15 ऑगस्ट! आपला स्वातंत्र दिन उत्साहाने साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अनेक चित्रपटही प्रदर्शित होतात आणि झालेही आहेत. यापैकीच एक चित्रपट म्हणजे शोले (Sholay). शोले या चित्रपटानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन ओळख दिली. समिक्षकांनी पहिल्यांदा टिका केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर डोळे दिपवेल अशी कमाई केली. 15 ऑगस्ट 1975 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी भारतात आणीबाणी होती. त्यामुळे या चित्रपटातील अनेक दृष्यांना कात्री लागली. रमेश सिप्पी यांच्या या चित्रपटांनं भारतीयांना खरं स्वातंत्र्य दाखवलं. हे स्वातंत्र्य कलेच्या विश्वातील होतं…भारतीय चित्रपटसृष्टीचं सामर्थ्यदाखवणाऱ्या शोलेच्या निर्मितीची कहाणीच वेगळी आहे.
“कितने आदमी थे, जो डर गया, समझो मर गया, बहोत याराना लागता है….” अशा एकापेक्षा एक संवादांनी भरलेल्या शोलेची कथा सलीम जावेद यांनी लिहिली आहे. प्रसिद्ध जापनीज दिग्दर्शक अकीरा कुरोसावा यांच्या 1954 मध्ये आलेल्या सेवन समुराई या चित्रपटावर शोलेची काहीशी कथा आधारीत आहे. त्याचप्रमाणे ग्वालेहमध्ये गब्बर सिंह नावाच्या एका डाकूच्या दहशतीचाही शोलेच्या कथेमध्ये वापर करण्यात आला आहे.
1950 च्या आसपास हा गब्बरसिह पोलीसांना पकडून त्यांचे कान आणि नाक कापायचा. या सर्व संदर्भाचा वापर करत सलीम जावेद यांनी जय आणि विरुची जोडी पडद्यावर आणली. सोबत गब्बरसिंगलाही आणलं. आत्तापर्यंत कुठल्याही चित्रपटात एक हिरो असायचा…पण शोलेमध्ये तीन हिरो होते. विरु-जय यांच्यासोबत डाकू गब्बरसिंगही हिरोच झाला. कारण अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या तोडीस तोड भूमिका गब्बरसिंग झालेल्या अमजद खानच्या वाट्याला आली आणि त्याने ती अजरामर करुन ठेवली. (Interesting facts about Sholay)
शोलेची कास्टमेकींगसुद्धा मजेशीर झाली. यातील प्रत्येकाला दुसऱ्याची भूमिका करायची होती. खुद्द संजीव कपूर गब्बरसिंगच्या प्रेमात पडले होते. त्यांना गब्बरसिंग साकारायचा होता. अशीच कथा यातील प्रत्येक अभिनेत्याची होती. त्यामुळे या सर्वांना समजावताना रमेश सिप्पी हैराण झाले होते.

‘जंजीर’ चित्रपट झाल्यावर सलीम आणि जावेद अख्तर यांनी शोलेची थोडक्यात कथा रमेश सिप्पी यांना ऐकवली. याआधी त्यांनी आणखीही काही दिग्दर्शकांना शोलेची कथा सांगितली होती. पण त्यांना यात काही विशेष वाटले नाही आणि त्यांना नकार दिला. शेवटी सलीम, जावेद यांनी रमशे सिप्पी यांना गाठलं. सिप्पी यांना कथा आवडली. मग त्यावर काम सुरु झालं. यापैकी पहिली कामगिरी म्हणजे योग्य कलाकार निवडणे. त्यापैकी गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी आधी डैनी डेन्जोंपा यांना विचारण्यात आलं, पण त्याचवेळी फिरोज खान यांच्या धर्मात्मामध्ये डैनी व्यस्त होते. त्यामुळे अमजद खान यांना मोठी संधी मिळाली.
रमेश सिप्पींना जयच्या भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना घ्यायचे होते. पण तेव्हा शत्रुघ्न सिन्हा अमिताभपेक्षा जास्त व्यस्त असायचे. त्यामुळे त्यांच्या तारखा मिळाल्या नाहीत. मग, अमिताभचा विचार करण्यात आला. आणि जय नक्की झाला. ठाकूरची भूमिका कोण करणार यावरुन तर अनेक वादविवाद झाले. पहिल्यांदा प्राण यांची निवड करण्याचे ठरले…पण सिप्पी संजीव कपूरसाठी अडून बसले. सलीम-जावेद यांना ठाकूरच्या भूमिकेसाठी दिलीप कुमार हवे होते. त्यात वीरुच्या भूमिकेसाठी नक्की झालेले धर्मेंद्रही ठाकूरची भूमिका करायची आहे, म्हणून हट्ट करु लागले. याचवेळी धर्मेद्र आणि हेमामालिनी यांची प्रेमकहाणीही गाजत होती. त्यामुळे धर्मेंद्र यांनी ठाकूरची भूमिका केली, तर संजीव कपूर यांना विरुची भूमिका मिळेल आणि हेमामालिनी त्यांच्याबरोबर काम करतील…अशी गोड धमकी सिप्पी यांनी धर्मेंद्र यांना दिली.
या चित्रपटाआधीच अमिताभ आणि जया यांचा विवाह झाला होता आणि सिप्पी यांना राधाच्या सोज्वळ लूकसाठी जयाच हव्या होत्या. जया यांची भूमिका नक्की झाली तेव्हा त्यांना दिवस गेले होते. त्यामुळे अभिषेकचा जन्म होईपर्यंत शुटींग लांबण्यात आलं होतं. याच चित्रपटाच्या शुटींग दरम्यान धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यात प्रेमसंबंध अधिक दृढ झाले. शोलेनंतर पाच वर्षांनी या दोघांनी लग्न केले. (Interesting facts about Sholay)
शोले चित्रपटाचं बहुतांशी चित्रीकरण कर्नाटकमधील बंगलोर येथील रामनगर या भागात झालं. येथील डोंगरावरील दगडांमध्ये डाकूंची वस्ती दाखवण्यात आली. सर्व चित्रपटाचं युनिट येथे चित्रीकरण करणार म्हणून, बंगलोर ते रामनगर रस्ता आधी तयार करण्यात आला. या भागात संपूर्ण गाव उभारण्यात आलं. तसंच असाच एक सेट मुंबईतील राजकमल स्टुडीओमध्येही तयार करण्यात आला होता. रामनगर येथील ‘शोले’ चित्रपट शूट झालेला भाग नंतर एक पर्यटन स्थळचं झालं. हजारो लोक तिथे भेट देत असतं.
1973 मध्ये शोलेचं शुटींग सुरु झालं. रमेश सिप्पी यांना पहिल्यापासून या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यामुळे ते परफेक्ट सीनसाठी अनेक रिटेक घ्यायचे. यामुळे चित्रपट तयार होण्याच्या कालावधीत वाढ झाली. ‘ये दोस्ती…’या गाण्याच्या चित्रीकरणासाठी 21 दिवस लागले. ट्रेनमध्ये चोरी होते, हे दृष्य पनवेल जवळ मुंबई-पुणे रेल्वमार्गावर चित्रित झाले. त्यासाठी सात आठवडे लागले. अर्थात या साऱ्यामुळे चित्रपटाचे बजेट खूप वाढले होते. (Interesting facts about Sholay)
एवढी मेहनत घेऊन केलेल्या या चित्रपटाला समिक्षकांची पहीली नापसंती आली होती. यात अति हिंसा दाखवली आहे, असा आक्षेप घेण्यात आला. पण रमेश सिप्पी यांना चित्रपटाच्या यशाची खात्री होती. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरला. ब्रिटीश फिल्म इंस्टिट्यूटने 2002 मध्ये सर्वश्रेष्ठ 10 भारतीय चित्रपटांमध्ये शोलेला स्थान दिलं. मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहामध्ये शोले सलग पाच वर्ष होता. त्यानंतर हा रेकॉर्ड ‘दिलवाले दु्ल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटानं मोडला. 2014 मध्ये शोलेला 3 डी रुपात साकारण्यात आले. अर्थात हा 3डी शोले बघण्यासाठीही प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. शोलेनं कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. शोले ज्या ज्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. तिथे त्यांनं रौप्यमहोत्सव साजरा केला.

यातील गाणीही तेवढीच गाजली. ये दोस्ती या अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या गाण्यात जी डबल स्कूटर वापरण्यात आली. त्या प्रकारच्या स्कूटरचीही विक्री वाढली. मेहबूबा मेहबूबा, कोई हसीना जब रूठ जाती है, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे ही गाणी बिनाका गीत मालामध्ये पहिल्या दहामध्ये वर्षभर होती. (Interesting facts about Sholay)
हे ही वाचा: सामान्य नागरिकांप्रमाणे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सुट्टी घेता येते?
एवढं होऊनही शोलेमधील एकाही कलाकाराला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही. शोलेला फिल्मफेअर मिळाला तो एडीटींगसाठी, एम एस शिंदे यांना. शोलेमधून सलीम – जावेद ही जोडीही प्रसिद्ध झाली. बॉलीवूडचे स्टार लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. रामगढच्या नागरिकांची गब्बरसिंगसारख्या डाकूच्या तावडीतून जय आणि विरू ही जोडी सुटका करुन देते. त्यांना स्वातंत्र्याचा अनुभव मिळवून देतात. अन्यायाविरुद्धच्या लढाईत व्हिलन कितीही मोठा असला तरी विजय हा चांगल्याचाच होतो, असा संदेश शोलेमधून देण्यात आला. त्यामुळेच सर्वसामान्यांना चित्रपट अधिक भावाला आणि आताही भावतोय….
– सई बने