महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आडवा विस्तव जात नाही असे बोलले जाते. ठाकरे सरकारच्या प्रत्येक कृतीवर जोरदार टीका करताना हे सरकार कसे अकार्यक्षम आहे हे सांगण्याचाच विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचा खासा प्रयत्न असतो. परंतु एक काळ असा होता की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे एका ताटात जेवण करीत असल्यासारखे परस्परांशी वागत होते. राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की तोही सत्तारूढ आघाडीचा एक भाग झाला आहे तसेच मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांना खिशात घालून फिरताहेत का? अशी विचारणा होण्याइतपत त्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्याची घनिष्ठ मैत्री होती. ते मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि विरोधी पक्षनेते होते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde). दोघेही मराठवाड्याचे नेते होते. दुर्देवाने आज ते दोघेही हयात नाहीत. मात्र हा चमत्कार घडविला होता तो विलासराव देशमुख यांच्या सदैव हसतमुख, खेळकर आणि उमद्या स्वभावामुळे. त्यांच्या नेतृत्वगुणांचे तेच तर मुख्य वैशिष्ट्य होते. त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील बाभळगाव सारख्या छोट्या गावच्या सरपंचपदापासून ते महाराष्ट्रासारख्या देशातील एका मोठ्या राज्याचा दोन वेळा मुख्यमंत्री होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती.

मूळचे लातूर (Latur) तालुक्यातील बाभळगावचे असलेले विलासराव यांना त्यांच्या आजोबांपासून निजामाच्या राजवटीत ‘जहागिरी’ मिळाली होती. विलासरावांचे वडील दगडोजी देशमुख हेही बाभळगावचे सरपंच होते. लोकांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी ते सतत घोड्यावरून फिरत असत. त्यामुळे त्यांना पंचक्रोशीत फार मान होता. विलासरावांनी हाच वारसा पुढे चालविला. प्रथम बाभळगावचे सरपंच, त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य होऊन राजकारणाचा श्रीगणेशा केला. काही काळ युवक काँग्रेसची पताकाही खांद्यावर घेऊन काँग्रेसचे निष्ठेने काम केले. लातूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर ते वकिलीच्या शिक्षणासाठी म्हणून पुण्याला आले. आयएलएस लॉ कॉलेजमध्ये शिकताना पुण्यातच त्यांची वैचारिक बैठक आणखी पक्की झाली. पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचा आणि मराठवाड्याचे नेते शंकरराव चव्हाण यांचा परिचय झाला आणि पुढे राजकारणात विलासराव त्यांचे पट्टशिष्य झाले. मराठवाड्यातील या दोन्ही नेत्यांचे गुरू-शिष्याचे नाते शेवटपर्यंत कायम होते. लातूर शहराच्या सर्वांगीण विकासात विलासरावांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. आज लातूर शहराचा भव्य कायापालट पाहता त्याची प्रचिती येते.
विलासरावांनी आपल्या ‘देशमुखी’ थाटातच सारे ‘राजकारण’ केले. नावाप्रमाणे ते ‘विलासी’ नव्हते तर खऱ्या अर्थाने ‘रसिक’ होते त्यामुळे सांस्कृतिक मंत्री असताना बड्या सेलेब्रिटीपासून ते सामान्य लोककलावंतांपर्यंत त्यांचा संपर्क होता. त्यांचा हसतमुख स्वभाव, बोलण्याची ढब, वक्तृत्वशैली, आणि विरोधकांना शालजोडीतून मारलेले जोडे हे जसे जनतेला आवडायचे तसेच त्यांच्या विरोधकांनाही. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. सुरुवातीला राज्यमंत्री नंतर कॅबिनेट मंत्री असा त्यांचा यशस्वी प्रवास होत गेला. त्यातच श्री शंकरराव चव्हाण केंद्रात गेल्यामुळे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला विलासरावांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व मिळाले. शरद पवार (Sharad Pawar) यांना ‘आव्हान’ देऊ शकणारा नेता अशीही त्यांची प्रतिमा झाल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा त्यांच्यावर लगेच विश्वास बसला आणि १९९९च्या विधानसभा निवडणुकीनंतर विलासराव महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले मात्र दुर्देवाने विलासराव मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत. राजकारणातील शह-काटशहाचे परिणाम त्यांनाही भोगावे लागले.
हे देखील वाचा: सामान्यांचे आबा…
त्याच्याही आधी म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ‘पवार-विरोध’ नडला. त्या निवडणुकीत विलासराव लातूर मतदारसंघातून पराभूत झाले. असे म्हणतात की महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने त्यांच्या मतदारसंघात ‘मामुली’ ( मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत ) फॅक्टरचा वापर करून विलासरावांचा पत्ता ठरवून ‘कट’ करण्यात आला. त्यानंतर साधारण वर्षभराने झालेल्या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीतही विलासरावांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तिकीट नाकारले. त्यावेळी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे शिवाजीराव देशमुख, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले छगन भुजबळ आणि रामदास फुटाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यापैकी फुटाणे यांना कवी आणि साहित्यिक म्हणून काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. मात्र रामदास फुटाणे यांनी विलासरावांबरोबर असलेली आपली मैत्री लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेण्याची तयारीही दर्शविली होती परंतु फुटाणे यांच्या उमेदवारीवर तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नरसिंह राव ठाम होते. त्यामुळे विलासरावांनी त्यावेळी चक्क पक्षाविरूद्ध बंडखोरी केली आणि ते ‘अपक्ष’ म्हणून निवडणुकीत उभे राहिले. दुर्देवाने दुसऱ्या फेरीत त्यांचा एका मताने पराभव झाला. (तेथेही त्यांना पवार-विरोधच नडला) शिवाय बंडखोरी केल्याबद्दल त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. अर्थात विलासरावांचा राजकारणातील हा बॅडपॅच फार काळ टिकला नाही त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यात आले आणि १९९९च्या विधानसभा निवडणुकीत ते लातूर मतदारसंघातून तब्बल ९० हजार मतांनी निवडून आले आणि काँग्रेस श्रेष्ठींचा विश्वास संपादन करून मुख्यमंत्री झाले. मात्र दोन्ही काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून ते पूर्ण पाच वर्षे काम करू शकले नाहीत. त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पुन्हा उचल खाल्ली आणि २००३ मध्ये पक्षश्रेष्ठींनी त्यांना अचानक राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यांच्या जागी शरद पवार यांच्या विश्वासातील म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

त्यानंतर २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीला राज्यात पुन्हा बहुमत मिळाले. मात्र काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा थोड्या कमी जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीने दावा केला. मात्र मुख्यमंत्रीपद काँग्रेसलाच मिळावे यासाठी काँग्रेस आग्रही राहिली. त्याबदल्यात महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यास काँग्रेसने अनुकूलता दर्शविली. आणि पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विलासराव यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना मुख्यमंत्री केले आणि विलासरावांनी पुढे अत्यंत चतुराईने विधानसभेत काँग्रेस आमदारांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त करण्याची किमया साधली. परंतु याही वेळेला विलासराव मुख्यमंत्रीपदाची टर्म पूर्ण करू शकले नाहीत, २००८ साली मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला (२६/११) आणि त्याच्या अपयशाची जबाबदारी घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र विलासराव त्या मागणीला बधले नाहीत त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी फार मोठी खेळी केली. त्यावेळी गृहमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. आर. पाटील यांना त्यांनी, हल्ल्याप्रकरणी नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विलासरावांना पर्यायच शिल्लक राहिला नाही त्यामुळे त्यांनाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र जाता जाता मराठवाड्यातीलच दुसरे नेते अशोकराव चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर २०११साली विलासरावांची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांना पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून घेण्यात आले आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरील आपला विश्वास पुन्हा सार्थ ठरविला.

दुर्देवाने विलासरावांना जास्त आयुर्मान लाभू शकले नाही. २०११ सालीच त्यांची प्रकृती अचानक ढासळली. लिव्हर आणि किडनीच्या विकाराने त्यांना ग्रासले. पुढील उपचारासाठी त्यांना चेन्नईला हलविण्यात आले मात्र रुग्णालयात उपचार चालू असतानाच १४ ऑगस्ट २०१२ साली त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राने एक चांगला उमदा आणि कर्तृत्वान नेता गमावला. देशमुख परिवारात ‘थोरले साहेब’ म्हणून सर्वपरिचित असलेल्या विलासरावांना एकूण तीन मुलगे. त्यापैकी अमितजी आणि धीरज हे राजकारणात त्यांचा वारसा आज पुढे चालवित आहेत. अमितजी तर महाराष्ट्रातील सध्याच्या आघाडी सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री आहेत. तर धीरज हे लातूर (ग्रामीण) चे आमदार आहेत. तिसरे चिरंजीव रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनीही अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
आजही आणि यापुढेही जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या प्रतिभावान मुख्यमंत्र्यांची नावे घेतली जातील तेव्हा तेव्हा विलासराव देशमुख यांची आठवण निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी पावती आहे.
– श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)