Home » जेष्ठा आणि कनिष्ठा गौरी कथा

जेष्ठा आणि कनिष्ठा गौरी कथा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Jeshtha Gauri Katha
Share

आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा.

सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा, बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील! बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरीबापुढं उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला.

अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं.

बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्‍यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हतारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रडगाण काही गाऊ नको.

Jeshtha Gauri Katha

ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अंग अंग, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली.. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं: ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर गेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं.

ब्राह्मण म्हणाला, आजी आजी, दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांच दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणांने त्यांचं दूध काढलं.

दुसर्‍या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला, मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही.

======

हे देखील वाचा : जाणून घ्या जेष्ठा आणि कनिष्ठा गौरीबद्दल

======

ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग! गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देई, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही.

ब्राह्मणानं बरं म्हटल. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. जेष्ठागौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. सतत संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.