केळी पाचशे रुपये डझन आणि द्राक्षे सोळाशे रुपये फक्त….हे दर आहेत पाकिस्तानमधले. पाकिस्तानमध्ये महागाईनं किती आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे, याची ही फक्त चुणूक आहे. सध्या रमजानचा महिना चालू आहे. या रमजानमध्ये रोजा धरणा-या नागरिकांना फळांचे भाव ऐकल्यावरच डोळ्यासमोर चांदण्या चमकत आहेत. याशिवाय मिठापासून ते कांद्यापर्यंत सर्वच गरजवंत वस्तूंचे भाव येथे गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी गव्हाचे पिठ मिळवण्यासाठी अनेक किलोमिटरची रांग लागल्याचा व्हिडीओ पाकिस्तानच्या माजी मंत्र्यानं शेअर केला होता. यावरुनच पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेची काय अवस्था आहे, याची कल्पना येते.

रध्या रमजानचा पवित्र महिना चालू आहे. या रमजानमध्येही पाकिस्तानमधील जनतेला आराम नाही. रमजानमध्ये वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानी जनता त्रस्त झाली आहे. दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेलेले नागरिक फक्त वस्तूंची किंमत ऐकून निराशेनं परत येत आहेत. तेथे गव्हाचे पिठ 120 टक्क्यांनी वाढले आहे. तर जेवणात आवश्यक असलेला कांदाही 228 टक्क्यांनी महाग झाला आहे. रमजानमध्ये मोठ्याप्रमाणात फलाहार केला जातो. पण पाकिस्तानधील फळांच्या किंमती ऐकल्यावर ही सोन्याचा मुलामा दिलेली फळं तर नाहीत ना, असा प्रश्नच पडतो. येथे केळी 500 रुपये डझनला मिळत आहेत. तर द्राक्षांचे भाव ऐकल्यावर द्राक्ष खाण्याचा विचारही करणार नाही. कारण द्राक्ष 1600 रुपये किलोला विकली जात आहेत. याशिवाय सफरचंद, मोसंबी, चिकू ही फळं तर आणखी जास्त दरानं उपलब्ध आहेत. पण असा विक्रमी दर देण्यासाठी ग्राहकांकडे पैसेच नसल्यानं ग्राहक परत जात आहेत आणि विक्रेत्यांचीही गोची झाली आहे. पाकिस्तानच्या सांख्यिकी ब्युरोने ही आकडेवारी जाहीर केली आहे. पाकिस्तानमध्ये दैनंदिन वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
रमजानच्या महिन्यातही पाकिस्तानातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळालेला नाही. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये महागाई 47 टक्क्यांवर पोहोचली आहे. पाकिस्तानमध्ये कांदे, गॅस मैदा, डिझेल, चहा, तांदूळ, पेट्रोल, अंडी यांचे दर कित्तेक पटीनं महागले आहेत. सांख्यिकी ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 51 जीवनावश्यक वस्तूंपैकी 26 वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. 12 वस्तूंच्या किमतीत किंचित घट झाली असून 13 वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यासर्वात सामान्य जनता पार भरडून निघाली आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी अनेक अटी घातल्या आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यात कर्जाबाबत बोलणी सुरु आहेत. आयएमएफने कर्ज दिल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळू शकते. मात्र तेथील जीवनावश्यक वस्तूंचे दर हे लगेच खाली येतील अशी आशा ठेवणं चुकीचं आहे. किमान तीन महिने तरी असेच चढे दर पाकिस्नानमध्ये असतील, असे तेथील जाणकारांचे म्हणणे आहे. या सर्वांमुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या एका भागात मोफत मिळणारे पिठ मिळवण्यासाठी दोन महिलांचा मृत्यू झाला. मिनी ट्रकमधून आलेली पिठाची पोती उचलण्यासाठी शेकडो लोक पुढे आले. त्यातून चेंगराचेंगरी होऊन अनेकजण बेशुद्ध पडले. पाकिस्तानी पत्रकार मोहम्मद फहीमने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये दहा किलो पिठाच्या पोत्यांसाठी लोक आपापसात भांडतांना दिसत आहेत. याआधीही पिठासाठी अनेक किलोमीटरच्या रांगेचा व्हिडीओ पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांनी शेअर केला होता. गेल्या रमजानच्या तुलनेत 20 किलो पिठाच्या पिठाची किंमत 800-1,500 रुपयांवरून 1,295-3,100 रुपयांपर्यंत वाढली आहे. यावरुनच पाकिस्तानमधील महागाई किती पटीनं वाढत चालली आहे, याचा अंदाज येतोय.
=======
हे देखील वाचा : तब्बल ४५ वर्षानंतर समोर आले होते युरी गागारिन यांच्या मृत्यूचे कारण
======
पाकिस्तानमध्ये फक्त खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत असं नव्हे तर तेथे मोठ्याप्रमाणात विजेचं संकंटही आहे. खैबर पख्तुनख्वामधील रहिवांशांना विजेशिवाय रहावे लागत आहे. विजपुरवठा करण्यासाठी या नागरिकांचे आंदोलन सुरु आहे. तसेच पाकव्याप्त काश्मिरच्या अनेक भागातही वीजपुरवठा अनियमीत आहे. पाकिस्तानच्या प्रमुख शहरातही अशीच परिस्थिती आहे. एकूण आपल्या शेजारच्या आणखी एका देशाचे दिवाळे निघाले, हे फक्त जाहीर होण्याचे बाकी आहे.
सई बने