योग हा जीवनाचा पाया आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या अगदी प्रत्येक टप्यात उत्तम आरोग्यासाठी योगासनं करणं आवश्यक आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यासाठी योग आणि व्यायाम उपयोगी ठरतो. अगदी बालवयापासून योग आणि व्यायामाची सवय लागली, तर भविष्यात होणाऱ्या अनेक शारीरिक व्याधींना नक्कीच अटकाव करता येऊ शकतो. याशिवाय एकाग्रता, सकारात्मकता आणि निग्रही वृत्तीही योग आणि व्यायामाच्या रोजच्या सवयीमुळे अंगी बाळगते. या सर्वांचा लहान मुलांच्या विकासासाठी खूप फायदा होतो. (Yoga for kids)
लहान मुलं चंचल असतात. एका जागी बसत नाहीत. त्यांचे खाण्याचेही फार नखरे असतात. अभ्यासात त्यांचे मन लागत नाही. टिव्हीपुढे या लहानग्यांचा खूप वेळ जातो आणि एकदा मोबाईल हातात घेतला तर अजिबात सोडत नाहीत. अशा एक ना अनेक तक्रारी छोट्या मंडळींबाबत त्यांचे पालक करत असतात आणि त्या खऱ्याही असतात. (Yoga for kids)
आजकाल लहान मुलांचे पालकत्व हा एक आव्हानात्मक विषय मानण्यात येतो. या छोट्यांना लहान वयातच योगासनांचे धडे दिले तर यांच्या बाबतीतील अनेक समस्या सहज सुटू शकतील. कारण योगासनांचा फायदा शारीरिक तसंच मानसिक आरोग्यालाही होतो. लहान मुलं ही अनुकरणीय असतात. बऱ्याचवेळा आपले आईवडील जे करतात त्याचेच ते अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या लहानग्यांसोबत काही सोप्पी आणि सुलभ आसनं केली तर नक्कीच याचा दोघांनाही चांगलाच फायदा होतो.
व्यायामात् लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखं
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थं सर्वार्थसाधनम्
ताडासन, वीरासन, पश्चिमोत्तासन, त्रिकोणासन, वृक्षासन, पादहस्तासन, सूर्यनमस्कार या आसनांचे संस्कार मुलांवर लहानपणीच झाले, तर त्यांचा शारीरिक विकासही चांगल्या प्रकारे होतो. ताडासन, वीरासन, पश्चिमोत्तासन, त्रिकोणासन, वृक्षासन, पादहस्तासन, सूर्यनमस्कार या आसनांचे संस्कार मुलांवर लहानपणीच झाले, तर त्यांचा शारीरिक विकासही चांगल्या प्रकारे होतो. कोरोनानंतर तर योग आणि व्यायाम यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. तसंच आता लहान मुलांमध्येही वेगवेगळे आजार आणि लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली आहे. टिव्ही आणि मोबाईलचा वापर वाढल्यानं छोट्यांच्या डोळ्यावर अगदी लहानपणीच चष्मा आला आहे. या लहानग्यांना योगासनांची सवय लावल्यास त्यांच्या आरोग्य समस्या नक्कीच कमी होऊ शकतील.
पद्मासन हे त्यातील प्रारंभीक आसन म्हटलं पाहिजे. यातून मुलांना बसण्याची सवय लागते. हल्ली जेवणासाठीही टेबल खुर्चीचा वापर केला जातो. जमिनीवर बसण्याची सवयच सुटली आहे. त्यामुळे बैठक स्थितीमधले हे आसन उपयोगी पडते. दोन्ही पाय क्रमाक्रमाने गुडघ्यांत दुमडून दोन्ही हात गुडघ्यांवर टेकवून ज्ञानमुद्रा असलेले हे आसन मनाच्या एकाग्रतेसाठी फायदेशीर ठरतेच. शिवाय पाठीचा कणाही ताढ रहण्यास मदत होते. (Yoga for kids)
याच आसनमुद्रेत त्राटक आसनही करण्यात येते. यामध्ये मुलांच्या समोर एक मेणबत्ती ठेवून मेणबत्तीच्या वातीला एकटक बघायला सांगायचं. हे आसन केल्यामुळे मुलांची दृष्टी सुधारते. तसंच त्यांचं मन कोणत्याही कामात एकाग्र होते. जोपर्यंत डोळ्यातून पाणी येत नाही तोपर्यंत हे आसन मुलांना करायला सांगा. हे आसन मुलांसाठी खूप फायदेशीर आहे.
=====
हे देखील वाचा – कोरोनाच्या चौथ्या लाटेत सुरक्षित राहायचं असेल तर करा योगसाधनेचा स्वीकार
=====
बरं मुलं ठराविक वेळी योगासने करण्यास कंटाळा करतात, अशावेळी त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणेही आसनं करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यात ताडासन हे आसन उपयोगी पडू शकते. या आसनाचा सराव तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त काही खाल्ल्यानंतर हे आसन मुलांना करायला देऊ नका. यासाठी विशेष काळजी घ्या.
सकाळी उठल्यानंतर ताडासन केल्यास ते शरीरासाठी जास्त लाभदायक ठरते. विशेषतः ज्या मुलांची उंची कमी असते, त्यांनी नियमीत ताडासनाचा सराव केल्यास त्यांची उंची वाढते. दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून किंवा दोन्ही पायांमध्ये थोडेस अंतर ठेवून जमिनीवर सरळ उभं रहायचं, हातांच्या बोटांची गुंफण करत श्वासोच्छवास सुरू ठेवत दोन्ही हात हळूहळू वरच्या बाजूस न्यायचे आणि पायाच्या टाचा उचलायच्या. हे करत असतानाच पायांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर वरच्या बाजूस खेचल्यासारखे करावे. (Yoga for kids)
एकदा का मुलांना आसनांची गोडी लागली की, हा आसनांचा क्रम वाढवता येतो. यातून अनेक प्रश्न आपोआप सुटल्याची जाणीव पालकांना होते. मुळात मुलांची पचनक्रीया सुधारते, त्यांना चांगली भूक लागते, मुलांची एकाग्रताही वाढते आणि याचा फायदा त्यांना अभ्यासामध्येही होतो. अर्थात हे फायदे आपल्या मुलांनाही होऊ शकतात. फक्त यासाठी निदान काही वेळ तरी पालकांनी आपल्या मुलांसोबत या योगयात्रेमध्ये सामिल होण्याची गरज आहे. (Yoga for kids)
– सई बने