शीर्षक वाचून आपलीं काय समजूत होईल याची कल्पना आहे. आपल्याला निश्चितपणे वाटेल की आईपिएल मुळे झालेल्या आर्थिक फायदे तोट्याचे विश्लेषण करणे हा या लेखाचा उद्देश आहे. पण मित्रहो मी फायदे-तोट्याचेच गणित मांडणार आहे पण ते आर्थिक स्वरूपाचे नसून भारतातील क्रिकेट या खेळासंबंधी आहे.
आपल्या सर्वाना माहित असेल की २००८ पासून भारतात ‘इंडियन प्रीमियर लीग’ नावाचा उरूस / इव्हेंट सुरु झाला. ही टूम निघाली तिचे मूळ त्यापूर्वी २००५ मध्ये सुरु झालेल्या इंडियन क्रिकेट लीग या खाजगी स्पर्धेमध्ये आहे. ही लीग चालू केली होती ती उद्योगपती गोयल यांनी. कपिलदेव हा या स्पर्धेचा मुख्य समन्वयक होता. भारतातील तसेच परदेशातील अनेक खेळाडू यात सामील झाले ते आर्थिक लाभाच्या आशेने. त्यातच भारताने टी२० चा पहिलावहिला विश्वचषक २००७ मध्ये जिंकल्याने भारतात टी२० रुजण्यास व लोकप्रिय होण्यास मदत झाली.
भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI)ने इंडियन क्रिकेट लीगला अनधिकृत ठरवून त्यात सामील झालेल्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पदाधिकारी याना भारतीय मंडळाच्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्यास बंदी घातली. पण BCCI ने एक ओळखले की टी२० लीग ही कामधेनू होती आणि ती दुसऱ्याच्या दारात बांधलेली होती हे खरे दुखणे होते.
पायाळू माणसाला जसे जमिनीखाली पाणी कुठे आहे ते समजते त्याप्रमाणे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट मंडळाला यात असलेल्या आर्थिक घबाडाचा अचूक वास लागला. त्यातच मंडळाला ललित मोदी सारखा ‘लीलाधर’ गवसला आणि इंडियन प्रीमियर लीगचा वारू २००८ पासून चौखूर उधळायला सुरुवात झाली. फुटबॉलच्या धर्तीवर क्रिकेट खेळाडूंचा लिलाव सुरु झाला आणि खेळाडू हे ‘विकाऊ’ वस्तू बनले.
भारतीय जनमानसाला हे नवीन होते पण बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना याची नस अचूक उमजली आणि त्यांनी निरनिराळ्या शहरांच्या नावाने स्वतःचे संघ उभे केले. त्यांचा उद्देश आपली ब्रँड व्हॅल्यू वाढवणे हा होता. क्रिकेटच्या भल्याबुऱ्याशी त्यांना देणेघेणे नव्हते आणि नाही. भारतीय मंडळाला यातून मिळणारा आर्थिक लाभ महत्वाचा वाटला. पहिल्या काही वर्षात क्रिकेटबाह्य गोष्टींमुळे आईपीएल चर्चेत राहिले आणि याची परिणती ललित मोदींची गच्छंती होण्यात झाली. आता आईपीएल हीच भारतीय क्रिकेटची ओळख बनली आहे.
आता तर आईपीएल साठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे तसेच देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक बदलले जाते. कोरोना काळात भारतातील रणजी, दुलीप इराणी ट्रॉफी तसेच देवधर ट्रॉफी, हजारे ट्रॉफी यासारख्या खूप वर्षाची परंपरा असलेल्या स्पर्धा रद्द केल्या गेल्या पण आईपीएल रद्द करण्याची BCCI ची हिम्मत झालीं नाही कारण यात गुंतलेले आर्थिक हितसंबंध. भारतात नाही तर अबू धाबी, आफ्रिका या देशात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.
मुंबईतील लोकल सेवेला जसे मुंबईची जीवन वाहिनी (life line) म्हटले जाते त्याप्रमाणे रणजी स्पर्धेला भारतीय क्रिकेटची जीवनदायिनी म्हटले तर वावगे ठरू नये. भारताला कसोटी सामने खेळायला लागून जवळजवळ ९० वर्षे झाली. कसोटी सामन्यांसाठी गुणवान खेळाडूंचा पुरवठा सातत्याने रणजी स्पर्धेद्वाराच होत आला. सर्व दर्जेदार खेळाडूंची नावे येथे घेणे सर्वस्वी अशक्य आहे पण वानगीदाखल काही नावे सांगता येतील, उदाहरणार्थ विजय मर्चन्ट, विनू मंकड, पॉली उम्रीगर ते सुनील गावस्कर, विश्वनाथ, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड इथपर्यंत.
हे सर्व खेळाडू खेळातील सर्व चढ उताराना तोंड देत कसोटीसाठी परिपक्व झाले. जसे संगीतात शास्त्रीय संगीताचा पाया पक्का असेल तर कुठलेही संगीत सहज हाताळता येते त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये कसोटीचे तंत्र घोटवले तर एक दिवसीय तसेच टी२० क्रिकेट खेळणे सोपे जाते.
या पार्श्वभूमीवर आईपीएल चे गुणदोष थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील :
१- संधीची मुबलकता –
रणजी स्पर्धेत खेळण्याची व त्याद्वारे कसोटीची द्वारे उघडण्याची संधी मर्यादित खेळाडूंनाच मिळत होती.
आईपीएल मुळे देशातील सर्व स्तरावरील गुणवान खेळाडूंना लक्ष वेधून घेण्याची संधी मिळाली.
२- मानसिक कणखरता –
आईपीएल हे १०० मीटर च्या रेस प्रमाणे आहे. केवळ २० षटकांच्या खेळात फलंदाज व गोलंदाजांचा शारीरिक आणि मानसिक कस लागतो त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याची मानसिक कणखरता आपोआप अंगी बाणते.
३- अनुभवाची समृद्धी –
आईपीएल मुळे भारतातील नवोदित युवा खेळाडूंना परदेशी दिग्गज खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाल्याने त्यांची भीड चेपली जाते आणि असंख्य टिप्स मिळतात.
४- आर्थिक समृद्धी –
हा सर्वात महत्वाचा फायदा म्हणावा लागेल. या स्पर्धेमुळे समाजातील वंचित आणि दुर्बल गटातील खेळाडूंना संधी मिळून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली आहे.
५- राष्ट्रीय संघात प्रवेश –
सध्याच्या राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडू हॆ आईपीएल मुळे प्रकाशात आले आहेत. उदाहरणार्थ मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती इ.
आता आपण आईपीएल चे तोटे बघू या –
१- स्टॅमिनाचा अभाव –
झटपट क्रिकेटमुळे कसोटीसाठी आवश्यक दीर्घ काळ खेळण्याचा स्टॅमिना या खेळाडूंकडे नसतो. त्यामुळेच आपण पाहतो की कपिल देव सारखे ४०-५० ओव्हर्स टाकणारे जलदगती गोलंदाज आता मिळत नाहीत तर गावस्कर, द्रविडसारखे दिवसभर फलंदाजी करणारे खेळाडू अभावानेच आढळतात.
२- दुखापती –
अति जलद क्रिकेटमुळे व खेळाच्या प्रचंड ताणामुळे खेळाडूंच्या दुखापतींचे प्रमाण फार वाढले आहे व याचा फटका भारतीय संघाला वारंवार बसत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर रोहित शर्माला मध्यंतरीच्या काळात दीर्घ काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. हार्दिक पंड्या हे अजून एक उदाहरण आहे.
३- तांत्रिक दोष –
टी२० चे उद्दिष्ट कमीतकमी ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचे असल्याने तंत्राला मूठमाती देऊन वाटेल तसे फटके मारण्याची लागलेली सवय कसोटीसाठी घातक ठरते. गोलंदाज सुद्धा विकेट्स घेण्याऐवजी धावा रोखणारी गोलंदाजी करण्यात धन्यता मानतात.
४- राष्ट्रहित दुय्यम –
आईपीएल खेळाडू हे त्यांच्या मालकाच्या हिताला देशहितापेक्षा अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. राष्ट्रीय कसोटी / एक दिवसीय मालिकेपेक्षा आईपीएल अधिक लाभदायक असल्याने खेळाडू कसोटी क्रिकेटमधून अंग काढून घेतात. नुकतीच इंग्लंडमधील पाचवी कसोटी कोरोनाच्या सबबीखाली रद्द करायला लावून खेळाडू आईपीएल साठी रवाना झाले. तेथे कोरोनाचा शिरकाव होऊन सुद्धा स्पर्धा चालू आहे.
एकूणच आईपीएल ही २१ व्या शतकाच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिची अपरिहार्यता स्वीकारावीच लागणार आहे हे निर्विवाद.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.