रामायणाच्या नंतर रामाच्या वंशजांचे काय झाले? ते सध्याच्या घडीला आहेत का? असतील तर कुठे आहेत आणि काय करत असतील, हे प्रश्न सर्वानाच पडत असतात. कोरोनाच्या आगमनानंतर झालेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये दूरदर्शनवर पुन्हा सुरु करण्यात आलेली रामायण ही मालिका अनेकांनी पहिली असेल. मालिकेच्या शेवटच्या भागात राम जेव्हा जलसमाधी घेतो तेव्हा त्याच्या बरोबर भक्तांनाही मोक्ष प्राप्त झालेला दाखवला आहे. या चित्रानंतर रामायण संपते.
रामाच्या मृत्यूनंतर अयोध्या नगरीचे काय झाले असेल? रामाचे वंशज महाभारतात होते का? रामाचे मुलगे लव -कुश यांचे नंतर काय झाले? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. रामानंतर त्याच्या राज्याचे काय झाले असेल, असा विचार करतो तेव्हा त्याच्या वंशंजांची माहिती घेणे क्रमप्राप्त आहे. (Descendants of Lord Rama)
राजा रामाच्या पूर्वजांची सुरुवात ब्रम्हपुत्रांपासून होते. त्यांना १० पुत्र होते, त्यातील मरीची नावाचा त्यांचा एक पुत्र होता. ज्यांना रामाच्या वंशजांचे मूळ मानले जाते. मरीचीनंतर त्यांची गादी पुत्र कश्यप याने सांभाळली. कश्यपनंतर पुत्र सूर्य जन्माला आला. तो पराक्रमी असल्यामुळे त्याच्यानंतरच्या पिढीला सूर्यवंशी म्हणून संबोधण्यात आले.
सूर्यानंतर त्याचा मुलगा वैवस्वत मनू हा गादीवर बसला. त्यानंतर आलेला पुत्र इश्वाकू हा या पिढीतील पहिला राजा असल्यामुळे त्याच्यानंतर इश्वाकू वंश असे नाव देण्यात आले. इक्ष्वाकूचा मुलगा कुक्षी आला. कुक्षी नंतर विकूक्षी हा राजा आला. विकुक्षीचा पुत्र म्हणून जन्मलेला भगीरथ मोठा पराक्रमी राजा होता. त्याने त्याच्या ताकदीच्या बळावर गंगा नदीला पृथ्वीवर आणले होते.
भगीरथ नंतर त्याचा पुत्र ककुस्थ आला. ककुस्थचा पुत्र असणारा रघु हा मोठा पराक्रमी आणि प्रतापी राजा होता. त्यामुळे त्यानंतरच्या वंशाला रघुकुल वंश असे संबोधण्यात आले. रघु यांचा पुत्र प्रवृद्ध. प्रवृध्दाचा पुत्र शंख, शंखांचा पुत्र राजा अज होता. अजचा पुत्र रामाचे वडील दशरथ.
दशरथ राजाची चार मुले -राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राम हा चार भावंडांमध्ये सर्वात मोठा होता. थोरला असल्यामुळे त्याला राजा बनवण्यात आले. राम हा रघुकुल वंशात किती नंबरचा राजा होता यावरून इतिहासात पण वाद आहेत. पण जर सूर्यवंशी वंशापासून आपण वंशाला मोजायला सुरुवात केली तर राम हा ६३ वा राजा होता. (Descendants of Lord Rama)
====
हे देखील वाचा: गीत रामायणाचा आत्मा: माणिक वर्मा
====
रामाचे दोन पुत्र -लव आणि कुश. रामाच्या तीन भावांना दोन दोन पुत्र होती. भरतला तक्ष आणि पुष्कर, लक्ष्मणला चित्रांगद आणि चंद्रकेतु, तर शत्रुघ्नचे सुभाहू आणि शत्रुघटी. जेव्हा रामाने त्याचे शासन वसवले तेव्हा या सर्व राजांनी त्यांच्या मुलांना वेगवेगळ्या ठिकाणची राज्ये देऊन राज्यकारभार करण्यासाठी मार्गदर्शन केले.
राजा भरतने गंधर्व प्रदेश जिंकून त्याचा राज्यकारभार मुलांच्या ताब्यात दिला. त्या दोघांनी नावाप्रमाणे पुष्करावती आणि तक्षशिला साम्राज्य उभे केले. तक्षशिला हे इतिहासात शिक्षणाचे महत्वाचे केंद्र होते. ते सध्या पाकिस्तान देशात रावळपिंडी जवळ आहे. त्याच्या दुसऱ्या मुलाने वसवलेले पुष्करावती शहरही पाकिस्तानमध्येच पेशावर जवळ आहे.
रामाचे राज्य इतिहासातील सर्वोत्तम राज्यांपैकी एक समजले जाते. त्याच्या राज्यात जनता सुखी होती आणि सगळे गुण्यागोविंदाने राहत होते. जेव्हा रामाचा मृत्यू झाला तेव्हा त्रेतायुगाची समाप्ती झाली आणि द्वापर युग सुरु झाले. राम स्वर्गवासी होण्याच्या आधी त्याने राज्याची विभागणी केली. लव याला उत्तर कौशल आणि कुश याला दक्षिण कौशल राज्य देण्यात आले.
====
हे देखील वाचा: चुकूनसुद्धा वाचू नका ही ३ रहस्यमयी पुस्तके, वाचाल जाल सैतानाच्या ताब्यात!
====
लव हा नंतर मेवाड राजस्थान येथे राहायला गेला. त्या राज्याचे प्रतीक सूर्यदेवता आहे. कुश राजाने कुशावती नगर वसवले. ते सध्या छत्तीसगढ राज्यात विलासपूर जिल्ह्यात आहे. कुशने नागवंशीय मुलीसोबत विवाह केला. जे पी मित्तल यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ एन्सीएन्ट इंडिया’ या पुस्तकामध्ये असुरासोबत झालेल्या युद्धात कुशचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. (Descendants of Lord Rama)
महाभारतात कौरवांच्या विरोधात रामाच्या वंशजाने युद्ध केल्याचे पुरावे इतिहासात आढळून येतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण गौतम बुद्ध हेही रामाचे वंशज होते. राम मंदिराची केस जेव्हा न्यायालयात उभी राहिली होती तेव्हा रामाच्या वंशजांची चर्चा झाली होती. ९ ऑगस्ट २०१९ ला जयपूर येथे दीपा कुमारी यांनी रामाचे वंशज असल्याचा दावा केला होता. त्यांचा दावा किती खरा आणि खोटा हे त्यांनाच माहिती असावे.
तर, ही हत्ती रामाची वंशावळ (Descendants of Lord Rama). याबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा.
– विवेक पानमंद