Home » ‘या’ कल्चरल सेंटरमध्ये भारताच्या कानाकोप-यातील संस्कृतीचे दर्शन घडणार

‘या’ कल्चरल सेंटरमध्ये भारताच्या कानाकोप-यातील संस्कृतीचे दर्शन घडणार

by Team Gajawaja
0 comment
Cultural Center
Share

मुंबई, बांद्रा कुर्ला कॉम्पेलेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये असलेल्या भव्यदिव्य नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आता सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. भारतीय संस्कृती आणि कलेसाठी समर्पित अशा या सेंटरमध्ये भारताच्या कानाकोप-यातील संस्कृतीचे दर्शन आता सर्वांना बघता येणार आहे. या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन 31 मार्च रोजी झाले. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते, यावेळी विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाची आणि एकूणच या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची भव्यता पाहून हे सेंटर सर्वसामान्यांसाठी कधीपासून खुले होणार याची उत्सुकता होती. मात्र आता हे सेंटर सर्वांसाठी खुले झाले आहे, शिवाय येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधीही मिळणार आहे. अतिशय दर्जेदार सुविधा असलेल्या या सेंटरमध्ये भारतातील कुठल्याही कलाकाराला आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. अगदी आपली मराठी नाटकं बघण्याची संधीही मिळणार आहे. येत्या 18 एप्रिल रोजी झी पारितोषिक विजेते लेखक दत्ता पाटील यांचे तो राजहंस एक या नाटकाचा शो येथे होत आहे. या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सादर होणारे, तो राजहंस एक हे पहिले मराठी नाटक ठरले आहे. या सेंटरमधील कार्यक्रमांना जाण्यासाठी काय करावे लागले, तसेच त्याचे बुकींग कसे करता येईल याची माहिती घेऊया.  

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजे भारतातील सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठीच देणगी ठरणार आहे. येथील चार मजली आर्ट हाऊस एखाद्या राजवाड्यासारखे सजवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय प्रेक्षकांसाठी डिझाइन केलेले हे सेंटर अप्रतिम अशा कलाकृतींनी सजवण्यात आले आहे. सांस्कृतिक केंद्राच्या समोर भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा सुंदरपणे चित्रित करण्यात आला आहे. 16,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांनाही आपलेसे वाटणार आहे. तशाच दर्जाच्या सुविधा या सेंटरमध्ये देण्यात आल्या आहेत. याशिवाय तांत्रिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. 

या सेंटरमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. त्यातून भारतीय कलाकारांना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यातील क्यूब हे परफॉर्मन्स, स्टँड अप कॉमेडी आणि म्युझिकल शोसाठी डिझाइन केलेले आहे. यात 125 लोकांची बसण्याची क्षमता आहे. हा एक पोर्टेबल स्टेज आहे, ज्यामध्ये प्रेक्षक कुठेही आणि तुम्हाला हवे तसे बसू शकणार आहेत.

ग्रँड थिएटर हे अतिशय उत्कृष्ठ अशा वास्तुशास्त्राचा नमुना म्हणावा लागेल. यासारख्या सांस्कृतिक सभागृहात आपला कार्यक्रम सादर करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न राहणार आहे. येथे जागतिक दर्जाची डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंड सिस्टम आणि व्हर्च्युअल अकौस्टिक सिस्टम आहे. अतिशय क्रिएटिव्ह आसन व्यवस्था आहे. या सभागृहाच्या पहिल्या खुर्चीत बसल्यावर ज्यापद्धतीनं कार्यक्रम बघता येतो, तसाच अनुभव शेवटच्या टोकावरील खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकांना येतो. यातील प्रकाश योजना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल अशीच आहे. स्टुडिओ थिएटर हा अजून एक वेगळा प्रकार आहे. 250 आसन व्यवस्था असलेल्या या थिएटरमध्ये दुर्बिणीची व्यवस्था आहे. जागतिक दर्जाची डॉल्बी अॅटमॉस सराउंड साऊंड सिस्टीम आणि ध्वनीरोधक सुविधाही आहे. नाटक किंवा अन्य मोठे सोहळे या सभागृहात होऊ शकतात. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक सेंटरमध्ये असलेल्या या सर्व सभागृहात वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत आणि त्याच्यासाठी तिकीट बुक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या केंद्रासाठी तिकीट बुक करणे खूप सोपे आहे. ज्या प्रेक्षकांना कार्यक्रम पाहायचा असेल त्यांना nmacc.com किंवा bookmyshow ला भेट देऊन तिकीट बुक करण्याची व्यवस्था आहे. या सांस्कृतिक केंद्रामध्ये मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.  मात्र येथे बाहेरुन खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नाही.  

======

हे देखील वाचा : प्रियंका आणि तिची अतरंगी फॅशन…

======

या सेंटरमध्ये सध्या स्वदेश नावाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात अवघा भारत समाविष्ट झाल्याची जाणीव होते. यात अगदी आपली पैठणी साडी बनारसी साडी कशी तयार होते हे बघण्याची आणि या साड्या विकत घेण्याचीही सुविधाही आहे. याशिवाय मण्या-दो-यांपासून केलेले सुरेख दागिने, जयपूरी पेंटीग, आसामची कला, काश्मिरच्या शाली, कारपेट…तयार होतांना बघता येणार आहे आणि या कलाकारांनी तयार केलेल्या या दर्जेदार वस्तू खरेदी करण्याचीही संधी उपलब्ध आहे. काश्मिरी कलाकारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडून शाल विणण्याची कला शिकण्याचीही संधी आहे. तसेच लडाख मधून आलेल्या अंध कलाकारांनी केलेल्या फुलांच्या मेणबत्या बघता आणि विकत घेता येणार आहेत.   याशिवाय भगवान श्रीकृष्णाचे भव्यदिव्य पेंटीग येथे उपलब्ध आहेत. श्रीकृष्णाच्या भक्तांना विविध रुपात ही पेंटीग उपलब्ध आहेत. याशिवाय येथील ग्रॅड थिटरमध्ये सध्या भारतीय संस्कृती आणि भारताच्या स्वातंत्र्याला समर्पित असा कार्यक्रम सुरु आहे. हा कार्यक्रम 23 एप्रिलपर्यंत बघता येणार आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील या क्रार्यक्रमात भारतातील सर्व प्रांतातील कलांचे होणारे सादरीकरण अनोखे असेच आहे. या कार्यक्रमाची तिकिटेही बुक माय शो वर उपलब्ध आहेत. भविष्यात या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमुळे भारतातील कलाकारांना आंतरराष्ट्री मंच उपलब्ध होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.