अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची लवकरच शपथ घेणा-या डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा एरिक यांनी ख्रिसमसच्या आधी, एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. या फोटोतील अर्थ समजल्यावर अमेरिकेच्या शेजारील देशांमध्ये खळबळ उडाली. या फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या मोबाईलवर शॉपिंग कार्टकडे पाहत आहेत. यात एका बाजुला कॅनडा, मध्यभागी ग्रीनलँड आणि खाली पनामा कालवा दिसत होता. ट्रम्प हे निवडणुकीत विजयी झाल्यापासून कॅनडाला अमेरिकेतील 51 राज्य करणार म्हणून सांगत आहेत. त्यासोबत त्यांना ग्रीनलँडलाही अमेरिकेला जोडायचे आहे. या सर्वात पनामा कालवाही ताब्यात घेऊन त्यांना ग्रेटर अमेरिका करायचे आहे. असेच काहीसे आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या बाबतीतही झाले आहे. नेत्यान्याहू यांचेही ग्रेटर इस्रायल करायचे स्वप्न असून त्यांनी ‘संयुक्त इस्रायल’चा नकाशाच प्रसिद्ध केला आहे. (Israel)
त्यांच्या या अखंड इस्रायलच्या नकाशामुळे संपूर्ण अबर जगतात खळबळ उडाली आहे. जगात सध्या अमेरिका आणि इस्रायल हे देश त्यांच्या नव्या नकाशामुळे वादात सापडले आहेत. ग्रेटर अमेरिकेची मनिषा व्यक्त करुन डोनाल्ड ट्रम्प वादात सापडले आहेत. कॅनडा, ग्रीनलॅंड मध्ये त्यांना विरोध करण्यात येत असला तरी डोनाल्ड ट्रम्प ग्रेटर अमेरिका हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगतात. तसेच एक पाऊल आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी टाकले आहे. नेतान्याहू यांनी ‘संयुक्त इस्रायल’चा नकाशा प्रसिद्ध केला आहे. सध्या मध्यपूर्वेमध्ये सर्वत्रच युद्धाचे ढग आहेत. अशा परिस्थितीत या नव्या इस्रायलच्या नकाशाने अरब देशांमध्ये संताप व्यक्त कऱण्यात येत आहे. इस्रायलच्या या नव्या नकाशाला ग्रेटर इस्रायल असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच अखंड इस्रायल. यामध्ये लेबनॉन, जॉर्डन, सीरिया, इराक, पॅलेस्टाईन, इजिप्त आणि अगदी सौदी अरेबियाचा मोठा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या देशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (International News)
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर एक जुना नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्याखाली, इस्रायलला ग्रेटर इस्रायल बनवण्यासाठी वचनबद्ध आहे, या ग्रेटर इस्रायलमध्ये संयुक्त इस्रायल, ज्यामध्ये लेबनॉन, जॉर्डन, सीरिया, इराक, पॅलेस्टाईन, इजिप्त आणि सौदी अरेबियाचे अनेक क्षेत्र समाविष्ट आहे, अशी टिपही टाकण्यात आली आहे. शिवाय 3 हजार वर्षांपूर्वी या भूमीवर ज्यूंचे राज्य होते. राजा शौल, राजा डेव्हिड आणि राजा शलमोन यांनी येथे 120 वर्षे राज्य केले. या काळात यहुदी धर्माचा सर्वाधिक प्रसार झाला, परंतु नंतर अरब खलिफा येथे सत्तेवर आले आणि मुस्लिम येथे स्थायिक होऊ लागले. कॅल्डियन साम्राज्याच्या हल्ल्यांनंतर, अरब खलिफांनी या भूमीवर राज्य करण्यास सुरुवात केली आणि मुस्लिमांची या भूमीवरील वसाहत वाढू लागली. परंतु इस्रायल आजही आपल्या या मुळ भूमीला विसरलेला नाही आणि तो अजूनही एक संयुक्त इस्रायल निर्माण करू इच्छितो. (Israel)
===============
हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
अशी सविस्तर टिप टाकल्यामुळे अरब देशांच्या संतापात अधिक वाढ झाली आहे. हा नकाशा जाहीर झाल्यावर लगेच या मुस्लिम देशांनी इस्रायलच्या दाव्यावर तीव्र शब्दात आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. इजिप्त, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि लेबनॉनच्या सरकारने या नकाशाला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत आहे. फारकाय पण नकाशावर पॅलेस्टाईन आणि हमासनेही टीका केली आहे. तसेच इस्रायलचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असेही सांगितले आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या नावाखाली हा नकाशा अरब भाषेमध्येच सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे या अरब देशात अधिक नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हा सर्व वाद सुरु असतांनाही इस्रायलनं सदर नकाशा सोशल मिडियावरुन हटवला नाही. तर याबाबत अधिक स्पष्टीकरण देत आपल्या जुन्या सीमांपर्यंत इस्रायलचा विस्तार होणारच अशी पोस्ट शेअर केली आहे. सध्या मध्यपूर्वेतील वातावरण पाहता, इस्रायलनं प्रकाशीत केलेल्या या नकाशावरुन सुरु झालेला वाद लवकर मिटेल अशी शक्यता नाही. (International News)
सई बने