विजय मल्ल्या (Vijay Mallya)! भारतातील बॅंकाना करोडोंचा चुना लावून परदेशात पळालेला एक उद्योगपती..माजी खासदार… किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक… रॉयल चॅलेंजर्स बंगलोर क्रिकेट संघाचा माजी मालक… अशी कितीतरी मोठी ओळख आहे, रंगेल आयुष्य जगणाऱ्या विजय मल्ल्याची! मात्र सद्यस्थितीत त्याला ‘भगोडा’ हाच शब्द चपखल बसतोय.

इंग्लडमध्ये असलेला विजय मल्ल्या (Vijay Mallya) भारतीय सरकाराचा आरोपी आहे. तरीही विजय मल्ल्या कायम लाईमलाईटमध्येच आहे. अर्थातच ही त्याची प्रसिद्धी की कुप्रसिद्धी हे मल्ल्याच ठरवेल. पण त्याच्या आसपास असणाऱ्या सर्वांनाच त्याने केलेल्या कारवायांमुळे आता बळी जावे लागत आहे. यात त्याच्या मुलांचाही समावेश आहे.
मल्ल्यांनी केलेल्या घोटाळ्यांबाबत नुकताच कोर्टाचा एक निकाल आला असून मल्ल्यांनी बुडवलेले पैसे आता त्याच्या मुलांनी परत फेडावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या निकालानंतर पुन्हा एकदा विजय मल्ल्या चर्चेत आला आहे. काहींना ‘कर्मा इज बॅक..’ म्हणत विजय मल्ल्याला आरसा दाखवला आहे.

विजय मल्ल्या हे नाव घेतलं की, समोर येते ते त्याचं रंगेल आयुष्य. कायम सुंदर तरुणींमध्ये वावरणाऱ्या विजय मल्ल्याला बियरकिंग म्हणून सुरुवातीला ओळखलं जात असे. विजय मल्ल्यानं असं काही जाळं विणलं की, त्यात अनेक राजकारणी, उद्योगपती, फिल्मस्टार, क्रिकेटर ओढले गेले.
हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये हातात दारुचा ग्लास घेतलेला विजय मल्ल्या या सगळ्यांसोबत दिसू लागला. एकेकाळी विजय मल्ल्या म्हणजे प्रसिद्धी असे गणित झाले होते. मात्र हाच विजय मल्ल्या भारतातल्या प्रमुख बॅंकांना करोडो रुपयांचा चुना लावून पळून गेला. खासदार असलेल्या मल्ल्यानं आपल्या खासदारकीचा राजीनामा देत इंग्लड गाठलं आणि भारतात त्यानं पसरलेल्या जाळ्यातील फोलपणा उघड होऊ लागला.
====
हे देखील वाचा – कोण आहेत अश्विनी भिडे? कशी मिळाली मेट्रो वुमनची ओळख?
====
विजय मल्ल्या (Vijay Mallya) हा मूळ कर्नाटकातील बंटवाल, मंगलोरचा. उद्योगपती विठ्ठल मल्ल्या यांचा तो मुलगा. विट्टल मल्ल्या हे युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचे अध्यक्ष होते. सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकात्ता येथून पदवी शिक्षण घेत असतानाच आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाची जबाबदारी त्यांना अंगावर घेतली. 1986 मध्ये हवाई सुंदरी असलेल्या समिरा शर्माबरोबर विजय मल्ल्या यांचे लग्न झाले. त्यांना सिद्धार्थ नावाचा मुलगा झाला. त्यानंतर समिरा आणि विजय यांचा घटस्फोट झाला.

विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांचा दुसरा विवाह शेजारी राहणाऱ्या आपल्या लहानपणापासूनच्या मैत्रिणीबरोबर, रेखा हिच्याशी 1993 मध्ये झाला. रेखा यांचेही यावेळी पहिले लग्न झाले होते. पहिल्या लग्नापासून रेखा यांना लीला आणि कबीर नावाची दोन मुले होती. या मुलांना विजय मल्ल्या यांनी दत्तक घेतले. अर्थात विजय मल्ल्या यांच्या स्वभावानुसार हे लग्नही टिकले नाही. वडीलांनंतर विजय मल्ल्या (Vijay Mallya) यांच्याकडे युनायटेड ब्रुअरीज ग्रुपचे अध्यक्षपद आले. विजय मल्ल्या यांनी किंगफिशर बियरच्या कंपन्यांचे जाळे विणले. रिअल इस्टेटमध्येही विजय मल्ल्यानं एन्ट्री घेतली. या सर्व सर्कलपेक्षा विजय मल्ल्या अधिक रमत होता, ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये. त्याच्या पार्ट्या यासाठी खास ठरत. त्याने आयोजीत केलेल्या पार्टीमध्ये झाडून सर्व बॉलिवूडची उपस्थिती असायची. याच लाईमलाईटचा वापर करुन मल्ल्या त्याच्या बियर कंपनीचं प्रमोशनही करत होता.
किंगफिशर कॅलेंडर हे विजय मल्ल्याच्या प्रसिद्धीतील आणखी एक पुढचे पाऊल. अतिशय बोल्ड अशा या कॅलेंडरमध्ये फोटो येण्यासाठी नामवंत मॉडेल विजय मल्ल्याच्या पुढे पुढे करायच्या. किंगफिशर एअरलाइन्स, हा विजय मल्ल्याच्या आणखी एक मोठा उद्योग. 2005 मध्ये स्थापित झालेली ‘किंगफिशर एअरलाईन्स ‘अत्यंत प्रतिष्ठीत एअरलाईन्स म्हणून ओळखली जाऊ लागली. पण त्यामागची दिवळखोरीही काही वर्षात उघड झाली. 2013 मध्ये ही एअरलाईन्स बंद झाली. त्याचवेळी या एअरलाईन्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आक्रोश चर्चेत आला. यापैकी अनेकांना दोन वर्षापर्यंतचा पगारच दिला गेला नव्हता. मल्ल्याच्या दिवाळखोरीबद्दल आता बातम्या येऊ लागल्या होत्या. अर्थात तोपर्यंत मिडीयावरही असलेली विजय मल्ल्या नावाची धुंदी कमी होऊ लागली होती.

2016 मध्ये हैदराबाद येथील न्यायालयाने मल्ल्याच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट काढले. मात्र तोपर्यंत विजय मल्ल्या आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन परदेशात पळाला होता. फॉर्म्युला वन टीम फोर्स इंडियाचे सह-मालक असलेल्या विजय मल्ल्याला 2017 मध्ये लंडनमध्ये मनी-लाँडरिंग प्रकरणाचा भाग म्हणून अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर सोडण्यातही आले.
भारतात विजय मल्ल्याला एसबीआय, बीओबी, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक लिमिटेड, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जे अँड के बँक, पंजाब अँड सिंध बँक, पीएनबी, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, यूको बँक, यूबीआय आणि जेएम या 13 बँकांची थकबाकी भरायची आहे. त्यासंदर्भात काही खटलेही चालू आहेत.
====
हे देखील वाचा – कोण आहेत ‘तेमजेन इमना अलांग’ ज्यांचे व्हिडीओ होतायत सोशल मीडियावर व्हायरल..
====
अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याच्या मुली त्याचे 200 कोटींचे कर्ज फेडतील असा निकाल दिला आहे. फरारी मद्यसम्राट विजय मल्ल्याला अवमान प्रकरणी चार महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. मल्ल्याला कोणताही पश्चाताप नसल्यामुळे शिक्षा आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. दंड न भरल्यास 2 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. मल्ल्याला ४० दशलक्ष डॉलर म्हणजेच ३१७ कोटी रुपये ८ टक्के व्याजासह ४ आठवड्यांच्या आत परत करण्यास सांगितले आहे. मल्ल्याने ही रक्कम त्याच्या तीन मुलांच्या खात्यात ट्रान्सफर केली.

याचिकेनुसार, मल्ल्या यांनी त्यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या, मुली लीना आणि तान्या मल्ल्या यांना प्रत्येकी 13 दशलक्ष डॉलर्सची रक्कम हस्तांतरित केली होती. मल्ल्याचं कर्ज आता तिन्ही मुलांना मिळून फेडावं लागेल, अन्यथा मुलांची मालमत्ता जप्त केली जाईल. मल्ल्याच्या मुलींना 211 कोटी 33 लाख द्यावे लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याची तीन मुले सिद्धार्थ, लीना आणि तान्या यांना 8% व्याजदराने चार आठवड्यात बँकांना $40 दशलक्ष परत करण्याचे आदेश दिले आहेत.
तान्या मल्ल्या ही फोटोग्राफर आहे, तर लीना मल्ल्या ही बिझनेस वुमन आहे. युरोपात तिचा व्यवसाय अनेक देशांत पसरला आहे. लैला नावाची आणखी एक मल्ल्याची सावत्र मुलगी आहे. लैला आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यासोबत काम करत होती. 2010 मध्ये ललित मोदीच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा कागदपत्रांसह दिसलेली लैला चर्चेत आली होती. सध्या ती सुद्धा युरोपमध्ये लाइफस्टाइल ॲक्सेसरीजचा व्यवसाय करते. आता या मुलींसोबत वियज मल्ल्याचा एकुलता एक मुलगा सिद्धार्थही वडिलांनी उधळलेले पैसे आपल्या खात्यातून भरणार आहे.

विजय मल्ल्या (Vijay Mallya) हे व्यक्तिमत्व त्याचं रंगेल आयुष्य ते त्याची देवभक्ती अशा सर्वच वादांत कायम चर्चेत राहिलं आहे.
2012 मध्ये 57 व्या वाढदिवसाला मल्ल्यानं तिरुमला येथील व्यंकटेश्वर मंदिराला 3 किलो सोन्याच्या विटा अर्पण केल्या होत्या. नंतर एका देवस्थानाला सोन्याचा दरवाजाही दिला होता. पण या भक्तीला जी साधी वृत्ती लागते ती मात्र विजय मल्ल्याकडे नव्हती…त्यामुळेच आज त्यांनं केलेल्या घोटाळ्यांचे परिणाम त्याच्या मुलांनाही भोगावे लागत आहेत.
– सई बने