Home » Odisha : भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी का जातात !

Odisha : भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी का जातात !

by Team Gajawaja
0 comment
Odisha
Share

ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी निघणा-या भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेची तयारी सुरु झाली आहे. या रथयात्रेच्या सोहळ्याआधी होणारे धार्मिक विधी सुरु झाले असून त्यासाठी पुरी नगरी भगवान जगन्नाथांच्या भाविकांनी सजली आहे. यावर्षी ही जगप्रसिद्ध रथयात्रा 27 जून 2025 रोजी होणार आहे. या रथयात्रेआधी ज्या अनेक परंपरा पाळल्या जातात, त्यापैकीच एक परंपरा म्हणजे, भगवान जगन्नाथ हे आपल्या मावशीच्या घरचा पाहुणचार घेतात. भगवान जगन्नाथ हे स्वतः आपला भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत त्यांच्या मावशीच्या घरी जातात. स्थानिक भाषेत याला गुंडीचा मंदिर दौरा म्हणतात. ही प्रथा कशी चालू झाली, आणि आजही जगन्नाथ यात्रेआधी ती कशी पार पडते, हे जाणून घेण्यासारखे आहे. (Odisha)

दरवर्षी पुरी येथे होणा-या भगवान जगन्नाथाची रथयात्रेसाठी जगभरातील लाखो भाविक पुरी येथे दाखल होतात. यावर्षी 27 जून रोजी होणा-या या यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक पुरी येथे दाखल होत असून रथयात्रेआधीच्या धार्मिक विधींचा आनंद घेत आहेत. यातीलच एक परंपरा म्हणजे, भगवान जगन्नाथ आपल्या मावशीच्या घरी भेट देतात. भगवान जगन्नाथ, मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत गुंडीचा मंदिरात जातात. याच गुंडीचा मंदिराला भगवान जगन्नाथांच्या मावशीचे घर म्हणतात. पुरीचा राजा इंद्रद्युम्न याची पत्नी राणी गुंडीचा हिच्या नावावरून हे नाव पडले आहे. राजा इंद्रद्युम्नने भगवान जगन्नाथाचे मुख्य मंदिर बांधले. त्यावेळेची एक कथा सांगितली जाते, त्यानुसार राणी गुंडीचा ही भगवान श्रीकृष्णाची परम भक्त होती. (International News)

राणी गुंडीच्या हिच्या भक्तीनं प्रसन्न होऊन, भगवान जगन्नाथांनी दरवर्षी मी तुमच्या घरी येईल, असा आशीर्वाद दिला. या आशीर्वादानुसार, भगवान जगन्नाथ दरवर्षी रथयात्रेच्या माध्यमातून गुंडीचा मंदिराला भेट देतात. येथे भगवान जगन्नाथ आपल्या बहिण-भावांसह नऊ दिवसांचा मुक्काम करतात. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना विशेष स्नान केले जाते. याला पैर्णिमा स्नान म्हणतात. यासाठी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या मूर्ती गर्भगृहातून मंडपात आणल्या जातात. त्यांना 108 भांड्यांमधील पाण्याने स्नान घालण्यात येते. परंपरेनुसार, भगवान जगन्नाथांना 35 भांडी पाण्याने, देवी सुभद्रा यांना 22 भांडी, भगवान बलभद्र यांना एका भांड्याने आणि भगवान सुदर्शन यांना 18 भांडी पाण्याने स्नान घालण्यात येते. या पाण्यात सुगंधी फुले, चंदन, केशर, कस्तुरी यांच्यासह अनेक प्रकारची औषधे मिसळली जातात. या पवित्र स्नानानंतर, भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांना ताप येतो. (Odisha)

मग त्यांची डॉक्टर तपासणी करतात आणि त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे भगवान 15 दिवस विश्रांती घेतात. ही पंधरा दिवसांची विश्रांती घेतल्यावर भगवान जगन्नाथ गुंडीचा मंदिरात जातात. मावशीच्या घरी गेल्यावर जसे भाचेमंडळींचे लाड करण्यात येतात, तसेच लाड भगवान जगन्नाथांचे गुंडीचा मंदिरात केले जातात. त्यांच्यासाठी खास जेवण देखील तयार केले जाते. त्यात अनेक पदार्थांचा समावेश असतो. भगवान जगन्नाथांना या पदार्थांचा भोग चढवला जातो. या गुंडीचा मंदिरात राहून 9 दिवासांचा पाहुणचार घेतल्यावर भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा आपल्या मुख्य मंदिरात मिरवणुकीतून परत येतात. देवाच्या या परतीच्या प्रवासाला ‘बहुदा यात्रा’ असे नाव आहे. मुख्य मंदिराकडे परत येतांना भगवान जगन्नाथ यांना ‘पोडा पिठा’ नावाच्या एका खास पदार्थांचा भोग चढवला जातो. नंतर हा भोग भाविकांमध्ये वाटला जातो. हा प्रसाद मिळवण्यासाठी हजारो भक्त गर्दी करतात. (International News)

===========

हे देखील वाचा :  China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !

Kerala : श्री पद्मनाभस्वामी मंदिरात महाकुंभभिषेक !

===========

पारंपारिक विधी पार पाडल्यावर रथयात्रेचा सोहळा 27 जून पासून सुरु होईल. ही यात्रा शनिवार, 5 जुलै रोजी संपन्न होणार आहे. भगवान जगन्नाथांच्या या रथयात्रेसाठी खास रथ तयार करण्यात आले आहेत. हे रथ ओढण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. भगवान जगन्नाथाचा रथ ओढण्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. कोणताही भक्त आपल्या भक्तीने भगवान जगन्नाथाचा रथ ओढू शकतो. भगवान जगन्नाथाचा रथ ओढणारा व्यक्ती जीवन आणि मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता हा सर्व सोहळा पुरी येथे उत्साहानं सुरु होणार असल्यानं पुरी नगरी भाविकांनी सजून गेली आहे. (Odisha)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.