पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पहिली वॉटर मेट्रो दिली आहे. पंतप्रधानांनी देशातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये पर्यावरण पूरक अशा वॉटर मेट्रोचा शुभारंभ केला आहे. केरळात सुरु झालेली ही वॉटर मेट्रो, देशातील पहिली वॉटर मेट्रो असून यामुळे जलवाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती घडणार आहे. पोर्ट सिटी कोचीमध्ये बांधण्यात आलेली ही वॉटर मेट्रो कोची शहराला जवळपासच्या 10 बेटांबरोबर जोडणार आहे.
केरळातील कोचीन शिपयार्ड लिमिटेडने या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. सुरुवातीला यात 8 इलेक्ट्रिक हायब्रीड बोटी असतील. नंतर पर्यटकांची संख्या पाहून त्यात वाढ करण्यात येईल. कोची वॉटर मेट्रो प्रकल्पात 78 इलेक्ट्रिक बोटी आणि 38 टर्मिनल तयार करण्यात येणार आहेत. केरळ सरकारने जर्मनीच्या सहकार्याने या प्रकल्पाला निधी दिला आहे. यामध्ये आतापर्यत 1,137 कोटी रुपये खर्च झाले आहेत. वॉटर मेट्रोवरील प्रवासाचे किमान भाडे 20 रुपये आहे. त्यात साप्ताहिक आणि मासिक पासचीही सुविधा असेल, त्यामुळे जलवाहतुकीवर अवलंबून असलेल्या स्थानिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.आता पहिल्या टप्प्यात ही वॉटर मेट्रो कोचीमधील हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्स आणि व्यक्तीला कक्कनड टर्मिनल्स दरम्यान सुरू होईल. वॉटर मेट्रो दररोज 12 तास सेवा देणार आहे. ही वॉटर मेट्रो 15 मिनिटांच्या अंतराने चालणार आहे. वॉटर मेट्रो पर्यावरणपूरक, विजेवर चालणारी आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित अशीच आहे. त्यात दिव्यांगासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत येणाऱ्या सर्व बोटी वातानुकूलित असतील. त्यांना रुंद खिडक्या असणार आहेत. त्यामुळे या बोटीतून प्रवास करणा-या पर्यटकांना केरळच्या बॅकवॉटरचे दर्शन घेता येणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल्सपासून वायटीला-कक्कनड टर्मिनल्सपर्यंत सेवा सुरू झाली आहे. ‘कोची-1’ कार्ड वापरून प्रवासी कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्ही मार्गांनी प्रवास करु शकणार आहेत. याशिवाय ते डिजिटल पद्धतीनेही तिकीट बुक करु शकणार आहेत. वॉटर मेट्रोच्या एका ट्रिपचे भाडे 20 ते 40 रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांना साप्ताहिक, मासिक किंवा तीन महिन्यांचा पास घेण्याची सुविधाही मिळणार आहे. या पासची किंमत 180 रुपये, 600 रुपये किंवा 1500 रुपये असेल. QR कोडद्वारे तिकिटांची ऑनलाइन खरेदीही करता येईल. याचा पर्यटकांना मोठा फायदा होईल, अशी खात्री आहे. केरळमधील वॉटर मेट्रो हे देशातील वाहतुकीच्या दृष्टीने मोठे पाऊल मानले जात आहे. वॉटर मेट्रो ही भारतीय जलवाहतूक व्यवस्थेत एक नवीन क्रांती ठरू शकते. ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात अनोखी जलमार्ग वाहतूक असल्याची माहिती आहे. केरळमध्ये जलमार्ग वापरण्याचा मोठा इतिहास आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये या जलमार्गाच्या विकासाचा विचार झाला नव्हता. अशा परिस्थितीत वॉटर मेट्रो ही एका नव्या युगाची नांदी ठरू शकते. अशी खात्री वॉटर मेट्रोप्रकल्प राबवणा-या अधिका-यांनी दिली आहे. ही सेवा केरळमध्ये यशस्वी झाली की भारतातील अन्य नदीमार्गावरही अशाप्रकारच्या वॉटर मेट्रोंचा वापर सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जलवाहतुकीस प्रेरणा मिळेल आणि रस्त्यावरील अतिरिक्त वाहतुकीचा भार कमी होईल.
=======
हे देखील वाचा : युपीतील मोस्ट वॉटेंड लेडीच्या नावे १०० हून अधिक केस तर ५ लाखांचे बक्षीस जाहीर
=======
वॉटर मेट्रो अंतर्गत एकूण 16 मार्गांचा समावेश आहे. हा संपूर्ण प्रवास 78 किमी असेल. सध्या या मार्गावर आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या एकूण 38 बोटी सध्या तैनात आहेत. यामध्ये प्रवाशांना वायफाय सुविधाही मिळणार आहे. वॉटर मेट्रो प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण या बोटी इलेक्ट्रिक असतील. यामध्ये सोलर पॅनल बसविण्यात आले असून बॅटरी बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. वॉटर मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळणार असल्याचे मानले जात आहे. केरळमध्ये पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाळ्यात अगदी दोन महिने वगळले तर येथे जवळपास दहा महिने पर्यटक गर्दी करतात. त्यामध्ये परदेशी पर्यटक मोठ्या संख्येनं असतात. या पर्यटकांना अशा नव्या सुविधा दिल्यास त्यांची संख्या वाढू शकते असाही प्रयत्न चालू आहे.
सई बने