हिंदू धर्मात श्राद्धला महत्त्व आहे. पितृ पक्षात श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते अशी धारणा आहे. पितृ पक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात होते. भाद्रपद अमावस्येला पितृपक्ष संपतो. या काळात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. तसेच कुटुंबावरही त्यांचा आशीर्वाद रहातो, असे मानले जाते. यासाठी पितरांचे श्राद्ध प्रत्येक हिंदू कुटुंबात केले जाते, मात्र काहीजण हे श्राद्ध एका खास मंदिरात करण्याला प्राधान्य देतात. ते मंदिर म्हणजे, विष्णुपद मंदिर (Vishnupad Temple).
बिहारच्या गयामध्ये असलेल्या या विष्णुपद मंदिरात पितृपक्षात भाविकांची गर्दी असते. श्रीराम हे माता सीतेसह या मंदिरात महाराज दशरथांचे पिंडदान करण्यासाठी आले होते, असेही सांगण्यात येते. विष्णूच्या पावलांचा ठसा असलेल्या या मंदिरात वर्षाचे बाराही महिने भाविकांची गर्दी असली, तरी पितृपक्षात मात्र या गर्दीत वाढ होते.
या मंदिराचा उल्लेख धर्मशिला मंदिर असाही करण्यात येतो. बिहरच्या गयामध्ये फाल्गू नदिच्या काठावर असलेले हे पुरातन मंदिर विष्णुभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. भगवान विष्णूच्या पावलांचा ठसा असलेल्या या मंदिराची ख्याती देशात आणि परदेशातही पसरलेली आहे.
भगवान विष्णुच्या पावलांचे दर्शन केल्याने सर्व दुःख नष्ट होतात आणि पूर्वजांना मुक्ती प्राप्ती होते, अशी अनेकांची धारणा आहे. मंदिरात 13 इंच लांब असलेले भगवंताचे चरण रक्तचंदनाने सजवलेले आहे. त्यावर गदा, चक्र, शंख आदी शुभचिन्ह कोरलेली आहेत. ही अत्यंत जुनी परंपरा असून त्याचे काटेकोरपणे आत्ताही पालन केले जाते.
या विष्णुपद मंदिराबाबत (Vishnupad Temple) अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये गयासुर राक्षसाला मारण्यासाठी भगवान विष्णुंनी केलेल्या पराक्रमाची गाथा आहे. गयासुर नावाच्या असुराने कठोर तपश्चर्या करून भगवंतांचे वरदान प्राप्त केले. परमेश्वराकडून मिळालेल्या आशीर्वादाचा गैरवापर करून गयासुर देवतांना त्रास देऊ लागला. गयासुरच्या अत्याचाराने दु:खी झालेल्या देवतांनी भगवान विष्णूचा आश्रय घेतला आणि गयासुरापासून रक्षण करण्याची प्रार्थना केली. विष्णूने गयासुरला आपल्या गदेने मारले व नंतर त्याच्या डोक्यावर दगड ठेवून मोक्ष दिला. भगवान विष्णुंनी गयासुरवर शीला ठेवताना आपल्या पायांनी त्यावर दाब दिला. यानंतर या शिलेवर भगवना विष्णूच्या पायाची खूण उमटली. जगात हे एकमेव स्थान आहे, जिथे प्रत्यक्ष विष्णूच्या चरणांचे ठसे उमटलेले आहेत.
विष्णुपद मंदिर (Vishnupad Temple) कधी बांधण्यात आले याचा उल्लेख नसला तरी या मंदिराचा वेळोवेळी जिर्णोद्दार करण्यात आला आहे. 1766 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर पुन्हा बांधल्याचाही उल्लेख आहे. या मंदिराची उंची सुमारे शंभर फूट आहे. सभा मंडपात 44 खांब आहेत. मंदिर परिसरात पिंडदान करण्यासाठी मोठा मंडप आहे. येथे पितृपक्षात पिंडदान करण्यासाठी गर्दी असतेच, शिवाय ज्यांना पितृपक्षात येता येत नाही असे भाविक वर्षभरात कधीही येऊन येथे पिंडदान करतात.
मंदिराच्या शिखरावर 50 किलो सोन्याचा कलश आणि 50 किलो सोन्याचा ध्वज लावण्यात आला आहे. विष्णुपद गर्भगृहात 50 किलो चांदीचे छत्र आणि 50 किलो चांदीचे अष्टकुंड आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूच्या चरणांची पूजा होते. याशिवाय मंदिराच्या गर्भगृहाचा पूर्वेकडील दरवाजा चांदीचा आहे.
मंदिर परिसरातील सीताकुंडही भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. सीताकुंड हे विष्णुपद मंदिराच्या अगदी समोर फाल्गू नदीच्या पूर्वेला वसलेले आहे. येथे माता सीतेने स्वतः राजा दशरथ यांना पिंडदान केले होते, असे सांगण्यात येते. पौराणिक काळात हे ठिकाण अरण्यवन जंगल या नावाने प्रसिद्ध होते, असाही उल्लेख आहे. भगवान श्रीराम हे माता सीतेसह महाराज दशरथांचे पिंड दान करण्यासाठी आले होते त्यावेळी माता सीतेने महाराज दशरथांना वाळू आणि फाल्गू नदिच्या पाण्याने पिंड अर्पण केले होते. तेव्हापासून येथे वाळूपासून बनविलेले पिंड देण्याचे प्रथा पडल्याचे सांगण्यात येते.
सत्ययुगापासून भगवान विष्णूच्या पावलांचे ठसे असलेल्या या विष्णुपद मंदिराची (Vishnupad Temple) ख्याती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या मंदिरात पितृपक्षात पितरांच्या नैवेद्यानंतर भगवान विष्णूच्या चरणांचे दर्शन घेतल्याने सर्व दु:खांचा नाश होतो आणि पितरांना पावनलोकाची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने या पितृपक्षात मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे.
- सई बने