– श्रीकांत ना. कुलकर्णी
नुकत्याच झालेल्या प. बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दोनशेहून अधिक जागा मिळवून सत्तेची हॅटट्रिक केली. त्यामुळे प. बंगालमध्ये सत्ता मिळविण्याचे भाजपचे स्वप्न मात्र भंगले. या निवडणुकीत भाजपलाच सत्ता मिळणार असा (अति) आत्मविश्वास बाळगून भाजप नेते प्रचारात मश्गुल होते. त्यासाठी त्यांनी नेहमीची “साम-दाम- दंड-भेद” ही रणनीती अवलंबिली होती. मात्र भाजपने काहीही केले तरी त्यांना दोन अंकी संख्येवरच समाधान मानावे लागेल असे भाकीत तृणमूल काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दोन महिन्यापूर्वीच व्यक्त केले होते. आणि त्यांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरल्याचे निवडणूक निकालावरून कळून आले.
गेल्या काही वर्षापासून भारतीय राजकारणात प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे नाव एक रणनीतीकार म्हणून प्रामुख्याने चर्चिले जात आहे. त्यांच्या रणनीतीचा अनेक पक्षांना लाभ झाला आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की साहजिकच प्रशांत किशोर यांचा ‘सर्वपक्षीय’ भाव वधारतो. आता तर केवळ राजकीय पक्षांचे नव्हे जनतेचेही त्यांच्या रणनीतीकडे लक्ष लागून राहते.
पूर्वीच्या काळात निवडणुका जिंकायच्या म्हणजे जाहीर प्रचारसभा, कॉर्नर मीटिंग्ज, जाहीरनामा, पत्रकार परिषदा आदी निवडक बाबींवरच भर देण्यात येत असे. मात्र जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तसतसे या तंत्रज्ञानाचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी, पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी करून घेण्याची गरज निर्माण होऊ लागली. देशातील वातावरणाचा लाभ करून घेण्यासाठी पक्षाची खास रणनीती आखण्यात येऊ लागली. राजकीय अभ्यासक असलेल्या चाणाक्ष प्रशांत किशोर यांनी हे सर्व ओळखून सुरुवातीला राजकीय व्यूहरचना आखणारी एक एजन्सीच सुरु केली. अगदी सुरुवातीला म्हणजे २०११ साली प्रशांत किशोर यांनी आपल्या या एजन्सीतर्फे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास ‘रणनीती’ आखून त्यांना गुजरातचे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमत मिळवून दिले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी २०१३ साली स्वतःची ‘कॅग’ नावाची (सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स) एक निवडणूक प्रचार यंत्रणाच स्थापन केली आणि २०१४ साली नरेंद्र मोदी यांना भाजपतर्फे भावी पंतप्रधान म्हणून घोषित करून केंद्रात भाजपची सत्ता आणण्यास फार मोठा हातभार लावला.
त्याकाळात प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी राबविलेले “चाय पे चर्चा”, “थ्री-डी रॅलीज”, “रन फॉर मॅरॅथॉन”, “मंथन” आदी कार्यक्रम खूपच गाजले आणि त्यांची देशभर चर्चा झाली. याशिवाय त्यांनी मोदी यांच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला. (खरे तर त्यावेळेपासूनच प्रचाराच्या बाबतीत निवडणुकीवर होणारा सोशल मीडियाचा खरा प्रभाव कळून आला). त्यामुळे प्रशांत किशोर ‘राजकीय चाणक्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
श्री निरंजन मुखोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘नरेंद्र मोदी’ या पुस्तकात प्रशांत किशोर यांच्या त्याकाळातील प्रचारयंत्रणेचा आवर्जून उल्लेख केला असून २०१४ साली मोदी यांच्या टीममधील प्रशांत किशोर हे फार महत्वाचे शिलेदार होते असे म्हटले आहे.
पुढे नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आपल्या ‘कॅग’ संस्थेचे रूपांतर ‘आय-पॅक’ ( इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी ) या नवीन संस्थेत केले. त्यानंतर या नव्या संस्थेतर्फे त्यांनी २०१५ साली बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या जनता दल ( यु ) पक्षासाठी, २०१६ साली पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या काँग्रेस पक्षासाठी, २०१९ साली जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस (आंध्रप्रदेश) पक्षासाठी, २०२० साली दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीसाठी, २०२१ साली द्रमुक (तामिळनाडू) आणि तृणमूल काँग्रेस (प. बंगाल) या पक्षासाठी त्यांनी रणनीतीकार म्हणून काम करून या पक्षांना त्या त्या राज्यात सत्ता मिळवून देण्याचे यशस्वी काम केले.
२०१६ साली झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही प्रशांत किशोर यांना पक्षाचे रणनीतीकार म्हणून निश्चित केले होते परंतु तेथे मात्र त्यांना काँग्रेसच्या अटी लक्षात घेता व्यूहरचना करताना फार अवघड गेले आणि त्यामुळे त्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विधानसभेत प्रचंड बहुमत मिळाले.
सुरुवातीला संयुक्त राष्ट्र संघात काही वर्षे काम केलेले श्री प्रशांत किशोर हे बिहारचे असल्यामुळे आपल्या राज्याचा प्रगतीसाठी त्यांनी राज्याच्या ‘रोल मॉडेल’ साठी विविध उपाय सुचविले. २०१५ साली नितीशकुमार यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यात त्यांचे ‘सल्लागार’ म्हणून त्यांचा महत्वाचा वाटा होता. नितीशकुमार आणि त्यांचे संबंध नंतर इतके दृढ झाले की २०१८ साली प्रशांत किशोर यांनी जनता दलात (यु) प्रवेशही केला. परंतु २०२० साली नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीवरून त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांचा पक्षीय राजकारणाचा प्रवास तेथेच संपला. त्यानंतर त्यांनी पुन्हा इतर राजकीय पक्षांसाठी रणनीती आखण्याचे आपले काम पुढे चालू ठेवले.
एक रणनीतीकार म्हणून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणि तामिळनाडूमध्ये द्रमुकला त्यांनी मोठा विजय प्राप्त करून दिला. त्यानंतर लगेचच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, आपण राजकीय रणनीतीकार म्हणून आता संन्यास घेत असल्याची घोषणा केली. “मी आजपर्यंत या क्षेत्रात खूप काही केले मात्र यापुढे मला माझ्यासाठी वेळ हवा आहे.” हे त्यांनी आपल्या निवृत्तीचे कारण सांगितले आहे.
देशातील सध्याच्या विविध राजकीय पक्षांची अवस्था पाहता कदाचित ते आगामी काळात स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या या पक्षाला लोकांचा कितपत पाठिंबा मिळेल हे सांगणे अवघड आहे. ते नाहीच जमल्यास पुन्हा ‘रणनीतीकार’ म्हणून ते आपले काम सुरु करू शकतात कारण “सत्ता मिळवून देणारा चाणक्य” होणे कोणाला आवडणार नाही?
- श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)