आज युवा दिनाच्या विशेष लेखात आपण, आजच्या तरुणांनी उद्याच्या तरुणांसाठी सुरु केलेल्या ‘प्रांगण फाउंडेशन (Prangan Foundation)’ या संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. आज ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती! स्वामी विवेकानंदांची परदेशातली भाषणे आजही आपल्या स्मरणात आहेत. देश-विदेशात भटकंती करताना भारतीय मूल्यांची जपणूक करत त्यांनी संपूर्ण जगात भारताचे नाव रोशन केले.
भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. स्वामी विवेकानंदांपासून अब्दुल कलामांपर्यंत अनेक थोर व्यक्तिमत्त्वांनी तरुणांवर जो विश्वास दाखवला, त्याचं प्रतिक म्हणजेच हा आजचा ‘राष्ट्रीय युवा दिवस’.
एकीकडे टेक्नॉलॉजीच्या मागे आपल्या वेळेचा दुरुपयोग करत वाया चाललेली, मद्यधुंद होत पार्ट्या करणारी, आई-वडिलांच्या कमाईवर जगणारी तरुण पिढी आहे. तर, दुसरीकडे आहे, टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या करिअरसाठी करणारी, स्वतःच्या पायावर खंबीर उभे राहत आई-वडिलांचा आधार बनणारी आणि उद्याच्या तरुणांना घडवण्यासाठी राबणारी तरुण पिढी! ही पिढी डॉ अब्दुल कलामांच्या स्वप्नातील युवा पिढीचे प्रतिनिधित्व करते.
अशाच आदर्श तरुणांनी स्थापन केलं ‘प्रांगण फाउंडेशन (Prangan Foundation )’. हा एक कम्युनिटी बेस्ड प्रोजेक्ट आहे. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणारी ही आजच्या युगातील तरुणांची एक संस्था आहे.
असं सुरू झालं प्रांगण फाउंडेशन (Prangan Foundation)
सन २०१८ मध्ये वैभव पाटील आणि त्याचे काही सहकारी मिळून एक उपक्रम राबवत होते. या उपक्रमांतर्गत अन्नाची नासाडी होऊ नये आणि ते योग्य लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी उरलेलं अन्न झोपडपट्टीत राहणाऱ्या गरजू आणि गरीब लोकांना वाटप केलं जाई. पावसाळ्याचे दिवस होते. रात्री दीडच्या सुमारास अन्न वाटप झाल्यावर गप्पांच्या ओघात अचानक या टीमला एक जाणीव झाली –
‘आपण आज फक्त त्यांचं पोट भरत नाही आहोत, तर त्यांना परावलंबी बनवत आहोत. जर त्यांना आयुष्यभर स्वतःचं पोट स्वतः भरायचं असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही!’
वैभव पाटील या तरुणाने २०१३ मध्ये प्रौढ साक्षरता वर्गाची सुरुवात केली होती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात पाच वर्षांचा चांगला अनुभव होताच सोबतीला.
‘ज्या शिक्षणाचा समाजावर पिढ्यानपिढ्या प्रभाव राहतो, तेच खरे शिक्षण!’
वैभवने हे खऱ्या अर्थाने मनावर घेतले. फाउंडेशनच्या कामाला सुरुवात झाली. विविध संस्थांचे विविध रिपोर्ट शोधून त्यांचा इत्यंभूत अभ्यास केला. यातून प्रांगण फाउंडेशनचा पाया मजबूत झाला.
‘प्रथम फाउंडेशन’च्या एका रिपोर्ट मधून असे निदर्शनास आले की, पाचवीच्या ५०% विद्यार्थ्यांना दुसरीचे पुस्तक देखील धड वाचता येत नाही. दहापैकी नऊ विद्यार्थी दहावीनंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षातच ड्रॉप आउट होतात. अशा अनेक बाबी समोर आल्या आणि लक्षात आलं, या सगळ्यांचं मूळ आहे इंग्रजी भाषा! इंग्रजी भाषेशी न जमलेली गट्टी आणि त्यामुळे संवादात जाणवणारी कमतरता यामुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या अवस्थेत आहेत, हे वास्तव समोर आलं.
प्रौढ शिक्षण वर्ग सुरू असलेल्या इमारतीत या टीमने एक सर्व्हे केला आणि त्यातून मुलांची शाळेच्या अभ्यासक्रमापलीकडे जाऊन अधिक शिकण्याची इच्छा जाणून घेतली आणि खऱ्या अर्थाने प्रांगण फाउंडेशनची सुरुवात झाली ती ‘प्रोजेक्ट चंचलमन’ या उपक्रमातून!
..पण नक्की शिकवायचं काय?
प्रांगण फाउंडेशन (Prangan Foundation) अंतर्गत मुलांना नक्की शिकवायचे काय, हा प्रश्न पूर्ण टीमला पडला. इतिहास, भूगोल, मराठी, गणित हे सगळे विषय तर मुलांना आले पाहिजेतच. पण आपण काहीतरी वेगळं करायला हवं, असं या तरुणांना वाटलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर संवादाचं माध्यम असलेल्या इंग्रजीचं दैनंदिन जीवनात वाढणारं महत्व लक्षात घेता इंग्रजी हा विषय पक्का झाला.
मुलांमधील LSRW (Listening, Speaking, Reading, Writing) म्हणजेच ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे ही कौशल्ये विकसित करण्यासाठी केंब्रिज पब्लिकेशनच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचे ठरले.
आज प्रांगणच्या माध्यमातून १ शिक्षक आणि ४ विद्यार्थी अशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांची ‘प्री असेसमेंट टेस्ट’ घेऊन त्यांची शिकण्याची पात्रता तपासून घेतली जाते. त्यानुसार त्यांना योग्य वर्गात बसवले जाते.
जवळ जवळ ५० एज्युकेटर प्रांगण फाउंडेशनशी जोडले गेले आहेत. हे वर्ग शनिवारी आणि रविवारी घेतले जातात. आज प्रांगण फाउंडेशनचे एकूण ३ सेंटर आहेत. २०१८, २०१९, २०२१ या वर्षात कोपर शहरातील भारतमाता विद्यालय, तसेच डोंबिवली शहरातील पी एस जोंधळे विद्यालय आणि लोकप्रिय विद्यालय या ३ शाळांमध्ये ही सेंटर्स सुरू झाली आहेत.
..आणि कामाची पोचपावती मिळाली!
प्रांगण फाऊंडेशनचं काम सुरळीत चाललं होतं आणि अचानक लॉकडाऊन लागलं. या काळात शिकवण्याच्या प्रक्रियेत बरेच अडथळे आले. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी स्मार्टफोन नव्हते; पण त्यांची शिक्षण घेण्याची आवड त्यांना थांबवू शकली नाही.
साध्या फोनवर कॉलवरून शिकण्याची त्यांनी स्वतःहून तयारी दाखवली. उत्साह आणि सकारात्मकता ही अशी असते. प्रांगणकर्त्यांकडून हा उत्साह आणि सकारात्मकता विद्यार्थ्यांपर्यंत कशी आणि कधी पोहोचली हे समजलंच नाही. हीच तर कामाची खरी पोचपावती..!
रिलायन्स जिओ या मोबाईल सिम कार्ड कंपनीने प्रांगण फाउंडेशनच्या या उपक्रमावर आधारित एक कॅम्पेन तयार केले आहे.
अजून खूप काही मिळवायचंय..
- आजच्या घडीला ८५ विद्यार्थ्यांना प्रांगण फाउंडेशनमार्फत मोफत शिक्षण मिळत आहे. ट्रायबल एज्युकेशन या उपक्रमांतर्गत दरवर्षी आदिवासी विभागातील २००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.
- केडीएमसी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबत काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात हातभार लावणे, आदिवासी भागातल्या मुलांसोबत काम करणे आणि त्यांना नागरी सुविधा मिळवून देणे, अशा अनेक कल्पना प्रांगण फाउंडेशनला भविष्यात राबवायच्या आहेत.
- प्रांगणचे फाऊंडर वैभव पाटील आणि त्यांची पूर्ण टीम आजही स्वतःचे करियर सांभाळत पुढच्या तरुण पिढीचे आयुष्य घडवत आहेत. त्यांच्या या कामामुळे प्रांगण फाउंडेशनची दखल घेतली जात आहे.
- शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या भारतीय व्यक्ती आणि संस्थांना नावजणाऱ्या एज्युकेशन एक्सीलेंस अवॉर्ड (EEA) या संस्थेतर्फे देण्यात येणारा २०२१ चा ‘एज्युकेशन एक्सीलेंस अवॉर्ड’ प्रांगण फाउंडेशनला मिळाला.
हे ही वाचा: बालमजुरी करून शिकलेल्या अनुराधा भोसले (Anuradha Bhosale) यांच्या बालमजुरी विरोधात लढ्याची थक्क करणारी कहाणी
हळदीची लढाई लढणाऱ्या विज्ञानजगतातील महाराणाची कहाणी
वेगवेगळ्या क्षेत्रातले हे तरुण एकमेकांना जोडले जातील, एकत्र येऊन एक प्रकारची शैक्षणिक चळवळच उभी करतील, त्यातून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करतील, असं ५-६ वर्षांपूर्वी कुणालाच वाटलं नसेल. प्रांगण फाउंडेशनने ते खरं करून दाखवलं आणि इतर तरुणांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला. म्हणतात ना, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया… !
– सोनल सुर्वे