उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्याजवळील वृंदावन म्हणजे भगवान कृष्णाचे घर. याच वृंदावनमधील एका मंदिरानं कृष्णभक्तांना भुरळ घातली आहे. या मंदिराचं नाव आहे प्रेम मंदिर (Prem Mandir). कृष्णाचे हे मंदिर त्यावरील कलाकुसरीने जेवढे भक्तांना आकर्षित करत आहे. तितकेच या मंदिराचे बदलणारे रंग भक्तांना भुरळ घालत आहेत.
दिवसा पांढरे शुभ्र दिसणारे हे प्रेम मंदिर (Prem Mandir) संध्याकाळी वेगवेगळ्या रंगाच्या छटांमध्ये रंगून जाते. दर तीस सेकंदानी या मंदिराचा रंग बदलतो. त्यामुळे प्रेम मंदिरातील हा रंगउत्सव बघण्यासाठी कृष्ण भक्तांची वृंदावनमध्ये गर्दी होते. मंदिराची वास्तुकला चित्तथरारक आणि मंत्रमुग्ध करणारी आहे.
मथुरेपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर असलेलं वृंदावन येथील प्रेम मंदिर (Prem Mandir) उभारलं आहे पाचवे जगद्गुरू कृपालू महाराज यांनी. भगवान कृष्ण आणि राधा मंदिर म्हणूनही प्रसिद्ध असलेले हे प्रेममंदिर 17 फेब्रुवारी 2012 रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले. 14 जानेवारी 2001 रोजी कृपालूजी महाराज यांनी मंदिराची पायाभरणी केली. 11 वर्ष या मंदिराचे बांधकाम चालू होते. त्यासाठी 100 कोटी रुपये खर्च झाले. तब्बल एक हजार मजूर या बांधकामात व्यस्त होते.
मंदिरात सर्वत्र इटालियन मार्बलचा वापर करण्यात आला असून या मार्बल्स राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील एक हजार कारागिरांनी तयार केला आहे. हे प्रेम मंदिर (Prem Mandir) प्राचीन भारतीय वास्तुकलेच्या नवजागरणाचं उदाहरण असल्याचे जाणकार सांगतात.

प्रेममंदिराची उभारणी 54 एकरात झाली असून, मंदिराची उंची 125 फूट, लांबी 122 फूट आणि रुंदी 115 फूट आहे. मंदिराच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात नक्षाकाम केलेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आठ मोरांची तोरणे कोरलेली आहेत आणि संपूर्ण मंदिराच्या बाहेरील भिंतींवर राधा-कृष्णाच्या लीला कोरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मंदिराच्या आतील भिंतींवरही राधाकृष्णांच्या विविध प्रतिमा कोरलेल्या आहेत.
मंदिरात एकूण 94 खांब आहेत. त्यातील बहुतेक खांबांवर गोपींच्या मूर्ती अगदी जिवंत वाटतील इतक्या सुबकतेनं कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेर आणि आत संगमरवरी दगडांवर, सोप्या भाषेत राधागोविंद गीते लिहिली आहेत. मंदिराच्या आवारात गोवर्धन पर्वताची जिवंत वाटतील अशी चित्रे तयार करण्यात आली आहेत. या मंदिरातील वास्तुकला आणि राधा कृष्णांच्या प्रतिमा बघण्यासाठी एक दिवसही कमी पडतो.
या प्रेममंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन जगद्गुरु कृपालू परिषद, या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक, आध्यात्मिक, धर्मादाय ट्रस्टद्वारे करण्यात येते. ट्रस्टतर्फे जन्माष्टमी आणि राधाष्टमी हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
या प्रेम मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री कृष्णाचे सुंदर रुप आणि राम- सीतेच्या नावाने फुललेला सुंदर फुलांचा बगिचा. यामध्ये कारंजे, श्री कृष्ण आणि राधा यांची सुंदर झलक, श्री गोवर्धन धरणलीला, कालिया नाग दमनलीला, झुलन लीला हे अतिशय सुंदरपणे साकारण्यात आले आहे. त्यामुळे भारतीयच नाही, तर परदेशी पर्यटकही या प्रेम मंदिराकडे आकर्षित होतात.

मंदिराशेजारी 73,000 स्क्वेअर फूट, जागेत सत्संगासाठी मोठी इमारत बांधण्यात आली आहे. ज्यामध्ये 25000 हजार लोक एकत्र बसू शकतात. या इमारतीला प्रेम भवन म्हणतात. 2018 मध्ये ही खास सत्संगासाठी बांधलेली इमारत भक्तांना खुली करण्यात आली. कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग या प्रेम भवनमध्ये साकारण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी या मंदिरातील दिवे मंदिराचे भव्य रूप आणखीनच प्रेक्षणीय बनवतात.
या मंदिरात सर्वत्रच सुंदर आणि भव्य झुंबर लावण्यात आली आहेत. या झुंबरांना बघण्यासाठी सायकांळनंतर गर्दी होते. कारण नयनरम्य अशा रोषणाईनं ही झुंबरे प्रकाशीत होतात. दर पाच मिनिटांनी त्यांचा रंग बदलतो. दररोज संध्याकाळी 7:00 ते 7:30 या वेळेत पर्यटकांसाठी ‘म्युझिकल फाउंटन शो’ होतो. या सुंदर कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
=====
हे देखील वाचा – अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीत बदल झाल्यामुळे होणाऱ्या वादाचं नेमकं कारण काय?
=====
या प्रेम मंदिराला (Prem Mandir) एक परिक्रमा मार्ग आहे, ज्यामध्ये श्री राधा कृष्णाच्या जीवनावर आधारीत 48 चित्र आहेत. मंदिराच्या बाहेरही 84 चित्रे लावण्यात आली आहेत. भव्य दोन मजली असलेल्या या मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्री कृष्ण आणि राधा यांची भव्य शिल्पे, तर दुसरा मजला राम आणि सीता यांच्या भव्य शिल्पांनी सजवण्यात आला आहे.
वृंदावनचे हे प्रेम मंदिर (Prem Mandir) बघण्यासाठी कृष्णभक्तांची गर्दी होत असल्याने या भागात पर्यटकांना रहाण्यासाठी उपयोगी होतील अशा अनेक धर्मशाळाही उभारण्यात आल्या आहेत. प्रेमभवनमध्ये होणाऱ्या संत्सांगामुळे हा सर्व परिसर कायम राधा-कृष्णाच्या जयजकारात लीन झालेला असतो. कधी मथुरेला गेलात तर या प्रेम मंदिराला आवर्जून भेट द्या.
– सई बने