Home » Pakistan : इम्रान खानची मुलं पाकिस्तानच्या वाटेवर !

Pakistan : इम्रान खानची मुलं पाकिस्तानच्या वाटेवर !

by Team Gajawaja
0 comment
Pakistan
Share

पाकिस्तानच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाने ‘फ्री इम्रान खान’ नावाचे आंदोलन देशभरात सुरू केले आहे. ऑगस्ट 2023 पासून इम्रान खान तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी कायम आंदोलन छेडण्यात येत असले तरी यावेळी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात इम्रान खान यांची दोन्ही मुले सहभागी होण्याची शक्यता आहे. सुलेमान इसा खान आणि कासिम खान ही इम्रान खान यांची मुलं इंग्लडमध्ये आपल्या आईसोबत रहात आहेत. तुरुंगात असलेल्या आपल्या वडिलांबरोबर त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना साधा फोनही करता येत नसल्याचा आरोप आहे.

इम्रान खान यांच्यावर तुरुंगात अनेक अत्याचार होत आहेत. पण आपल्या वडिलांबरोबर आपल्याला बोलून दिले जात नाही, अशी या दोघांची तक्रार आहे. याविरोधात इम्रान पुत्रांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पण सुलेमान आणि कासिम पाकिस्तानमध्ये आले तर त्यांना अटक करण्याची तयारी पाकिस्तान सरकारनं केल्याचा आरोप इम्रान यांच्या पत्नी जेमिमा यांनी करत संबंधिक आंदोलन अधिक चिघण्याची शक्यता वर्तवली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहेत. तोशाखाना प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर इम्रान खान यांना 5 ऑगस्ट 2023 रोजी लाहोर येथून अटक करण्यात आली. तेव्हापासून ते रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात आहेत. यानंतर इम्रान खान यांच्यावर एकामागोमाग एक असे गुन्हा दाखल करण्यात आले. त्यावरुन सध्यातरी शाहबाज सरकार त्यांना जामिनीवर सोडण्याच्या मनस्थितीत नाही, हे स्पष्ट झाले.

यातच इम्रान खान यांच्यावर तुरुंगात अनेक अत्याचार होत असल्याच्या बातम्याही येऊ लागल्या आहेत. विषप्रयोग पासून ते शारीरिक अत्याचारालाही इम्रान खान यांना सामोरे जावे लागल्याची कुजबूज पाकिस्तानमध्ये झाली. या सर्वांमुळे इम्रान खान यांची दोन मुले अस्वस्थ झाली आहेत. इंग्लडमध्ये राहणारे सुलेमान आणि कासिम ही इम्रान खान यांची दोन्ही मुले त्यांना तुरुंगात संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र फोनद्वारे त्यांचे बोलणेही करुन देण्यात येत नाही. या सर्वांमुळे इम्रान खान यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असून त्यांच्या जीवाचे बरेवाईट कऱण्यात येईल, अशी भीतीही या दोन मुलांनी व्यक्त केली आहे. या सर्वांबाबत आता सुलेमान आणि कासिम आंतरराष्ट्रीय पातळीवरुन शाहबाज सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोबतच तहरीक-ए-इन्साफ या पक्षातर्फे इम्रान खान यांना सोडवण्याची जे आंदोलन सुरु कऱण्यात आले आहे, त्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे.

5 ऑगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये मोठे जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सुलेमान आणि कासिम हे दोघं करतील अशीही अपेक्षा आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून 72 वर्षीय इम्रान खान यांच्या राजकारणाचे वारसदार असलेला त्यांचा मोठा मुलगा सुलेमान पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश करणार अशीही माहिती आहे. या सगळ्यात इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनीही पाकिस्तान सरकारावर अनेक आरोप केले आहेत. सुलेमान इसा खान आणि कासिम खान यांना त्यांचे वडील इम्रान खान यांच्याशी बोलण्यापासूनही वंचित ठेवण्यात आले आहे, हे कुटुंबाप्रती असलेल्या न्याय आणि लोकशाहीच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे जेमिमा यांनी सांगितले आहे.

इम्रान खान आणि जेमिमा गोल्डस्मिथ यांचे लग्न 1995 मध्ये झाले. 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून जेमिमा, सुलेमान आणि कासिम या दोन मुलांसह इंग्लडमध्ये रहात आहेत. सुलेमान इसा खान यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1996 रोजी लंडनमध्ये झाला. सुलेमान सध्या ब्रिटनच्या राजकारणातही प्रवेश करत आहे. 2016 मध्ये त्याने आपले काका झॅक गोल्डस्मिथ यांच्या लंडन महापौरपदाच्या मोहिमेसाठी युवा निवडणूक कार्यक्रमांचे नेतृत्व केले आहे. इम्रान खान यांचा धाकटा मुलगा कासिम खान याचा जन्म 10 एप्रिल 1999 रोजी लंडनमध्ये झाला. त्यानी ब्रिस्टल विद्यापीठातून इस्लामिक इतिहासात पदवी प्राप्त केली आहे. कासिम खान यांनी मेफू मार्केटिंग हा स्टार्टअप सुरु केला असून सामाजिक उपक्रमातही पुढाकार घेत आहे.

=============

हे ही वाचा : Pakistan : जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीरामांचा जयघोष होतो….

==========

दोन्ही भाऊ सध्या त्यांच्या वडिलांच्या सध्याच्या स्थितीकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधण्यात सक्रिय भूमिका बजावत आहे. आता हे दोन्हीही भाऊ पाकिस्तानमधील राजकारणात एन्ट्री करणार अशी चर्चा सुरु आहे. इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यात परदेश दौऱ्यांदरम्यान मिळालेल्या सरकारी भेटवस्तूंचा गैरवापर, अल-कादिर ट्रस्ट प्रकरण, गोपनीय सरकारी कागदपत्र लीक केल्याचा आरोप, इस्लामिक विवाह कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप, 9 मे 2023 मध्ये झालेल्या अटकेनंतर देशव्यापी हिंसाचाराबाबत आरोप दाखल आहेत. या सर्वातून इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या सर्वात इम्रान खान यांच्या मुलांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी म्हणून विचार कऱण्यात येत आहे. त्यामुळेच पुढच्या काही दिवसातच इम्रान खान यांचा वारसा सुलेमान खान चालवणार का, हे स्पष्ट होणार आहे.

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.