डोक्यावर मोठी गोल पगडी, पांढरी दाढी, अंगात ढगाळ कुर्ता, त्यावर घेतलेली शाल अशा वेषात असणारे सद्गुरु म्हणजेच ईशा फाऊंडेशनचे संस्थापक जग्गी वासुदेव तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. सफाईदार इंग्रजी बोलणारे सद्गुरु तरुणांना हवेहवेसे वाटतात. सद्गुरुंची महाशिवरात्र, त्यांची संवाद शैली जेवढी प्रसिद्ध आहे तेवढेच त्यांचे बाईक प्रेमही प्रसिद्ध आहे. आता सद्गुरुंवर प्रेम करणाऱ्यांची संख्या जगभरात अधिक वाढली आहे कारण त्यांनी चालवलेले ‘माती वाचवा’ अभियान.
अभियानाची सुरुवात सद्गुरुंनी केली आहे. वय वर्ष 65 असणाऱ्या सद्गुरुंनी त्यांच्या लाडक्या BMW K 1600 GT या बाईकवरुन 100 दिवसात 27 देशांना भेटी दिल्या आहेत. नुकतेच ते भारतात आले असून, जून अखेरीस या मोहीमेचा समारोप होईल. त्यादरम्यान ते सर्व भारतभर ‘माती वाचवा’ अभियानाची माहिती देणार आहेत. त्यांचा हा उत्साह आणि हुरुप बघून सध्या सोशल मिडीयावर त्यांच्याबाबत आणि त्यांच्या राईडस्वारीबाबत अनेक क्लिप फिरत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चाहते असलेल्या सद्गुरुंच्या या मोहीमेला विशेष करुन तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरु हे ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. ईशा फाउंडेशन, भारतासह युनायटेड स्टेट्स, इंग्लंड, लेबनॉन, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये योगविद्येचे प्रशिक्षण देते. तसेच अनेक सामाजिक विकास योजनांवर काम करते. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल (ECOSOC) चे विशेष सल्लागार म्हणूनही सद्गुरुंना सन्मान मिळाला आहे. त्यांनी 8 भाषांमध्ये 100 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना सामाजिक सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
ईशा फाऊंडेशनचे मुख्यालय कोईम्बतूर येथील ईशा योग केंद्र आहे. ग्रीन हँड्स प्रकल्पांतर्गत तामिळनाडू आणि मध्ये 82 लाख रोपांची लागवड केली आहे. या संस्थेने 17 ऑक्टोबर 2006 रोजी तामिळनाडूच्या 27 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी 8.52 लाख रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी 2008 चा ‘इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ ईशा फाऊंडेशनला मिळाला आहे.
याच सदगुरू जग्गी वासुदेव यांनी माती वाचवा नावाची जागतिक मोहीम सुरू केली आहे. मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली. मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता मातीचे संवर्धन करणं हा या मागचा उद्देश आहे. सदगुरुंचे हे अभियान जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कन्झर्व्हेशन टू कॉम्बॅट डेजर्टीफिकेशन (UNCCD) यांच्या माध्यमातून आहे.
यूएनसीसीडीने त्यांच्या एका अहवालात 2050 सालापर्यंत जगभरातील 90 टक्के मातीचा ऱ्हास होण्याची भीती व्यक्त केली आहे. परिणामी अन्न तुटवडा, दुष्काळ, वातावरणातील बदल असे परिणाम होणार आहेत. त्यामुळेच सद्गुरुंनी पुढाकार घेत माती वाचवा या अभियानाची सुरुवात केली आहे. आपल्या देशातही सुपीक मातीचा थर गायब होऊ पहात आहे. आत्तापर्यंत 30 टक्के सुपीक माती नापीक झाली आहे, तर जागतिक स्तरावर सुमारे 25 टक्के सुपीक जमीन ओसाड झाली आहे. यामुळे 2050 पर्यंत पृथ्वीचा 90 टक्के भाग वाळवंटात बदलू शकतो असा इशारा युनायटेड नेशन्सने दिला आहे. या सर्वामागची दाहकता लक्षात घेता सद्गुरुंनी ‘माती वाचवा’ ही जागतिक चळवळ हाती घेतली आहे.
====
हे देखील वाचा – Espresso Machine चे गॉडफादर Anglo Moriondos नक्की आहेत कोण?
====
माती वाचवा या मोहिमेअंतर्गत सद्गुरुंनी 100 दिवसात 27 देशांना भेटी दिल्या आहेत. या मोहिमेत सद्गुरुंनी 30,000 कि.मी.चा प्रवास केला. 21 मार्च रोजी लंडनमध्ये सुरु झालेली ही यात्रा जून अखेरीस कावेरी नदीच्या खोर्यात संपणार आहे. सोलो बाईक रॅली म्हणून सद्गुरुंची ही मोहीम ओळखली गेली. सोशल मिडीयावर सद्गुरु आणि त्यांची स्पोर्टस् बाईकही तेवढची प्रसिद्ध आहे. या माती बचाव मोहिमेमुळे सद्गुरु तरुणवर्गापर्यंत अधिक पोहचले आहेत. तरुणांनी प्रेरणा घेतली, तर जगाचे भविष्य उज्ज्वल असेल असा त्यांचा विश्वास आहे.
– सई बने