Home » Jeffrey Epstein file : या एपस्टाईन फाईलमध्ये जगभरातील राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती !

Jeffrey Epstein file : या एपस्टाईन फाईलमध्ये जगभरातील राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती !

by Team Gajawaja
0 comment
Share

अमेरिकेसह युरोपमध्ये दबक्या आवाजात सध्या एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे, जेफ्री एपस्टाईन याचे. कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित जुने सरकारी रेकॉर्ड दोन दिवसातच जाहीर होण्याची शक्यता आहे. १९ डिसेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासह ही फाईल, जाहीर करणार आहे. या फाईलमधील सर्वात वरचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांचेच आहे, त्यामुळे ही एपस्टाईन फाईल पूर्णपणे नक्की जाहीर होईल का, याबाबत साशंकता आहे. मात्र यासंदर्भात अमेरिकेच्या संसदेत निर्णय झाला असून त्या निर्णयाची अमंलबजावणी झाली, तर ही फाईल जगजाहीर होईल, आणि त्यातील हायप्रोफाईल नावं पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरातील राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच कोणत्याही भारतीय नागरिकाचे किंवा भारतीय राजकारण्याचे किंवा उद्योगपतीचे अधिकृतपणे नाव यातून चर्चिले गेले नाही, पण काही भारतीय राजकीय नेत्यांचे नाव यात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच आता या एपस्टाईन फाईलची चर्चा भारतातही सुरु झाली आहे. (Jeffrey Epstein file)

अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प प्रशासन १९ डिसेंबर रोजी कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित जुने सरकारी रेकॉर्ड जाहीर करण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये गेल्या काही वर्षापासून गाजत असलेल्या एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित सर्व ईमेल, फोटो आणि कागदपत्रे यातून सार्वजनिक केली जाणार आहेत. एपस्टाईनच्या संपूर्ण नेटवर्कबद्दल सत्य यामधून उघड होईल, पण अमेरिका, युरोपसह अन्य देशातील वलयांकीत चेह-यांमागची रहस्येही उघड होणार आहे. या एपस्टाईन फाईलमध्ये जगभरातील राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती, खेळाडू, राजघराण्यातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळेच हा फाईल जाहीर झाल्यावर त्यातील कुठल्या प्रतिष्ठिताचे नाव उघड होईल, याची उत्सुकता आहे. कारण यातून ज्यांची नावे उघड होणार आहेत, त्या सर्वांवर अल्पवनीय मुलींचे आणि मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. (International News)

हे जेफ्री एपेस्टाईन आणि डोनाल्ड ट्रम्प हे काही काळ अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे ट्रम्प यांचे नावही या फाईलमध्ये आहे. शिवाय त्यांची मोठी मुलगी आणि पत्नी मेलानिया यांचेही नाव एपस्टाईन फाईलमध्ये असल्याची चर्चा आहे. एपस्टाईन संबंधित फाईल जाहीर करण्याची मागणी काही वर्ष अमेरिकेत होत आहे. अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी एपस्टाईनशी संबंधित कागदपत्रांचे वर्गीकरण रद्द करण्याचा कायदा मोठ्या मतांनी मंजूर करण्यात आला. प्रतिनिधी सभागृहाने हे विधेयक ४२७-१ मतांनी मंजूर केले, तर सिनेटनेही ते विरोधाशिवाय एकमताने मंजूर केले. त्यामुळे कायद्यानुसार, न्याय विभागाकडे एपस्टाईनशी संबंधित फायलींचे वर्गीकरण उघड करण्यासाठी ३० दिवस आहेत. ही अंतिम मुदत १८ डिसेंबर रोजी संपत आहे. यातून किती फायली जाहीर केल्या जातील याची आकडेवारी स्पष्ट नाही, पण जे जाहीर होईल, ते खळबळजनक नक्कीच असणार आहे. (Jeffrey Epstein file)

आता ट्रम्प प्रशासनानं ही फाईल सार्वजनिक करण्यास सुरुवात केली आहे. १२ डिसेंबर रोजी या प्रकरणाशी संबंधित १९ फोटो सार्वजनिक करण्यात आले. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचे तीन फोटो देखील आहेत. याशिवाय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि अब्जाधीश बिल गेट्स, ब्रिटनचे राजकुमार अँड्र्यू, ट्रम्पचे सल्लागार स्टीव्ह बॅनन, चित्रपट निर्माते वुडी यांचेही एपेस्टाईन सोबतचे फोटो आहेत. त्यामुळेच आता १९ डिसेंबर रोजी आणखी कोणाचे फोटो जाहीर होणार आहेत, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यापैकी राजकुमार अँड्र्यू यांना यापूर्वीच ब्रिटन राजघराण्यानं दूर करुन संभाव्य बदनामी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका, युरोपमधील राजकीय नेत्यांसोबत यात भारतीय नेत्यांचाही समावेश असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. (International News)

जेफ्री एपेस्टाईन हा कुख्यात गुंड होता. तो अल्पवयीन मुलींना पैशाच्या मोबदल्यात श्रीमंतांकडे पाठवत असे. या मुलींचा लैंगिक छळ करण्यात येई, नंतर त्यांना धमकावून किंवा पैसे देऊन त्यांना गप्प करण्यात येत असे. या एपेस्टाईनचे लागेबंधे राजकीय नेत्यांपर्यंत असल्यामुळे त्याच्यावर सुरुवातील कारवाई झाली नाही. मात्र २००५ मध्ये फ्लोरिडातील एका १४ वर्षांच्या मुलीच्या आईने एपेस्टाईनवर पहिली तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या १४ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ कऱण्यात आल्याची ही तक्रार होती. जेफ्री एपस्टाईनविरुद्ध ही पहिली अधिकृत तक्रार होती. यासंदर्भात तपास सुरु झाल्यावर मग सगळी एपस्टाईन फाईल खुली झाली आणि उच्चभ्रू समाजातील मोठे सेक्स रॅकेट समोर आले. यानंतर एपस्टाईनवर जवळपास ५० हून अधिक अल्पवयीन मुलींनी आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. पाम बीच पोलिस विभागाने याबाबत सखोल तपास करुन एपस्टाईनविरुद्ध अन्य गुन्हे दाखल केले. (Jeffrey Epstein file)

यातूनच एपस्टाईननं या सर्व सेक्स रॅकेटसाठी मॅनहॅटन आणि पाम बीचमध्ये अलिशान व्हिला घेतल्याचेही उघड झाले. एपस्टाईन येथे ज्या हाय-प्रोफाइल पार्ट्या करत होता, त्यात अमेरिका आणि युरोपमधील अनेक हायप्रोफाईल मंडळी हजर रहात असत. या पार्ट्यांमध्ये अल्पवयीन मुलांना आणण्यासाठी अनेकवेळा खाजगी जेटचाही वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या सर्व पार्ट्यांसाठी एपस्टाईनची मैत्रीण आणि जोडीदार, घिसलेन मॅक्सवेलने हिचासुद्धा सहभाग होता. एपस्टाईनवर गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला २००८ मध्ये अटक झाली, आणि फक्त १३ महिन्यांची शिक्षा झाली. २००९ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर एपस्टाईनं पुन्हा त्याचे नेटवर्क सुरु केले. यात त्यांनी अनेक अभिनेत्री, मॉडेल यांनाही आपल्या जाळ्यात ओढले. यातून ८० महिलांचे लैंगिक शोषण झाले. (International News)

याविरोधात मग अमेरिकेत मोठी चळवळ उभी राहिली. यामध्ये अँजेलिना जोली, सलमा हायेक, उमा थर्मन आणि अ‍ॅशले जड यासारख्या अभिनेत्रींचा समावेश होता. #MeToo हॅशटॅग मध्ये अशाच लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांच्या यातना पुढे आल्या. या सर्वात व्हर्जिनिया गिफ्री ही तरुणी मुख्य ठरली. अल्पवयीन व्हर्जिनियाला एपेस्टाईननं ब्रिटिश राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू यांच्यासोबत रहण्याची सक्ती केली होती. अल्पवयीन असलेल्या व्हर्जिनियावर प्रिन्स अँड्र्यू यांनी तीनवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या गिफ्रेनं मग एपस्टाईनवर पुस्तकही लिहिले, आणि महिलांची चळवळ उभारली. मात्र या सर्वात तिचा संशयास्पद मृत्यू झाला. प्रिन्स अँड्र्यू यांना राजघराण्यानं त्यांच्या कर्तव्यांपासून दूर करुन एपेस्टाईनमधील सहभागाबद्दल शिक्षा दिली आहे. (Jeffrey Epstein file)

======

हे देखील वाचा : Horoscope : बारा राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

=======

या सर्वात जेफ्री एपस्टाईनचाही तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला होता. १० ऑगस्ट २०१९ रोजी, एपस्टाईन याचा मृतदेह आढळून आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये एपस्टाईनच्या मानेचे हाड तुटल्याची नोंद आहे. त्यामुळेच या एपस्टाईन प्रकरणात अडकलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींकडून एपस्टाईनचा खून झाल्याचा संशयही आहे. या सर्वात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्वांच्या संशयीत नजरा अधिक आहेत. कारण ट्रम्प आणि एपस्टाईन हे पक्के मित्र होते. अनेक पार्ट्यांमध्ये ही जोडी तरुणींच्या घोळक्यात दिसायची. मात्र एक मालमत्ता घेण्याच्यावरुन या दोघांमध्ये वाद झाला, आणि ही जोडी दुरावली. आता त्याच ट्रम्प यांचे नाव या फाईलमधून पुन्हा आल्यावर ट्रम्प अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का, हा प्रश्नही विचारला जात आहे. (International News)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.