आज संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. सगळ्या लाडक्या बाळकृष्णाची हा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषाने आणि आनंदाने सर्व लोकं साजरे करताना दिसतात. प्रत्येक राज्यात, प्रत्येक घरात हा जन्मोत्सव साजरी करण्याच्या विविध पद्धती रूढ आहेत. अनेक ठिकाणी आज उपवास करतात तर काही ठिकाणी आज रात्री कृष्णाला पाळण्यात घालून त्याचा जन्म साजरा केला जातो.
सगळ्यांनाच माहित आहे की, श्रीकृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. श्री कृष्णाचा जन्म कंसाचा वध करण्यासाठी तर झाला सोबतच या अवतारात त्यांनी पांडवांना योग्य दिशा दाखवताना संपूर्ण जगाला भगवद्गीता ऐकवली. श्री कृष्ण यांनी त्याच्या बाल वयात अनेक लीला घडवल्या, ज्या आजही अतिशय लोकप्रिय आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का की, श्री कृष्णच जन्म मध्यरात्रीच का झाला? का भगवान विष्णू यांनी हा अवतार घेण्यासाठी मध्यरात्र निवडली? चला जाणून घेऊया.
विष्णूचा आठवा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला बुधवारी द्वापारयुगातील रोहिणी नक्षत्रात झाला. भगवान श्रीकृष्ण हे जन्माआधीच सिद्धींनी संपन्न होते. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची एक मोठी कहाणी आहे. ती म्हणजे, कंसाने आपली अतिशय लाडकी बहीण असलेल्या देवकीचा विवाह वासुदेव यांच्याशी लावून दिला. या विवाहानंतर तिची त्यांच्या नगरातून रथात बसवून पाठवणी केली जात होती.
त्याच वेळी एक आकाशवाणी झाली की, देवकीच्या आठव्या मुलाच्या हातून कंसाचा वध होईल. हे ऐकून घाबरलेल्या कंसाने वासुदेव आणि देवकीला तुरुंगात टाकले. त्यानंतर कंसाने देवकीच्या पोटी जन्म घेणाऱ्या सर्वच नवजात बालकांची हत्या केली. त्याने एक-एक करून त्यांच्या सातही मुलांचा वध केला. पुढे देवकी आठव्या बाळासाठी गरोदर होती.
अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कंसाने वासुदेव आणि देवकीला कोंडलेल्या तुरुंगाची सर्व कुलपे आपोआप तुटून पडली. यादरम्यान सर्व सैनिक काळनिद्रेत झोपले होते. त्या रात्री आभाळ दाट ढगांनी भरले होते आणि तुफान जोरदार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट सुरू झाला होता. अशातच देवकीने आठव्या मुलाला जन्म दिला आणि कृष्णाचा जन्म झाला.
श्रीकृष्ण अवताराची भगवान विष्णु यांनी जन्मासाठी निवडलेले नक्षत्र आणि वेळ अनेक बाजूनी खास होती. त्यांनी जन्म घेतलेले वार बुधवार हा देखील खास होता. त्यांच्या जन्मासाठी असलेला वार, तिथी, नक्षत्र यामागे अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत.
श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीच्या मध्यरात्री होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो चंद्रवंशी (यदुवंश) होता. श्रीकृष्णाचे पूर्वज चंद्रदेव होते आणि बुध चंद्राचे पुत्र होते. त्या कारणास्तव श्रीकृष्णाने चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवारची निवड केली. तज्ज्ञ जाणकारांच्या मते, रोहिणी ही चंद्राची प्रिय पत्नी आणि नक्षत्र आहे. याच कारणामुळे श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला. त्याच वेळी अष्टमी तिथीला जन्म घेण्यामागेही एक कारण होते आणि ते म्हणजे अष्टमी तिथी हे शक्तीचे प्रतीक आहे. याच शक्तीमुळे भगवान विष्णू संपूर्ण विश्व चालवत होते, किंबहुना आजही चालवत आहे.
======
हे देखील वाचा : कृष्ण जन्माष्टमीची माहिती आणि पूजा मुहूर्त
======
अजून एक आख्यायिका म्हणजे खुद्द चंद्रदेवांची इच्छा होती की, भगवान श्री हरी विष्णू यांनी त्यांच्या कुटुंबात कृष्णाच्या रूपात जन्म घ्यावा आणि याचे त्यांना प्रत्यक्ष दर्शन घडावे. एका धार्मिक कथेनुसार कृष्णाच्या जन्माच्या वेळी पृथ्वीपासून आकाशापर्यंत संपूर्ण वातावरण सकारात्मक होते. भगवान विष्णु यांनी अतिशय नियोजनपूर्वक श्रीकृष्ण अवतार मथुरेत घेतला.
कंसाच्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही मध्यरात्रीची निवड केली. जेणेकरून त्याचे वडील त्याला सुरक्षित ठिकाणी पाठवू शकतील. म्हणून जेव्हा कृष्णाचा जन्म झाला तेव्हा सर्व तुरुंगांचे दरवाजे उघडले आणि सैनिक गाढ झोपेत गेले. त्यामुळे त्यांचे वडील वसुदेव गोकुळात सुखरूप पोहोचू शकले आणि तुरुंगात असलेल्या पत्नीकडे परत आले. याच कारणामुळे भारतात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मध्यरात्री साजरा केला जातो.