15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन असलेल्या या दिवशी प्रत्येक भारतीयांचे मन देशप्रेमाने आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेले असते. १५० वर्ष इंग्रजांच्या अधिपत्याखाली काढल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हे सहजासहजी मिळालेले स्वातंत्र्य नव्हते. त्यामागे असंख्य शूरवीरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली.
या स्वातंत्र्य लढ्यात आपण अनेक महान आणि हुशार क्रांतिकारी गमावले. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव असतो. ऑगस्ट महिना लागला की सगळीकडेच स्वातंत्र्य दिनाचे वारे वाहू लागतात. संपूर्ण देशच या स्वातंत्र्य दिनाची तयारी जोरदार करत असतो. मात्र दिल्लीला काही औरच रंगत असते. देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा दिल्लीमध्येच असतो. संपूर्ण देशातील जनता प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून किंवा टीव्हीवर हा सोहळा बघून त्याचा आनंद घेते. दिल्लीतील लाल किल्ल्यावर हा भव्य सोहळा दरवर्षी संपन्न होतो.
१५ ऑगस्ट आता काही तासांवर आला आहे. लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्यावरून तिरंगा फडकवून देशाला संबोधित करतील. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यावरून सर्वप्रथम तिरंगा फडकावला होता. त्यानंतर आलेल्या सर्वच पंतप्रधानांनी ही परंपरा पुढे नेत १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण सुरू करणे सुरु ठेवले. मात्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लाल किल्ल्याचीच निवड का करण्यात आली? याचे उत्तर माहित आहे का? चला जाणून घेऊया.
दिल्लीतील लाल किल्ला देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. 4 जुलै 1947 मध्ये ब्रिटिश हाउस ऑफ कॉमन्समध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल करण्यासंदर्भातील विधेयक मांडण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांत हे विधेयक मंजूरही झाले. त्यानंतर लगेच 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले होते.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला होता. तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधानांनी ही परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान देशवासियांना संबोधित देखील करतात.
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरूनच पंतप्रधानांनी ध्वजारोहण करावे, असा कोणताही उल्लेख संविधानात करण्यात आलेला नाही. मात्र देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सुरु केलेली ही परंपरा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कायम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ध्वजारोहणासाठी लाल किल्ला हे ठिकाण निवडण्यामागचे कारण या ऐतिहासिक वास्तूमध्ये दडलेले आहे. दिल्लीतील लाल किल्ला मुघल सम्राट शाहजहां यांनी त्यांची राजधानी शाहजहांनाबादच्या महलच्या स्वरुपात बनवला होता. त्याची निर्मिती 1683 ते 1648 दरम्यान झाली. हा किल्ला शक्तीचे प्रतिक मानला जातो.
19व्या शतकापर्यंत इंग्रजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव वाढवला आणि 1803 मध्ये दिल्लीवर ताबा मिळवला. त्यावेळी शाही परिवार लाल किल्ल्यात राहत होते. 1857 चा उठाव दाबण्यासाठी हा किल्ला ब्रिटिश फौजांच्या चर्चांचे आणि नियोजनाचे केंद्र होता. मुघल सम्राट बहादूर शाह जफर याच ठिकाणाहून बंडाचे नेतृत्व करत होते. मुघल सम्राटाला गादीवरून हटवल्यानंतर इंग्रजांनी या ठिकाणी ब्रिटिश सैन्याच्या राहण्याची व्यवस्था केली.
हा किल्ला बराच काळ इंग्रजांच्या ताब्यात होता. त्यामुळे या किल्ल्यावरील कलात्मक डिझाईन नष्ट करण्यात आली. त्यांनी मुघल सम्राटांचे मुकूट आणि जवाहिरेही पळवले. देश स्वतंत्र झाला, तेव्हा लाल किल्ल्याला सत्तेचे केंद्र मानून तेथला इंग्रजांचा झेंडा काढून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तेव्हापासून आजतागायत ही प्रथा कायम आहे.
======
हे देखील वाचा : जाणून घ्या उद्याच्या स्वातंत्र्य दिवसाची ‘ही’ माहिती
======
लाल किल्ला मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. १६३९ मध्ये सुरू झालेले बांधकाम सुमारे १० वर्षे चालले. १८५७ पर्यंत येथे मुघलांचे राज्य होते. सध्या येथे अनेक संग्रहालये बनवण्यात आली आहेत. १८५७ च्या बंडाच्या संदर्भात येथे खास संग्रहालय बांधण्यात आले आहे. येथे एक फाशी घर देखील आहे. लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दोन तोफाही आहेत. त्याचे निरीक्षण आणि संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) करत आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सहा दशकांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल १७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या पाठोपाठ १६ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला.