प्रमोद महाजन म्हणजे भारतीय जनता पक्षातील एक मोठं नाव. भारतीय जन संघाचे युवा नेते ते अगदी भारतीय जनता पक्षाचे जनरल सेक्रेटरी.
प्रमोद महाजन यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1949 साली तेलंगणा राज्यातल्या मेहेबूब नगर येथे झाला. पण त्यानंतर त्यांचं सगळं कुटुंब महाराष्ट्र राज्यात येऊन राहीलं. प्रमोद महाजन यांच प्राथमिक शिक्षण बीड जिल्ह्यातल्या योगेश्वरी विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी भौतिक शास्त्रात पदवी घेतली आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
सुरुवातीच्या काळातील एक विशेष गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आणि गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची मैत्री. कॉलेजपासून ते राजकारणात प्रवेश करण्यापर्यंतचा प्रवास दोघांनी एकत्र केला म्हणजे अगदी आणीबाणीच्या काळात सुद्धा जेलमध्ये ते एकत्र गेले. ह्याच मैत्रीच पुढे नात्यात रूपांतर झालं. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या जोडगोळीने बीड जिल्ह्यापासूनच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. या ग्रामीण भागातल्या प्रचारामुळे त्यांनी पक्षाची मुळे ग्रामीण भागातही रुजवली. जनसंघपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचं मोठं काम या दोघांनी केलं.
1974 पासून ते राजकारणात सक्रिय झाले. सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) त्यांनी भाग घेतला. 1975 च्या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना नाशिक जेल मध्ये ठेवण्यात आलं होत. 1989 ते 1990 या दरम्यान निघालेल्या रामरथ यात्रेतही प्रमोद महाजन यांच्या खूप मोठा सहभाग होता. ही रथयात्रा प्रमोद महाजन यांच्या नियोजनातून साकारली होती. सुरुवातीला ही यात्रा पायी काढली जाणार होती पण प्रमोद महाजनांच्या सांगण्यावरून ही यात्रा गाडीवरून काढण्यात आली.
1995 साली महाराष्ट्रात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले ते सुद्धा प्रमोद महाजन यांच्या दूरदृष्टीमुळे. बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे प्रमोद महाजन यांनी सेना भाजप युती घडवली.
प्रमोद महाजन यांनी 1996 साली अटलजींच्या 13 दिवसाच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केले. 1998 साली आलेल्या सरकारमध्ये त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सल्लागारचं काम केलं. डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी माहिती व दूरसंचार मंत्री म्हणून काम पाहिलं. 2001मध्ये त्यांच्याकडे जनसंपर्क मंत्री पद आलं असता टेलिकॉम पॉलिसी कार्यान्वित करण्यात आली.
प्रमोद महाजन हे उत्तम वक्ते होते. त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी होत असे. इतर पक्षांशीही प्रमोद महाजन यांचे चांगले संबंध होते. भारतीय जनता पक्षातल्या काही मोठया नेत्यांमध्ये प्रमोद महाजन यांचं नाव घेतलं जातं. असंही म्हणतात की प्रमोद महाजन हे पंतप्रधान पदाचे दावेदार होते.
2005 ला अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचं ठरवल्यानंतर पक्षाचं काम लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्यावर सोपवलं होतं. पण 22 एप्रिल 2006 ला प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्याही त्यांच्या भावाकरवी म्हणजे प्रवीण महाजन यांच्याकरवी त्यानंतर प्रमोद महाजन यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. पण 3 मे 2006 रोजी प्रमोद महाजन यांनी या जगाचा निरोप घेतला.
असं हे भारतीय जनता पक्षातलं मोठं नाव प्रमोद महाजन वयाच्या 57 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलं. आज त्यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
– सई मराठे