Home » Japan : जपानी राजघराण्याचे अस्तित्व धोक्यात !

Japan : जपानी राजघराण्याचे अस्तित्व धोक्यात !

by Team Gajawaja
0 comment
Japan
Share

जगभरातील काही देशांमध्ये जी मान्यवर राजघराणी आहेत, त्यामध्ये जपानच्या राजघराण्याचा समावेश आहे. जपानच्या सध्याच्या संविधानानुसार, सम्राट हा, राज्य आणि लोकांच्या एकतेचे प्रतीक आहे. राजघराण्यातील सदस्य औपचारिक आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडतात, परंतु त्यांची सरकारी कारभारात कोणतीही भूमिका नसते. असे असले तरी, ब्रिटनच्या शाही राजघराण्यानंतर सर्वात लोकप्रिय राजघराणे म्हणून या जपानच्या राजघराण्याचा उल्लेख होतो. मात्र या जपानच्या राजघराण्याचे अस्तित्व त्यांनीच केलेल्या नियमांमुळे संपुष्टात येण्याचा धोका वाढला आहे. या नियमांनुसार राजघराण्यात गादीचा वारसा फक्त राजाच्या मुलाला मिळतो, राजकन्यांना शाही वारसा मिळत नाही. या नियमांमुळे जपानच्या राजघराण्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या राजघराण्यात आता अवघे चार पुरुष सदस्य असून त्यांच्यामध्ये दोन वयोवृद्धांचा समावेश आहे. तर भावी राजा हा आता 17 वर्षाचा आहे. या एकमेव तरुण सदस्याकडून राजघराण्याला मोठ्या आशा आहेत. (Japan)

जगातील सर्वात जुने राजघराणे म्हणून ओळखल्या जाणा-या जपानच्या राजघराण्याचे अस्तित्व आता राजकुमार हिसाहितो, यांच्यावर अवलंबून आहे. या राजघराण्यात फक्त पुरुषांनाच सिंहासनाचा वारसा मिळू शकतो. राजकुमार हिसाहितो, यांच्या अन्य बहिणींना असा अधिकार नाही. शिवाय राजकुमारींना सामान्य पुरुषाशी लग्न करण्याची परवानगीही आहे. राजघराण्याबाहेर लग्न केलेल्या या राजकुमारींना त्याबदल्यात मोठी रक्कम मिळते, मात्र त्यांना त्यांच्या सर्व राजपदव्यांचा त्याग करावा लागलो. जपानच्या राजघराण्यात अलिकडे दोन राजकुमारींनी सामान्य नागरिकांसोबत लग्न करुन आपला संसास थाटला आहे. त्यांना राजघराण्यापासून आता कुठलाही लाभ घेता येत नाही. वास्तविक या राजकुमारींनी राजवंशातही लग्न केले असते तरी त्यांच्या मुलांना राजगादीचे वारस होता येत नाही. हा मान फक्त राजघराण्यात जन्माला येणा-या मुलांनाच मिळत आहे. त्यात गेल्या जवळपास 40 वर्षात या राजघराण्यात मुलींचा जन्म होत आहे. त्यामुळे राजघराण्यानं बनवलेला नियम त्यांच्याच नाशाला कारणीभूत ठरत आहे. सध्या जपानचे सम्राट नारुहितो हे आहेत. ते जपानचे 126 वे सम्राट आहेत. नारुहितो हे 59 वर्षाचे असतांना त्यांचा राज्यभिषेक झाला. (International News)

नारुहितो हे आधुनिक विचारांचे राजे मानले जातात. त्यांच्या कालावधीत जपान राजघराण्यातील नियम बदलतील अशी आशा आहे. नारुहितो यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले आहे. परदेशात शिक्षण घेणारा ते पहिले जपानी राजकुमार आहेत. राजा नारुहितोच्या पत्नीचे नाव राजकुमारी मसाको ओवाडा आहे. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव राजकुमारी ऐको आहे. जपानच्या राजघराण्याच्या नियमानुसार राजकुमारी ऐकोला राजगादीचा वारसा चालवता येणार नाही. जपानच्या राजघराण्यात 1947 मध्ये फक्त मुलांनाचा राजसिंहासनावर बसता येईल, हा कायदा करण्यात आला. या कायद्याचे नाव इम्पीरियल हाऊस लॉ आहे. भविष्यात या राजघराण्याचा वारस म्हणून राजकुमार हिसाहितो यांच्याकडे बघितले जाते. राजकुमार हिसाहितो, यांचे वडिल, अकिशिनो हे ही सिंहासनाचे दावेदार आहेत. ते सध्याचे राजा नारुहितो, यांचे भाऊ आहेत. (Japan)

राजघराण्यातील मुलींना राजघराण्याव्यतिरिक्त अन्य कोणाबरोबरही लग्न करण्याची परवानगी नव्हती. असे केल्यास या राजकुमारींना त्यांचे पद आणि संपत्तीचाही त्याग करावा लागत असे. चार वर्षापूर्वी जपानच्या राजघराण्यात एक क्रांती झाली. राजकुमारी माको ही राजा नारुहितो यांचे भाऊ प्रिन्स अकिशिनो यांची मुलगी आहे. या राजकुमारीनं तिचा मित्र केई कोमुरो बरोबर लग्न केले. या लग्नासाठी राजकुमारी माको हिला बराच संघर्ष करावा लागला. केई कोमुरो हा सामान्य घराण्यातील असल्यामुळे राजघराण्यानं या लग्नाला प्रथम विरोध केला होता. मात्र माको आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानं राजघराण्यानं तिला लग्नाची परवानगी दिली. (International News)

=============

हे देखील वाचा : Indrajeet Sawant : मार्टिनची डायरी आणि कोरटकर-सावंत वाद का घडला ?

Mahakumbh : प्रयागराज महाकुंभाची ‘इतिश्री’

=============

वास्तविक जपानी राजवंशाच्या परंपरेनुसार, राजवंशाबाहेर लग्न करण्यासाठी राजकुमारी किंवा राजकुमाराला सुमारे 7.5 कोटी रुपयांची भरपाई दिली जाते. परंतु राजकुमारी माकोनं अशी कुठलिही भरपाई घेतली नाही. राजकुमारी माकोच्या आधी तिची मोठी बहीण राजकुमारी नोरिको हिनेही 2014 मध्ये राजघराण्याबाहेर लग्न केले आहे. या दोन्ही राजकुमारी आता जपानच्या सामान्य नागरिक म्हणून जीवन जगत आहेत. या जपानच्या राजघराण्यात आता सर्वात तरुण सदस्य 17 वर्षाचा राजकुमार हिसाहितो हा आहे. सध्या, जपानी शाही कुटुंबात 17 सदस्य आहेत. यात राजकुमार हिसाहितोसह चार पुरुषांचा समावेश आहे. तर अन्य राजकन्या आहेत. त्यामुळेच जपानच्या राजघराण्याच्या वंशवृद्धीच्या सर्व आशा राजकुमार हिसाहितो याच्या लग्नावर अवलंबून आहेत. या राजकुमारासाठी नवरी शोधण्यात राजघराणे व्यस्त आहे. जपानी वंशाच्या मुलीसोबतच राजकुमार हिसाहितो यानं लग्न करावं असं बंधनही त्याच्यावर घालण्यात आलं आहे. (Japan)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.