भारतात किंबहुना संपूर्ण जगभरात विविध प्रकारचे अनेक दिवस साजरे केले जातात. महिला दिन, बालदिन, मदर्स डे, फादर्स डे आदी अनेक दिवस आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरे करत असतो. अनेक दिवस कमालीचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय असतात. असाच एक दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. (International Men’s Day) अनेकांच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा दिवस ऐकून भुवया उंचावल्या असतील. मात्र जगातील जवळपास ६० देशांमध्ये १९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो.
आपल्या समाजातील आणि कुटुंबातील पुरुषांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. आपला भारतीय समाज हा नेहमीच पुरुषप्रधान राहिला आहे. मात्र आजच्या आधुनिक काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना जरा वरचढ होऊन सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडत स्त्रिया आज जरी सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्या तरी पुरुष हा आपल्या समाजाच्या अतिशय महत्वाचा भाग आहे.
आजच्या काळात काही प्रमाणात पुरुषांना त्यांचे हक्क, अधिकार याची जाणीव करून देते आवश्यक आहे. या दिवसाच्या निमित्ताने हे काम केले जाते. महिलांच्या तुलनेत कमी प्रमाण असले तरी पुरुष देखील घरगुती हिंसेला बळी पडतात, त्यांच्यावर देखील अत्याचार होतात. आदी अनेक गोष्टींबद्दल त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस महत्वाचा ठरतो. सोबतच पुरुषांचे मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचे कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणे आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभांवर आधारित आहे, जे समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित करतात. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनामध्ये मानसिक आरोग्य, टॉक्सिक पुरुषत्व, पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण, पुरुषांच्या आरोग्याला चालना देणे, लैंगिक संबंध सुधारणे या विषयांचा समावेश होतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिनी लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास
1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करताना आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. यानंतर काही वर्षांतच १९ नोव्हेंबर ही तारीख हळूहळू जगभर लोकप्रिय होऊ लागली. १९ नोव्हेंबर २००७ रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व
आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा समाजाला पुरूषांचे तंदुरुस्ती आणि आरोग्य, त्यांचे संघर्ष आणि पुरूष वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती देण्याचा आहे. या दिवशी पुरुषांवरील भेदभावाबद्दल देखील बोलले जाते आणि चांगले लैंगिक संबंध निर्माण करण्याचे आश्वासन दिले जाते. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्व
एका अभ्यासानुसार या जगात महिलांपेक्षा तीन पट जास्त पुरुष आत्महत्या करत आहेत. तर ३ पुरुषांमागे एक हा पुरुष घरगुती हिंसाचाराचा बळी ठरत आहे. पुरुष स्त्रियांपेक्षा ४ ते ५ वर्ष आधी मरण पावत आहेत. तसेच स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता दुपट्टीने अधिक असते. त्यामुळे पुरुष दिन हा या आणि अशा अनेक गोष्टींवर काम करताना पुरुषांच्या ओळखीच्या सकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2024 थीम
यावर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यासाठी एक विशेष थीम निश्चित करण्यात आली आहे. यंदाची थीम ‘पॉझिटिव्ह मेल रोल मॉडेल्स’ अशी निश्चित करण्यात आली आहे. समुदायासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या पुरुषांचा सन्मान करणे हा या थीमचा उद्देश आहे.