Home » केदारनाथ: बारा ज्योतिर्लिंग 

केदारनाथ: बारा ज्योतिर्लिंग 

by Team Gajawaja
0 comment
Kedarnath Temple
Share

केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली, तर आद्य शंकराचार्यांनी या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. (Kedarnath Temple)

पौराणिक कथा

ज्यावेळी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये कुरुक्षेत्र येथे महायुद्ध झाले व युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला. त्यावेळी पांडव स्वतःला दोषी मानत होते की, त्यांनी आपल्या चुलत भावांचा युद्धामध्ये संहार केला. या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची तपश्चर्या करणे आवश्यक आहे, असे समजून सर्वप्रथम ते काशी येथे गेले. तिथे काही काळ घालवल्यानंतर त्यांना हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या करण्याचा आदेश शंकराकडून मिळाला. 

शंकर पांडवांना या पापातून सहजासहजी मुक्त करणार नव्हते म्हणून त्यांनी एका म्हशीचे रूप घेतले आणि गुप्तकाशी येथे पोचले. इतर म्हैशी पेक्षा वेगळी दिसणारी म्हैस पाहून भीमाने या म्हशीची शेपटी पकडली त्याचबरोबर ही म्हैस विखुरली गेली आणि तिच्या शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तिच्या पाठीकडचा भाग केदारनाथ इथे पडला व येथे केदारनाथ मंदिराचा जन्म झाला.  त्याचबरोबर शरीराचा अन्य भाग तुंगनाथ, रुद्रनाथ, कल्पेश्वर मध्य महेश्वर या ठिकाणी पडले. (Kedarnath Temple)

Image source: Google

ही पाचही ठिकाणी पंच केदार (Panch Kedar)म्हणून ओळखली जातात. यानंतर भगवान शंकराने पांडवांना पापातून मुक्त केले आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने केदारनाथ धाम येथे निवास करण्याचा निश्चय केला त्याच बरोबर केदारनाथ बाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, केदार पर्वतावर भगवान विष्णूचे अवतार नर आणि नारायण ऋषी तपश्चर्या करत होते त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी केदारनाथ इथे वास्तव्य करण्याचा निश्चय केला. 

भौगोलिक पार्श्वभूमी

केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यात असून हिमालय पर्वताच्या गडवाल रांगेमध्ये मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्या मध्ये वसलेले आहे. हे मंदिर छोटा चारधामांपैकी  एक असून समुद्रसपाटीपासून 3583 मीटर उंचीवर वसलेले आहे. 

भारतातील सर्वात पवित्र व प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिर ओळखले जाते व हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात उंच ठिकाणी असलेले मंदिर आहे. चोराबारी ग्लेशियर आणि मंदाकिनी नदीच्या किनार्‍यावर असलेले हे मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही दरवर्षी लाखो श्रद्धाळू केदारनाथ चरणी लीन होण्यासाठी या मंदिराला भेट देतात. 

केदारनाथ मंदिराची वास्तुकला (Kedarnath Temple)

केदारनाथ मंदिर हे कात्यहारी शैलीमध्ये तयार करण्यात आले आहे. याच्या निर्मितीसाठी राखाडी रंगाच्या वालुकाश्म दगडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. या मंदिराचा छत लाकडी असून त्यावर सोन्याचा कलश ठेवण्यात आला आहे. केदारनाथ मंदिराची  रचना व बांधकाम हे पाहण्यासारखे आहे. या मंदिराचे सर्व दगड एकमेकांमध्ये जोडलेले (इंटरलॉक) आहेत. मंदिराच्या पाठीमागे अनेक पाण्याची कुंडे असून ज्यामध्ये आचमन आणि शुद्धी करता येते, तर मंदिराच्या बाहेर  पाहरेकर्याच्या  रूपात नंदीची विशाल काय मूर्ती स्थापन करण्यात  आली आहे. 

Kedarnath temple - Image Source Google

केदारनाथ मंदिर उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा 

श्री केदारनाथ मंदिर हे दरवर्षी जवळ जवळ सहा महिने हिवाळ्यामध्ये बंद असते.

कसे पोहोचणार?

केदारनाथला जाण्यासाठी रेल्वेमार्ग, रस्तामार्ग आणि हवाई मार्ग असे तिन्ही पर्याय उपलब्ध आहेत. रेल्वेने जायचं असल्यास सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे ऋषिकेश. ऋषिकेशपासून गौरीकुंडला बसने जाता येतं. यासाठी नियमित बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर २१० किमी आहे. 

===========

हे ही वाचा: त्र्यंबकेश्वर – बारा ज्योतिर्लिंग

===========

या व्यतिरिक्त दिल्लीवरून, डेहराडून अथवा ऋषिकेशला जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहे. नवी दिल्लीपासून २६० किमी अंतरावर असलेल्या डेहराडूनला जाण्यासाठी कश्मीर गेट बस टर्मिनल आणि आनंद विहार बस टर्मिनलया दोन्ही ठिकाणांहून बस सुटतात. डेहराडूनला गेल्यावर तुम्ही बसने केदारनाथला जाऊ शकता. 

हवाई मार्गे जाणार असाल तर, सर्वात जवळचे विमानतळ आहे डेहराडून. याशिवाय तुम्ही दिल्ली विमानतळावर जाऊनही पुढे ट्रेन अथवा बस हे पर्याय वापरू शकता. 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.