इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी अमेरिका-इस्रायल संयुक्त हल्ल्यात मारले गेल्यानंतर इराणने दुबई, कतार, बहरीन, जॉर्डन आणि अबुधाबी यांच्यावर हल्ले केल्याची माहिती आहे. खामेनी यांच्या पश्चात या हल्ल्यांचे नेतृत्व कोण करत आहे, हा प्रश्न उपस्थित होत असतानाच इराणच्या सर्वात शक्तिशाली लष्करी दलाचे, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे नाव पुढे येत आहे. IRGC चे मुख्य कमांडर मोहम्मद पाकपूर हे या हल्ल्यात मारले गेल्याचे सांगितले जात आहे. IRGC ची स्थापना कट्टर इस्लामिक तत्त्वांवर आधारित आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी IRGC ला शरणागती पत्करण्याचा इशारा दिला असला, तरी IRGC चे सैनिक शरण जाणार नसल्याची भूमिका घेत असल्याचे म्हटले जाते. खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी IRGC चे सैनिक अमेरिकेच्या लष्करी छावण्या असलेल्या देशांवर हल्ले करत असल्याची माहिती आहे. तसेच IRGC ने अमेरिकन लष्करी तळांवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. ( Islamic Revolutionary Guard Corps )

IRGC च्या या भूमिकेमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये तणाव वाढला आहे. IRGC चे सैनिक कट्टर आणि निष्ठावान मानले जातात. खामेनी हे त्यांच्यासाठी सर्वोच्च नेते होते, आणि त्यांच्या मृत्यूस कारणीभूत देशांना धडा शिकवण्यासाठी IRGC विशेष योजना आखत असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कठोर कारवायांमुळे IRGC ला ओळखले जाते. अमेरिकेने यापूर्वीच IRGC ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर IRGC ची लष्करी तुकडी बदला घेण्यासाठी सज्ज झाल्याचे सांगितले जाते. IRGC चा इराणच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. अनेक इराणी राष्ट्रपतींनी IRGC मधूनच आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. IRGC मधील कमांडरना प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त केले जाते. सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेची जबाबदारीही IRGC कडेच असते. त्यामुळे IRGC केवळ सर्वोच्च नेत्याशी निष्ठावान राहते आणि त्यांच्या आदेशानुसार कार्य करते. IRGC ची स्थापना १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर सर्वोच्च नेतृत्वाचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली. इराणचे स्वतंत्र नियमित सैन्य असले तरी IRGC चे स्थान वेगळे आणि अधिक प्रभावशाली आहे. IRGC मधील अधिकारी थेट सर्वोच्च नेत्यांना अहवाल देतात, आणि आदेशही त्यांच्याकडूनच घेतात.
=======
हे देखील वाचा : Ayatollah Arafi: सर्वोच्च नेते अयातुल्ला अलिरेझा अराफी आणि पहिला फतवा
=======
आज IRGC कडे स्वतःचे स्थलसेना, नौदल आणि हवाई दल आहे. त्याचबरोबर ‘कुद्स फोर्स’ नावाची स्वतंत्र युनिट आहे, जी परदेशातील कारवाया करते. इराणमध्ये खामेनी यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनांचे दमन करण्यात IRGC ची मोठी भूमिका होती, असे म्हटले जाते. IRGC ची ताकद इतकी आहे की, इराणने कोणत्या देशावर हल्ला करायचा किंवा नाही, याबाबतही त्यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. नवीन लष्करी तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची जबाबदारीही IRGC कडे असते. इराणच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग असलेले तेल व्यवहारही IRGC च्या नियंत्रणाखाली असल्याने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत. एप्रिल २०१९ मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने IRGC ला दहशतवादी संघटना घोषित केले. कोणत्याही देशाच्या सरकारी लष्करी तुकडीला अमेरिकेने पहिल्यांदाच अशा यादीत समाविष्ट केले होते. त्यानंतर युरोपियन युनियननेही २०२६ मध्ये IRGC ला दहशतवादी संघटना घोषित केल्याची माहिती आहे. IRGC वर इतर देशांतील गटांना पाठिंबा देण्याचे आरोप आहेत. लेबनानमधील हिजबुल्लाह, गाझातील हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यांसारख्या गटांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गटांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याचे सांगितले जाते. सायबर हल्ल्यांमध्येही IRGC चा सहभाग असल्याचे आरोप आहेत. यामुळेच अनेक देशांनी IRGC ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. आता IRGC ने इस्रायल आणि अमेरिकेविरोधात बदला घेण्याचा इशारा दिल्याने तणाव अधिक वाढला आहे. ( Islamic Revolutionary Guard Corps )
– सई बने
