत आहे. मात्र या सर्वात जिमी यांची सुटका होईल, याबाबत कुठलाही मार्ग सध्यातरी दिसत नाही.
सई बने
