हिंदू धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त आहे. भगवान विष्णूची आवडती तिथी म्हणून एकादशी या तिथीला ओळखले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. एका वर्षात एकूण 24 एकादशी आहेत ज्यात प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. एकादशीचे व्रत पुण्य फळ प्राप्तीसाठी फार महत्वाचे मानले जाते.
सध्या पितृ पक्ष सुरू आहे. पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी सगळेच या काळात श्राद्ध, तर्पण, दान करताना दिसत आहे. अशातच या पितृ पंधरवड्यात एकादशीची तिथी देखील आली आहे. पितृपक्षातील एकादशीला एक वेगळेच महत्व असते.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. इंदिरा एकादशीचे व्रत हे खूपच महत्त्वाचे मानण्यात येते. या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूसह पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो असे शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते. इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो. चला तर जाणून घेऊया याच इंदिरा एकादशीच्या तिथीबद्दल आणि महत्वाबद्दल.
हिंदू पंचांगानुसार इंदिरा एकादशी शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून १९ मिनिटांपासून सुरु होईल आणि २८ सप्टेंबरला शनिवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी संपेल. शास्त्रानुसार उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार किंवा उदय तिथीनुसार याचे व्रत २८ सप्टेंबर रोजी केले जाईल. इंदिरा एकादशीच्या दिवशी रात्री ११ वाजून ५१ मिनिटापर्यंत सिद्ध योग तयार होत आहे. पूजेसाठी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४२ मिनिटे ते ९ वाजून १२ मिनिटापर्यंत शुभ चौघडिया आहे. सायंकाळी ३ वाजून ११ मिनिटे ते ४ वाजून ४० मिनिचापर्यंत अमृत चौघडिया आहे.

एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असते. या व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान आणि नित्यकर्म करून शुचिर्भूत व्हा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून, देवघराची गंगाजलाने स्वच्छता करून ते पवित्र करा. आता व्रताचा संकल्प करा. देवघरात पूजेला सुरुवात करत भगवान विष्णु समोर साजूक तूपाचा दिवा लावावा. त्यानंतर देवाला फुले, अक्षता, फळे आणि पूजेचे इतर साहित्य वाहावे. पूजेनंतर विष्णु सहस्रनामाचा पाठ करावा आणि शेवटी आरती करावी. या दिवशी निर्जल व्रत करत रात्री जागरण करावे.
इंदिरा एकादशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची पूजा करावी. जर तुम्ही या दिवशी उपवास करत नसाल तर सात्विक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. व्रत पाळण्याआधी व्रत पाळण्याचा संकल्प नक्की करा. उपवासाचे सर्व नियम पाळा. सूर्योदयानंतर पारण करणे उत्तम आहे. या दिवशी भजन-कीर्तनही करावे.
इंदिरा एकादशी व्रताची कथा
प्राचीन काळी सत्ययुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता. इंद्रसेन राजा पुत्र, पुत्री, नातवंडे, धन, संपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परम भक्त होता. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाश मार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली. त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले… तेव्हा नारदमुनी म्हणाले की, हे राजन माझे बोलणे तुला चकित करणारे आहे.
=================
हे देखील वाचा : जाणून घ्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांमधील फरक
================
एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो. तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले. ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो आहे.
यामुळे मुला, माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. नारदमुनींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबीयांसहित हे व्रत केले. व्रताच्या पुण्य प्रभावाने राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले. त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रत प्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्गलोकात गेला.
