Home » Jack Ma : अमेरिकेवर मात करण्यासाठी चीन सरकारनं धरला अलिबाबाचा हात

Jack Ma : अमेरिकेवर मात करण्यासाठी चीन सरकारनं धरला अलिबाबाचा हात

by Team Gajawaja
0 comment
Jack Ma
Share

चीनच्या उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठे नाव म्हणून जॅक मा यांचे नाव घेतले जाते. अलिबाबा हा त्यांचा उद्योगसमूह चीनमध्ये सर्वात मोठा आर्थिक उलाढाल करणारा उद्योगसमूह आहे. चीनच्या उद्योगक्षेत्रात क्रांती आणणा-या अलिबाबाच्या जॅक मा यांना मात्र काही वर्ष चीन सरकारच्या जाचाला तोंड द्यावे लागले आहे. हा त्रास एवढा होता की, जवळपास पाच वर्ष जॅक मा गायब झाले होते. चीन सरकारनं त्यांना कैदेत टाकलं इथपर्यंत त्यांच्याबाबत बातम्या येत होत्या. तर चीन सरकारच्या जाचाला कंटाळून त्यांनी देश सोडल्याच्याही बातम्या आल्या. (Jack Ma)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा 2020 पासून कोणाच्याही नजरेस पडले नाहीत. सार्वजनिक जीवनातून दूर राहणेच त्यांनी पसंत केले. चीनच्या आर्थिक क्षेत्रावर त्यांनी केलेल्या टीकेमुळे चीन सरकारनं त्यांना आणि त्यांच्या उद्योगसमुहाला टार्गेट केले होते. मात्र आता पाच वर्षानंतर चीन सरकार स्वतःहून जॅक मा यांच्यासोबत जात असल्याचे चित्र आहे. कारण तब्बल पाच वर्षानंतर जॅक मा एका कार्यक्रमात दिसले आहेत. ते सुद्धा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत जॅक मा दिसल्यामुळे हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चीनला आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, यासाठी जॅक मा यांच्यासारख्या अनुभवी उद्योगपतींची साथ गरजेची आहे. त्यामुळेच चीन सरकारने पाच वर्षापूर्वी ज्या जॅक मा यांच्याविरोधात मोहीम उघडली होती, त्यांचाच हात धरण्याची वेळ सरकारवर आली आहे. (International News)

2020 मध्ये, चिनी आर्थिक व्यवस्थेवर टीका केल्यामुळे अलिबाबा उद्योगसमुहाचे संस्थापक जॅक मा यांना चीनी सरकारच्या त्रासाला तोंड द्यावे लागले. त्यांच्या कंपनीविरोधातही चीन सरकारनं आपलं धोरण बदललं. याचा फटका अलिबाबा समुहाला बसला. त्यामुळे सार्वजनिक जीवानापासून जॅक मा अलिप्त झाले. आता पाच वर्षानंतर जॅक मा हे दिसले आहेत, तेही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत एका सरकारी कार्यक्रमात. चीन सरकार सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेला स्पर्धा देण्यासाठी योजना आखत आहे, यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनी उद्योगपतींची मदत घेण्यात येत आहे. (Jack Ma)

या क्षेत्रात जॅक मा हे सर्वात विश्वासनीय नाव आहे, हे जाणूनच जॅक मा यांना सोबत घेऊन चीन सरकार आता काम करत आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचे योगदान 50% पेक्षा जास्त आहे. यातूनच चीनच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चीन सरकार तंत्रज्ञान कंपन्या आणि खाजगी क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांना प्रोत्साहन देऊन अधिक रोजगार निर्मितीसाठी सहकार्य करीत आहे. ही योजना जाहीर झाल्यावर अलिबाबाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. चीन सरकारसोबत वाद सुरु असतांना अलिबाबा कंपनीला मोठा फटका बसला होता. या उद्योगसमुहातील अनेक कंपन्यांवर अधिक कर लादण्यात आला होता. तसेच त्यांच्या उत्पादनांवरही मर्यादा आणण्यात आली होती. (International News)

त्यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमतही बाजारात कमी होती. मात्र आता पुन्हा अलिबाबासोबत चीनीसरकार सहकार्य करीत असल्यामुळे अलिबाबाच्या शेअर्सधारकांना दिलासा मिळाला आहे. जॅक मा यांचे पुनरागमन सकारात्मक ठरले आहे. त्यांच्यामुळे चीनमधील अन्यही खाजगी उद्योजकांना पुन्हा सरकारी धोरणांचा फायदा मिळण्याची आशा दिसू लागली आहे. या सर्वात जॅक मा यांचा प्रेरणादायी प्रवासही चर्चेत आला आहे. शून्यापासून सुरुवात करून आणि अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभारणारे जॅक मा हे प्रत्येक तरुणांसाठी आदर्श आहेत. जॅक मा यांचे पूर्ण नाव मा युन आहे. मात्र इंग्रजी प्रेमामुळे त्यांनी आपले नाव बदलून जॅक मा असे ठेवले. 10 सप्टेंबर 1964 रोजी चीनमधील हांगझोऊ शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडिल संगीत क्षेत्रात होते. शिकत असतांना त्यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी परदेशी पर्यटकांना मोफत शहर दाखवायला सुरुवात केली. पदवीधर झाल्यावर त्यांनी नोकरीसाठी तब्बल 30 मुलाखती दिल्या. पण त्यात अपयश आले. (International News)

=============

हे ही वाचा : China : बांगलादेशी सूनबाई नको रे बाबा !

Israel And Iran War : अमेरिकेच्या हल्ल्याने जगभरात चिंता !

============

शेवटी 1995 मध्ये जॅक मा अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी पहिल्यांदा इंटरनेट पाहिले. तिथेच त्यांना मोबाईलवर हवी ती वस्तू मागवता येऊ शकते, हे समजले. त्यातून प्रेरणा घेत जॅक मा चीनमध्ये परतले आणि त्यांनी असाच उद्योग उभारण्याचा प्रयत्न सुरु केला. मित्रांकडून भांडवल घेत केलेला हा त्यांचा प्रयत्न दोनवेळा फसला. शेवटी तिस-यावेळा अलिबाबा नावाची कंपनी सुरु केली. त्यातून त्यांनी चीनमध्ये प्रथमच इंटरनेट आणि ई-कॉमर्सची ओळख करून दिली. चीनमधील ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंटचा चेहरामोहरा बदलण्याचे सर्व श्रेय जॅक मा यांना देण्यात येते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणा-या जॅक मा यांनी 2020 मध्ये चीन सरकारच्या आर्थिक धोरणावर जाहीर टीका केली, तेव्हापासून त्यांच्या अलिबाबाचे वाईट दिवस सुरु झाले. मात्र या पाच वर्षानंतर चीन सराकारला जॅक मा यांचे महत्त्व समजल्याचे दिसत आहे. (Jack Ma)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.