इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांमुळे तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. सुरुवातीला देशातील आर्थिक संकटाने आंदोलनाची सुरुवात झाली, आणि आता थेट सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजवटीला आव्हान देण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून इराणमधील वास्तविक परिस्थितीही आता जगासमोर येत आहे. इराण हा शिया मुस्लिमांचा देश म्हणून ओळखला जातो. येथे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजवटीत कट्टरवादाला अधिक बळ देण्यात आले. मात्र आता त्याच कट्टरवादाचे परिणाम दिसू लागले आहेत. कारण इराणमधील ७५,००० मशिदींपैकी ५०,००० मशिदींना टाळं लागलं आहे. ( Iran Protests )

या मशिदीमध्ये नमाज पडण्यासाठी जाणा-यांची संख्या ही हातावर मोजण्याइतकीही नाही. उपासकांच्या घटत्या संख्येमुळे या मशिदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इराणच्या तरुणांनी आपल्याच धर्मातील अतिरेकामुळे या मशिदींकडे पाठ फिरवली आहे. देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई यामुळे हे तरुण एकतर विदेशात जाणे पसंत करत आहेत, आणि ज्यांना विदेशात जाण्याची संधी मिळत नाही, ते खामेनी यांचे सरकार कधी जाईल, या प्रयत्नात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून इराणच्या मशिदी ओस पडल्या आहेत. इराणमधील ९९% लोकसंख्या शिया पंथाचे पालन करते. याशिवाय या देशात सुन्नी मुस्लिमही असून ते अस्पसंख्याकांमध्ये येतात. सोबत ख्रिश्चन, यहुदी आणि झोरोस्ट्रियन धर्म यासारखे अन्य धर्म या देशात आहेत. इराणमधील ९९ टक्के मुस्लिम लोकसंख्येपैकी ९०-९५% शिया आणि ५-१०% सुन्नी आहेत. शिया इस्लाम हा इराणचा अधिकृत धर्म आहे. मात्र आता याच शिया मुस्लिंमांनी मशिदींकडे पाठ केल्यानं या मशिदी बंद करण्यात येत आहेत.
याबाबत येथील मौलवींनी चिंता व्यक्त केली असून लोकांची धर्मावरील आवड कमी होणे हे चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. इराणमधील मौलाना मोहम्मद अबोलघासेम दौलाबी यांनी ही सर्व आकडेवारी गोळा केली, सोबतच इराणमधील तरुण आपल्या धर्मापासून का वेगळे होत आहेत, हे कारणही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातून पुढे आलेल्या वास्तवाने येथील कट्टरवादी मौलांनाना धक्का बसला आहे. मौलाना मोहम्मद अबोलघासेम दौलाबी हे प्रशासन आणि देशातील धार्मिक शिक्षण संस्था यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. ते ‘असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स’ या विचारविनिमय करणाऱ्या संस्थेचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे, हीच संस्था इराणच्या सर्वोच्च नेत्याची निवड करते. ( Iran Protests )
त्यांनी आपला हा अहवाल इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याकडे दिला होता. मात्र या अहवालाकडे खामेनी यांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे आत्ता देशात आंदोलनाची स्थिती निर्माण झाली असल्याचेही मत व्यक्त होत आहे. इराणमध्ये मशिदींमध्ये तरुणवर्ग येत नसल्याबद्दल पाहणी करण्यात आली. त्यात फक्त तरुण वर्ग नाही तर सर्व वयोगटातील इराणी लोक सरकारकडून क्रूर हुकूमशाहीचा आधार म्हणून वापरल्या जाणाऱ्या इस्लामच्या सबबीला कंटाळले असल्याचे उघड झाले.
त्यात हिजाब विरोधात आंदोलनात मारल्या गेलेल्या महसा अमिनीच्या मृत्यूनतंतर देशातील कट्टरतावादाला घातक मानणा-यांची संख्या वाढली. त्याचा परिणाम येथील मशिदींवर झाला. सद्यपरिस्थितीत इराणमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये मशिदीमध्ये प्रवेश करतांना आवश्यक असलेल्या पेहरावावरही अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. इराणमध्ये इस्लामिक क्रांतीपूर्वी पुरुषही आधुनिक पेहराव करत होते. तिथे आता त्यांनाही मशिदीत जातांना पेहरावाचे बंधन पाळावे लागते. ( Iran Protests )
=======
हे देखील वाचा : USA Targets Greenland : खनिजांच्या अपार साठ्यामुळे ट्रम्प यांना हवे आहे ग्रीनलॅंड
=======
शिवाय धार्मिक संघर्षामुळेही इराणमधील लोक धर्मापासून दुरावत असल्याचे या पाहणीत उघड झाले आहे. अयातुल्ला खामेनी यांनी धर्माच्या रक्षणासाठी म्हणून एक विशेष पोलीस दल तयार केले आहे. या पोलीस दलाला अनेक अधिकार आहेत. त्यातून धर्माच्या विरोधात वर्तन दिसल्यास त्या व्यक्तीला सार्वजनिक जागी फटके मारण्याची मुभा या पोलीसांना आहे. या सर्वांला येथील तरुण वर्गाचा वाढता विरोध आहे. खामेनींच्या या पोलीसांनी धर्माचा अतिरेक केला आहे, त्याचाही परिणाम म्हणून तरुण मुस्लिम धर्मापासून वेगळं होत, आता ते ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित होत असल्याचेही या पाहणीत आढळून आले आहे. खामेनी यांनी या अहवालाकडे वेळीच लक्ष दिले असते तर आज इराणमधील परिस्थिती वेगळी असती, अशी खंत व्यक्त होत आहे. ( Iran Protests )
सई बने….
