Home » Iran Woman Protest : सिगरेटनं खामेनींची फोटो जाळून इराणी महिलांचा आगळा निषेध

Iran Woman Protest : सिगरेटनं खामेनींची फोटो जाळून इराणी महिलांचा आगळा निषेध

by Team Gajawaja
0 comment
Iran Woman Protest
Share

ज्या देशातील महिलांच्या बुरख्यामधून एखादी केसाची बट जरी बाहेर आली, तर त्या महिलांना चौकामध्ये जाहीरपणे चाबकाचे फटके मारण्यात यायचे, आज त्याच देशातील तरुणी, सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा फोटो सिगरेटनं जाळत आहेत. ही परिस्थिती आहे, इराणची. इराणमध्ये कट्टरवादी नेते अयातुल्ला खामेनी यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा अखेरचा टप्पा सुरु झाला आहे. इराणमधील प्रत्येक शहरात आता खामेनींच्या कट्टरवादाविरोधात आंदोलन सुरु झाले असून देशातील मुल्ला मौलवींच्या विरोधात मोठ्या संख्येनं तरुणी रस्त्यावर उतरल्या आहेत. ( Iran Woman Protest )

या तरुणींनी हिजाब टाकून दिला असून खामेनी यांनी आत्तापर्यंत केलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी त्यांचा फोटो हाती घेत, त्याला सिगरेटनं जाळून आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली आहे. ही महिलांची कृती स्थानिक राज्यकर्त्यांना शब्दांपलीकडे संदेश देत असून महिलांवर लादलेल्या कट्टर धार्मिक नियमांना त्यातून आव्हान देण्यात येत आहे. इराणमधील तरुणींनी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या विरोधात आपल्या निषेधाची तीव्रता वाढवत त्यांच्या फोटोला सिगारेटनं जाळण्यास सुरुवात केली आहे. या तरुणी हे फोटो आणि व्हिडिओ सेशल मिडियावर शेअर करुन खामेनी यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.

Iran Woman Protest

Iran Woman Protest

तीन वर्षापूर्वी इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या महसा अमिनीची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर इराणमधील तरुणींनी हे आंदोलन सुरु ठेवले होते. मात्र खामेनींनी या आंदोलनातील तरुणींना अटक करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी खामेनीविरोधातील आंदोलनात याच तरुणी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरल्या. त्यांनी हिजाब नाकारत महिलांवर लादलेल्या कठोर सामाजिक आणि धार्मिक नियमांचा निषेध नोंदविला आहे. इराणमधील महिलांनी नोंदविलेला हा निषेध राज्य आणि व्यवस्थेला थेट आव्हान मानला जात आहे. ( Iran Woman Protest )

इराणमध्ये सुरु आता सुरु झालेल्या या आंदोलनाची पायाभरणी सप्टेंबर २०२२ मध्येच झाली होती. तेव्हा २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीनं हिजाबला नकार देत, धार्मिक कट्टरवादाला आव्हान दिले होते. साक्केझ या गावातून आलेल्या महसाला हिजाब कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यातच तिला गंभीररित्या मारहाण झाली. महसाला रुग्णालयात हलवण्यात आले, पण तीन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे हिजाबविरोधातील आंदोलन पेटले. २०२३ पर्यंत या आंदोलनाची धग जाणवत होती. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतरचे हे सर्वात मोठे आंदोलन मानले गेले. मात्र त्यानंतर हे आंदोलन थंडावले. ( Iran Woman Protest )

अयातुल्ला खामेनी यांनी या आंदोलनातील प्रमुखांना अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात केली. वास्तविक आंदोलन वरवर शांत झाल्यासारखे वाटले. पण एकूणच इराणमधील वाढत्या कट्टरवादाविरोधात यातून तरुणवर्ग एकटवत गेला. इराणच्या गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार महसा अमिनीला केलेल्या मारहाणीमुळे हजारो तरुणांना देशातील आपले अस्तित्व हे धोक्यात असल्याची जाणीव झाली. त्यातूनच प्रस्थापित सरकार उलथवून टाकण्याच्या आंदोलनाची मुळे रोवली गेली.

इराणच्या रस्त्यावर आज मोठ्या संख्येनं रस्त्यावर जे तरुण उतरले आहेत, तेही याच भावनेतून उतरले आहेत. या तरुणांमधला असंतोष शांत कऱण्यासाठी आता ८६ वर्षीय खामेनी असमर्थ ठरले आहेत. कारण त्यांच्या राजवटीतील भ्रष्टाचारानं इराणची आर्थिक व्यवस्था पोखरली आहे. खामेनी यांनी त्यांच्याविरोधातील असंतोष जाणूनच सुरुवातीला आंदोलन करणा-या तरुणांकडे दुर्लक्ष केले. तसेच रस्त्यावर खुलेपणानं हिजाब टाकून देणा-या तरुणींनाही कुठलिही शिक्षा झाली नाही. मात्र हेच आंदोलन उग्र झाल्यावर सुरक्षा दलांना आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ( Iran Woman Protest )

=======

हे देखील वाचा : Monarchy Demand in Iran : इराणच्या तरुणांना हवी राजेशाही

=======

यात आत्तापर्यंत २१७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणमधील जवळपास सर्वच शहरातील इंटरनेट आणि फोन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. या सर्वात इराणचे पदच्युत ६५ वर्षीय क्राउन प्रिन्स रझा पहलवी पुन्हा आपल्या देशात येण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. इराणमध्ये १९७९ मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर, अयातुल्ला रुहोल्ला खामेनी सत्तेवर आले. त्यांनी १९७९ ते १९८९ पर्यंत, १० वर्षे सर्वोच्च नेते म्हणून काम केले.

त्यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, १९८९ पासून सत्तेत आहेत. या ३७ वर्षाच्या काळात खामेनी यांनी इराणला उच्च महागाई, आंतरराष्ट्रीय निर्बंध, बेरोजगारी, चलन अवमूल्यनाच्या गर्तेत लोटले आहे. या सर्वात महिलांवर होत असलेल्या अत्याचारातही लक्षणीय वाढ झाली. त्यामुळेच खामेनींविरोधात साठलेला असंतोष आता बाहेर पडत असून ही खामेनींच्या सत्तेची अखेर मानण्यात येत आहे. ( Iran Woman Protest )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.