हमाम मे सब नंगे…. ही एक लोकप्रिय उर्दू म्हण आहे. याचा सरळ, सोप्पा अर्थ आहे. जेव्हा सगळेच एकाच चुकीच्या किंवा वाईट गोष्टीत गुंतलेले असतात तेव्हा कोणीही कोणालाही दोष देऊ शकत नाही. सध्या हिच म्हण अमेरिकेतील जेफ्री एपस्टाईन फाईलबाबत म्हणावी लागत आहे. लैंगिक गुन्हेगार असलेला जेफ्री आता हयात नसला तरी त्यानं अमेरिका आणि युरोपमधील सर्वच बड्या धेंडांच्या काळ्या कृत्याचा जो रेकॉर्ड ठेवला आहे, त्यालाच आता कुप्रसिद्ध जेफ्री एपस्टाईन फाईल म्हणून ओळखले जात आहे. याच फाईलमधील नवीन कागदपत्रांमुळे अमेरिकेत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने अलीकडेच एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित ३ दशलक्षाहून अधिक पानांचे कागदपत्रे जाहीर केली आहेत. त्यात २,००० व्हिडिओ आणि १८०,००० छायाचित्रे आहेत. ( Epstein Files )

या नवीन कागदपत्रांमध्ये न्यू यॉर्क शहराच्या महापौर जोहरान ममदानीच्या आई आणि चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांचेही नाव आहे. शिवाय बिल गेस्ट यांचे रशियन तरुणींसोबत असलेले संबंध उघड झाले आहेत. सोबतच ब्रिटनचे राजे चार्ल्स याचे भाऊ प्रिंस एंड्रयू यांचे रशियन तरुणींसोबतची आक्षेपार्ह छायाचित्रही जाहीर करण्यात आली आहेत. एलोन मस्क, बिल क्लिंटन, घिसलेन मॅक्सवेल यांच्याबाबतही नवीन माहिती समोर आली आहे. म्हणूनच एपस्टाईन फाईल म्हणजे, हमाम मे सब नंगे अशीच चर्चा अमेरिकेत सुरु झाली आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनार्ड ट्रम्प यांचेही नाव या फाईल मध्ये आहे. मात्र आता जी कागदपत्रे जाहीर झाली आहेत, त्यातून ट्रम्प यांचे नाव आश्चर्यरित्या गायब झाले आहे. त्यामुळे ट्रम्प आता या एपस्टाईन फाईलचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन घेत असल्याचे उघड झाले आहे.
अमेरिकेतील जेफ्री एपस्टाईनशी संबंधित नवीन कागदपत्रांमध्ये काही नवीन नावं जोडली गेली आहेत. यावेळेच्या फाईलमध्ये सर्वात गाजत असलेले नाव चित्रपट दिग्दर्शक मीरा नायर यांचे आहे. मीरा नायर या न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या आई आहेत. या कागदपत्रांमध्ये दावा करण्यात आला आहे की, मीरा नायर २००९ मध्ये अमेलिया चित्रपटाच्या आफ्टर-पार्टीला उपस्थित होत्या. धक्कादायक म्हणजे, ही लैंगिक तस्करी प्रकरणी दोषी ठरलेल्या घिसलेन मॅक्सवेलच्या घरी आयोजित करण्यात आली होती. घिसलेन ही जेफ्री एपस्टाईन याची मैत्रिण असून एफ्री यांनी तरुणींवर जो लैंगिक अत्याचार केला, त्यात या घिसलेनने त्याला सहकार्य केले होते. घिसलेन सध्या तुरुंगात असून तिचे आणि मीरा नायरचे जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहेत. ( Epstein Files )
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या आई, मीरा नायर यांच्यासंदर्भातील माहिती २१ ऑक्टोबर २००९ रोजी पेगी सिगल यांनी जेफ्री एपस्टाईन यांना पाठवलेल्या ईमेलमधून समोर आली आहे. पार्टीनंतर सकाळी हा ईमेल पाठवण्यात आला होता. त्यात माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांच्यासह पार्टीला उपस्थित असलेल्या अन्य पाहुण्यांची यादीही आहे. याच मेलमध्ये पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांना मीरा नायरचा चित्रपट फारसा आवडला नसल्याचेही नमूद कऱण्यात आले आहे. त्यानंतरच्या कागदपत्रात टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचे नाव आले आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये, एपस्टाईनने मस्क यांना एक ईमेल पाठवला असून “हेलिकॉप्टरने बेटावर किती लोक येणार आहेत?”असा प्रश्न विचारला आहे. या मेलला मस्कने २५ नोव्हेंबर २०१२ रोजी उत्तर दिले. त्यात “कदाचित फक्त मी आणि तल्लुला”, असे सांगून “तुमच्या बेटावर सर्वात भव्य पार्टी कोणत्या दिवशी किंवा रात्री असेल?” हा प्रश्नही विचारला आहे.
=======
हे देखील वाचा : United States–Iran war : चारही बाजूंनी इराणला अमेरिकेचा वेढा
=======
या फाईलमधून अशा अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत, त्यातून अमेरिकेतील उच्चपदस्थांच्या चेह-यावरील बुरखा फाटला आहे. त्यात बिल गेट्स यांचेही नाव आहे. नवीन फाइल्समधील काही ईमेलनुसार मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे रशियन महिलांशी संबंध होते. त्यातून गेट्स यांना लैंगिक आजार झाला. गेट्स यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांना याबाबत माहिती असल्याचा दावाही २०१३ मध्ये पाठवलेल्या मेलमध्ये करण्यात आला आहे. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष केसी वासरमन यांचेही नाव एपस्टाईन फाईलमध्ये आले आहे. ते या प्रकरणातील मुख्य संशयित घिसलेन मॅक्सवेलशी चॅट करत होते. १ एप्रिल २००३ रोजी चे चॅट असून तेव्हाच वासरमनची पत्नी आठ महिन्यांची गर्भवती होती असल्याचेही यात सांगण्यात आले आहे. वासरमन यांनी एपस्टाईनसोबत आफ्रिकेलाही प्रवास केल्याचेही उघड झाले आहे. ( Epstein Files )
अमेरिकेच्या न्याय विभागानं एपस्टाईनशी संबंधित ३ दशलक्षाहून अधिक पृष्ठांची यादी जाहीर केली आहे. त्यात २,००० हून अधिक व्हिडिओ आणि अंदाजे १८०,००० छायाचित्रे देखील आहेत. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आहे. २०२१ च्या एफबीआय मेमोमध्ये घिसलेन मॅक्सवेलने ट्रम्पशी एका तरुणीची ओळख करून दिल्याचा उल्लेख आहे. या तरुणीला मार-ए-लागो येथे आमंत्रित करण्यात आले होते. याच कागदपत्रांमध्ये मेलानिया ट्रम्प, हॉवर्ड लुटनिक, प्रसिद्ध गायिका लिसा मेरी प्रेस्ली, माजी फ्रेंच मंत्री जॅक लँग, ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांचीही नावे आणि छायाचित्रे आहेत.

दरम्यान एपस्टाईन फाईल्समधील नावांनी जेवढी खळबळ उडवून दिली आहे, तेवढीच या फाईल्सचा वापर ट्रम्प स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करत असलेल्या आरोपानं होत आहे. एपस्टाईनशी संबंधित 16 फायली रिलीज झाल्यानंतर 24 तासांच्या आत त्या लायब्ररीतून गायब झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये ट्रम्प यांच्याबाबत खुलासे असल्याची शक्यता आहे. ज्या फायली गायब झाल्यात त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव शेकडो वेळा असल्याचा आरोप आहे. या सर्वांत प्रमुख गुन्हेगार असलेला जेफ्री एपस्टाईन याचे २०१९ मध्ये तुरुंगात लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली खटला सुरू असताना निधन झाले आहे. त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल ही तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र या दोघांनी केलेल्या काळ्याकृत्यांमध्ये अमेरिका, युरोपचे नेते, राजघराण्यातील सदस्य आणि प्रतिष्ठीत उद्योगपती आणि चित्रपट तारकांचा समावेश आहे. आता त्यांच्याही चेह-यावरील बुरखा फाटत असून हायप्रोफाईल वर्तुळाचे वास्तव उघड होत आहे. ( Epstein Files )
सई बने
