लाल माती कशी असते…चिकट…चिवट….आणि सकस…हे सर्व गुण बहुधा लाल मातीचा बादशहा म्हणून गौरविलेल्या राफेल नदालमध्ये आहेत. राफेलला (Rafael Nadal) लाल मातीचा बादशहा म्हणतात आणि या किताबासाठी आपणच कसे ‘परफेक्ट’ आहोत, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. नुसतंच सिद्ध केलं नाही, तर लाल मातीच्या साक्षीनं एक विक्रमही आपल्या नावावर जमा केला आहे.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा परावभव करत राफेल नदाल (Rafael Nadal) यानं 22 वे ग्रॅंडस्लॅम आपल्या नाववर केलं आहे. या त्याच्या विक्रमानं राफेलची लाल मातीच्या कोर्टावरील मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
गेल्या काही वर्षात राफेल नदाल याच्या विजयापेक्षा त्याच्या दुखापतीच्या बातम्या अधिक येत होत्या. त्याच्या डाव्या पायाच्या दुखापतीमुळे तो फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होईल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र या सर्वांवर मात करत त्यानं जेतेपदाला गवसणी घातली आहे.
राफेलचा (Rafael Nadal) हा विजय आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे कारण फ्रेंच खुली स्पर्धा जिंकणारा नदाल हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. तो आला, खेळला आणि जिंकला…असंच या सामन्याचे वर्णन करावे लागेल कारण नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा ६-३, ६-३,६-० असा सरळ सेटमध्ये राफेलनं पराभव केला. राफेलने लाल मातीच्या कोर्टवरील आपली हुकुमत दाखवताना या वर्षांतील सलग दुसरे आणि एकूण विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
राफेलचा हा विजय आणखी एका कारणामुळे चर्चेत रहाणार आहे. अंतिम सामन्यातील त्याचा प्रतिस्पर्धी असलेला कॅस्पर रुड याने राफेलच्याच अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे. 23 वर्षाचा ‘रुड’ हा आठवा मानांकित आहे. तो पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत होता. मात्र राफेलसमोर त्याचा अनुभव कमी पडला आणि राफेलच्या नावावर नवा विक्रम कोरला गेला. आता राफेल (Rafael Nadal) त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी रॉजर फेडररच्याही पुढे गेला आहे.
2005 मध्ये राफेलला पहिले ग्रॅडस्लॅम मिळाले तेव्हा तो 19 वर्षाचा होता. आता 2022 मध्ये राफेलनं 20 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून स्वतःला सिद्ध केलं आहे. वास्तविक या कालखंडात राफेलला (Rafael Nadal) प्रचंड शारीरिक दुखापतींचा सामना करावा लागला, काही स्पर्धा सोडाव्या लागल्या पण त्याचा जिद्दी स्वभाव हरला नाही.
=======
हे देखील वाचा – हेटमायरच्या पत्नीबाबत गावसकरांचे वादग्रस्त वक्तव्य, कॉमेंट्रीमधून हटवण्याची मागणी
=======
राफेल नदालचा जन्म 3 जून 1986 रोजी झाला. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी सर्वसाधारण होती. स्पेनच्या एका बेटावर साध्या गावात हे नदाल कुटुंब रहात होतं. त्याच्या वडीलांचे एक रेस्टॉरंट होतं. राफेलचे काका फुलबॉल खेळायचे. त्यांनी राफेलची गुणवत्ता ओळखून त्याच्या हातात टेनिस रॅकेट दिली. वयाच्या 8 व्या वर्षी, राफेलने 12 वर्षांखालील प्रादेशिक टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. तिथून त्याचा विजयी रथ सुरु झाला तो आजतागायत सुरूच आहे.
आपल्या ३६व्या वाढदिवसाच्या दोन दिवसानंतर राफेल नदालने (Rafael Nadal) इतिहास रचला. 22 वे ग्रॅंडस्लॅम जिंकल्यावर राफेल नदाल भावूक झाला. मात्र काही वेळात लगेच सावरुन आपण भावी स्पर्धेसाठी तयार आहोत…आणखीही विजय मला मिळवायचेत..अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. राफेल असाच आहे, एका यशात तो कधी गुंतून पडला नाही. त्यामुळेच तो अजिंक्य आहे.
-सई बने