भारतात अनेक मंदिरं आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास आहे. काही जुनी मंदिरं तर अशी आहेत, ज्यांच्याबद्दल अनेक रहस्य आजही उलगडलेली नाही. भारतात जवळपास सर्वच मोठ्या आणि जागरूक मंदिरांना मोठा वारसा लाभला आहे. या मंदिरांमध्ये अशी रहस्य आहेत, जी सोडवायचे प्रयत्न अतिशय मोठ्या प्रमाणावर करण्यात आले, मात्र यश आले नाही. या मंदिरांमध्ये प्रामुख्याने तिरुपती बालाजी मंदिर, जग्गनाथ पुरी मंदिर, कोणार्क मंदिर आदी अनेक मंदिरांचा समावेश आहे.
याच यादीतले अजून एक मंदिर म्हणजे केरळ राज्यातील पद्मनाभ स्वामी मंदिर. जगातील श्रीमंत मंदिरांपैकी वरचा क्रमांक लागणाऱ्या तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिरातही अनेक गूढ रहस्ये दडली असल्याचे सांगितले जाते. केरळ राज्यातील तिरुवनंतपूरम शहरामध्ये भगवान विष्णुचे जगप्रसिद्ध पद्मनाथस्वामी मंदिर आहे. देशरातील वैष्णव मंदिरामधील हे एक महत्वाचे आणि खास मंदिर असून, केरळमधील खास पर्यटनस्थळ आहे.
मंदिरात पद्मनाथ स्वामींच्या मुर्तीची स्थापना कोणी आणि केव्हा केली, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. मात्र कलियुगाच्या पहिल्या दिवशी, ५००० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना झाली, अशी मान्यता आहे. या मंदिराच्या गर्भ गृहात खजिना मिळाला होता, यामुळे हे मंदिर भारतातील सर्वात श्रींमत मंदिरांपैकी एक आहे.
काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सहा दरवाजे खुले करण्यात आले होते. मात्र, सातवा दरवाजा खुला करण्यात आला नाही. यामागे अनेक गूढ, रहस्ये आणि जोखीम असल्याचे सांगितले जाते. येथे जाणुन घ्या पद्मानथ मंदिराच्या खास गोष्टी.
पद्मनाभ मंदिराचा उल्लेख ९ व्या शतकांतील काही ग्रथांमध्ये आढळतो. त्रावणकोर घराण्याने आपले जीवन, संपत्ती आणि सर्वस्व पद्मनाभ मंदिराला अर्पण केले होते. सन १७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी या मंदिरावर आपला हक्क सांगितला. तेव्हापासून राजघराण्यातील सदस्य या मंदिराचे व्यवस्थापन पाहतात. या मंदिराचा एक कणही स्वतःसाठी घेत नाहीत. या मंदिरातून बाहेर पडताना आजही ते पाय धुऊन बाहेर पडतात. जेणेकरून मंदिराच्या मातीचे कणही चुकून त्यांच्यासोबत जाऊ नयेत.
काही वर्षांपूर्वी पद्मनाभ मंदिराच्या तळघराचे सहा दरवाजे खुले करण्यात आले होते. या तळघरात तब्बल एक लाख ३२ हजार कोटींची संपत्ती मिळाली होती. यात श्रीविष्णूंची साडेतीन फूट लांबीची सोन्याची मूर्ती मिळाली होती. तसेच मोठ्या प्रमाणात हिरे, किमती रत्नांचे भंडार यात सापडले होते. सहा दरवाजे खुले करण्यात आल्यानंतर सातव्या दरवाजापाशी पोहोचल्यावर मात्र अचंबित करणारी गूढ रहस्ये आणि मान्यता समोर आल्या.
त्रावणकोरच्या राजांनी त्यांची अपार संपत्ती या तळघरात ठेवल्याची मान्यता आहे. या तळघरातील सातवा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा दोन जणांचा सर्पदशांने मृत्यू झाला. सातवा दरवाजा खुला केल्यास अनेक अशुभ घटना घडतील, अशी मान्यता आहे. गेली हजारो वर्षे या मंदिराच्या तळघरातील कोणताही दरवाजा कधीही उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे गेली अनेक वर्षे तळघरातील काही भाग हा शापित मानला गेला आहे. तळघरातील सातव्या भागाचे संरक्षण दोन सर्पराज करतात, अशी मान्यता आहे.
पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा स्टीलचा आहे. या दरवाजाला कुठलीही कडी किंवा कुलूप नाही. या दरवाजावर दोन सापांच्या आकृती रेखाटण्यात आल्या आहेत. सातव्या दरवाजापर्यंत पोहोचल्यानंतर दरवाजावरील सर्पचित्र पाहून पुढील काम थांबवण्यात आले. हा दरवाजा बंद करताना नाग पाशम मंत्राचा प्रयोग करण्यात आला होता, अशी मान्यता आहे. जाणकारांच्या मते, या दरवाजापाशी कान लावल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. हा दरवाजा उघडल्यास केल्यास प्रलय येऊन सर्व जलमय होईल, अशी मान्यता आहे.
पद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरातील सातवा दरवाजा खुला करण्यासाठी गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण होणे आवश्यक असल्याची मान्यता आहे. असा एकही सिद्ध पुरुष सापडलेला नाही, जो गरुड मंत्राचे अचूक आणि स्पष्ट उच्चारण करेल. गरुड मंत्र म्हणताना चूक झाली, तर त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित असल्याचीही मान्यता आहे. या सातव्या दरवाजामागे दोन लाख कोटींपेक्षा अधिकची संपत्ती दडली असल्याचा दावा केला जात आहे.
तिरुअनंतपुरम शहराचे नाव देखील भगवानाच्या ‘अनंत’ नावाच्या नागावरुन नागावरुन ठेवण्यात आले आहे. या मंदिराच्या बंद तळघराच्या सातव्या दरवाजावर नागाचे चिन्ह आहे. हा दरवाजा केवळ काही मंत्रांनीच उघडता येतो, अशी मान्यता आहे. बलपूर्वक या दरवाज्याला उघडण्याचा प्रयत्न केल्यास, काही तरी चुकीचे घडेल आणि अनर्थ होईल या कारणामुळे आजही या दरवाजाला उघडण्यात आलेले नाही.
वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला आहे किंबहुना आजही होतो. जवळपास १७३३ वर्षांपूर्वी त्रावनकोर महाराजा मार्तंड वर्मांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते. सर्वात प्रथम याच स्थानावरुन भगवान विष्णुची मुर्ती मिळाली होती. त्यानंतर येथे मंदिराची स्थापना केली गेली. या मंदिरात भगवान विष्णुची विशाल मुर्ती आहे. यामध्ये भगवान श्रीहरि शेषनागावर शयन मुद्रेमध्ये आपल्याला दर्शन देतात. देवाच्या ‘अनंत’ या नागावरुनच तिरुअनंतपुरमचे नाव ठेवण्यात आले आहे. येथे भगवान विष्णुच्या विश्राम अवस्थेला ‘पद्मनाथ’ म्हटले जाते. येथील नैसर्गिक वातावरण फार सुंदर आहे.
हे मंदिर गोपुरम द्रविड शैलीत बनलेले आहे. यामुळे हे मंदिर अतिशय आकर्षक आहे. पद्मनाथ मंदिर दक्षिण वास्तुकलेचे अद्भूत उदाहरण आहे. हे मंदिर परिसर सात मजल्याएवढे विशाल आहे. मंदिराजवळ तलावही आहे, याला ‘पद्मतीर्थ कुलम’ म्हटले जाते.