भारतामधील नामवंत उद्योगपती राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे आज दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते. २००१ साली त्यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २००६ ते २०१० या कालावधीत त्यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या पाच दशकांहूनही अधिक काळ उद्योगजगतात कार्यरत होते.
राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. माजी उद्योगपती आणि स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे ते नातू होते. सुखवस्तू कुटुंबात जन्मलेले राहुल बजाज अत्यंत हुशार होते. अर्थशास्त्र आणि विधी या विषयांमध्ये पदवी संपादन केल्यावर पुढील शिक्षणासाठी ते परदेशी गेले.
हॉवर्ड विद्यापीठतून ‘एमबीए’ ची पदवी घेऊन भारतात परत आल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी म्हणजेच १९६८ साली बजाज ऑटोमध्ये ‘कार्यकारी अधिकारी’ या पदावर रुजू झाले. तेव्हापासून बजाज उद्योग समूहाचा पसारा त्यांनी सांभाळला आणि वाढवलाही. गेल्याच वर्षी त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर बजाज ऑटोच्या अध्यक्षपदी नीरज बजाज यांची नियुक्ती करण्यात आली.
स्पष्टवक्ते आणि परखडपणे बोलणारे उद्योगपती म्हणून राहुल बजाज यांचा उद्योगजगतात दरारा होता. फोर्ब्जच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला होता.
====
हे देखील वाचा : या कारणासाठी जमनालाल बजाज यांनी नाकारले होते काँग्रेसचे अध्यक्षपद!
====
एकेकाळी दुचाकी गाडी हे सर्वसामान्यांचे स्वप्न होते. परंतु, सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीमध्ये त्यांनी दुचाकी उपलब्ध करून दिली कित्येक मध्यमवर्गीयांच्या घरासमोर बजाजची स्कुटर दिमाखात उभी राहिली. त्या काळात भारतात बजाज स्कुटरची विक्रमी विक्री झाली. यामुळे बजाज कंपनी दुचाकीच्या व्यवसायामधील भारतातील नंबर १ ची कंपनी बनली. परवडणाऱ्या वाहनांमुळे सर्वसामान्यांचे हाल वाचले आणि उपजीविकेचे साधन मिळविण्यासाठीचा संघर्ष कमी झाला. “बुलंद भारत कि बुलंद तसबीर, हमारा बजाज!” ही जाहिरात आजच्या काळातही तितकीच लोकप्रिय आहे.
मागील १५ दिवसांपासून राहुल बजाज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये न्यूमोनियासाठी उपचार घेत होते. न्यूमोनियामुळे त्यांची फुफ्फुस निकामी झाल्यामुळे हृदयक्रियेवर परिणाम झाला. वृद्धापकाळाने थकलेले त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अजिबात सुधारणा झाली नाही आणि अखेर आज दुपारी २.३० च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. यासंदर्भात बजाज समूहाने निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.
====
हे देखील वाचा : आज ३०० कोटींचा व्यवसाय असणाऱ्या रघुनंदनला एकेकाळी आपली पावभाजीची गाडी बंद करण्याची वेळ आली होती, पण नंतर…
====
राहुल बजाज (Rahul Bajaj) यांनी यांच्या निधनांनंतर राजकारण, समाजकारण व उद्योग जगतातील नामवंत व्यक्तींसह अनेक सेलिब्रेटीजनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.