Home » वँग यी भेटले… आता पुढे काय?

वँग यी भेटले… आता पुढे काय?

by Team Gajawaja
0 comment
वँग यी Wang Yi
Share

बऱ्याच खटाटोपीनंतर अपेक्षित असलेली, पण आधी न ठरलेली अशी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी (Wang Yi) यांची प्रस्तावित ‘भारत भेट’ एकदाची झाली. असा उल्लेख करायचं कारण म्हणजे वँग यी यांची भारत भेट ही आधी ठरलेली नव्हती, पण शक्यता वर्तवण्यात येत होती की दक्षिण आशिया भेटीवर असलेले वँग यी हे भारत भेटीवर येतील. 

दोन्हीही देशांनी म्हणजे, भारत आणि चीनने या बद्दल अधिकृतपणे न बोलणंच पसंत केलं. याला एक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे २०२०च्या गलवान संघर्षाची… आतापर्यंत गलवान संघर्षानंतर जवळपास १५ वेळा भारत आणि चीन यांच्या दरम्यान लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणजे कॉर्प्स कमांडर्स स्तरावर बैठका झाल्या होत्या. त्यात प्रगती झाली नाही आणि म्हणून सैनिकी बैठकीपेक्षा, राजकीय बैठकांमधून काही फलनिष्पत्ती होते का, याचा  ऊहापोह करायचा होता आणि म्हणूनच या बैठक झाल्या. 

नेमकं सांगायचं म्हणजे वँग यी (Wang Yi) हे दक्षिण आशियाच्या दौऱ्यावर होते. म्हणजे ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथल्या बैठका आटपून भारत भेटीवर आले होते. पण वँग यी यांचं भारत भेटीवर येण्याचं कारण काय? 

थेट बोलायचं झाल्यास भारत आणि चीन द्विपक्षीय संबंध सुधारणे आणि त्यांना सामान्य स्तरावर आणणे हा या बैठकी मागचा मूळ हेतू होता. फार महत्वाच्या घडामोडी या बैठकीत घडल्या. 

सुरुवातीला चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी (Wang Yi) हे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटले. या बैठकीत डोवाल यांनी यी यांना भारत चीन सीमारेषेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने प्रयत्न करावेत. जोपर्यंत चीन आपले सैनिक LAC वरुन मागे घेत नाही आणि चीनी सैनिक त्यांच्या आधीच्या ठिकाणावर जात नाहीत तोपर्यंत भारत चीन शांतता वार्ता सफल होऊ शकत नाहीत असं सांगितलं. 

यी यांनी दुसरी भेट घेतली ती होती भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची.  जयशंकर यांनीसुद्धा वँग यी (Wang Yi) यांना सांगितलं की, भारत चीन सीमेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने आपले सैनिक तिथून मागे घेणं गरजेचं आहे. 

यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर, भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेतली आणि त्यात हे ठसवून सांगितलं की, भारताला शांतता हवी आहे पण चीनने काही गोष्टींची पूर्तता केल्यासच आपल्याला पुढे जाता येईल. 

जयशंकर यांनी परिषदेत भारताचे चीन बरोबर संबंध हे ‘वर्क इन प्रोग्रेस’ आहेत असं सांगितलं. म्हणजे संबंध सुधारण्याच काम चालू आहे, पण पूर्ण यश आलेलं नाही. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, असा अर्थ त्यातून निर्देशित होतो. तसंच जयशंकर यांनी हे ठासून सांगितलं की, भारत चीन संबंध सद्य परिस्थितीत सामान्य नाहीयेत.  

वँग यी (Wang Yi) यांच्या भेटीमागे अजूनसुद्धा काही कारणं होती. ती म्हणजे सध्याच्या रशिया- यूक्रेन युद्धात चीनच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा. तसंच भारताने अमेरिकेच्या दबावाखाली येऊ नये. चीन सरकारच्या मुखपत्रात म्हणजे ‘ग्लोबल टाइम्स’ मधल्या लेखाने तर, भारताने रशिया-यूक्रेन युद्धात तटस्थ भूमिका घेतल्याबद्दल भारताचं अभिनंदन करून चीन मोकळा झाला. तसंच परत एकदा, “हिंदी – चीनी भाई भाई” ची रि ओढली होती. 

चीनने भारताच्या भूमिकेची स्तुती केली आणि भारत चीन या दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा आणि एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. वँग यी यांच्या भेटीचं अजून एक कारण म्हणजे जी-२०, ब्रिक्स आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यांचं यजमान पद चिनकडे आहे म्हणजे चीनमध्ये या तीन गटांच्या बैठका होणार आहेत, यासाठी श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षपणे या तीनही बैठकाना उपस्थित राहावे यासाठी खास जिनपिंग यांचा खलिता घेऊनच ते आले होते.

======

हे देखील वाचा – चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी (Wang Yi) यांची  प्रस्तावित भारत भेट नक्की कशासाठी?

=====

यादरम्यान वँग यी (Wang Yi) यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले. एक महत्वाची बाब इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, वँग यी (Wang Yi) यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. पण मोदी यांनी यी यांची भेट घेतली नाही. याबद्दल भारताने बोलण्याचे टाळले. 

याचा अर्थ सरळ आहे की, भारत ‘गलवान’ प्रसंग विसरलेला नाही, चीनने विश्वासघात केला. पण हा पूर्वीचा भारत नाही, हे कळण्यासाठी मोदी यांनी भेट नाकारणं म्हणजे एक मोठं डिप्लोमॅटीक पाऊल आहे. हे ठळकपणे इथे जाणवतं. यातून चीनला योग्य तो संदेश जाईल. भारताने भक्कम भूमिका घेतली आहे याचं हे द्योतक आहे इतकंच म्हणावंसं वाटतं.

-निखिल कासखेडीकर  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.