Home » Importance of the 12 Jyotirlingas : १२ ज्योतिर्लिंगांचे महत्त्व

Importance of the 12 Jyotirlingas : १२ ज्योतिर्लिंगांचे महत्त्व

by Team Gajawaja
0 comment
Share

फाल्गुन महिन्यात कृष्ण चतुर्दशीला भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. या दिवशी शिवभक्त महाशिवरात्रीचा सण साजरा करतात. शिव आणि शक्तीच्या मिलनाची ही कहाणी त्याग, अढळ श्रद्धा आणि दीर्घ प्रतीक्षा यांची आहे. सनातन धर्मामध्ये महाशिवरात्रीचा सण खूप खास मानला जातो. या वर्षी महाशिवरात्र १५ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यासाठी देशभरातील शिवमंदिरांमध्ये तयारी सुरु झाली आहे. भारतात भगवान शंकराची असंख्य मंदिरे आहेत. तथापि, त्यापैकी सर्वात पवित्र म्हणजे १२ ज्योतिर्लिंगे, ५ पंच केदार आहेत. १२ ज्योतिर्लिगांसोबत केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर हे पंचकेदारही भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहेत. या सर्वच धार्मिक स्थळांची यात्रा करणे हिंदू धर्मात विशेष मानले जाते. त्यातही १२ ज्योतिर्लिगांना मोठे महत्त्व आहे. ही १२ ज्योतिर्लिंग कुठलही हे जाणून घेऊयात. ( Importance of the 12 Jyotirlingas )

भगवान शंकराचे अनेक भक्त आहेत. या भक्तांना १२ ज्योतिर्लिंगांना जाण्याची मोठी इच्छा असते. असे मानले जाते की, या १२ ठिकाणी भगवान शंकर प्रकाशाच्या रूपात निवास करतात, म्हणूनच या 12 मंदिरांना ज्योतिर्लिंग म्हटले जाते. बारा ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर (विश्वनाथ), त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घुश्मेश्वर (घृष्णेश्वर) यांचा समावेश आहे. शिव पुराणात वर्णन केलेल्या कथेनुसार, येथे प्रकाशाच्या स्वरुपात आजही भगवान शंकराचे वास्तव्य आहे. त्यामुळे ही १२ ज्योतिर्लिंग श्रद्धा, भक्ती आणि मोक्षाचे प्रतीक मानली जातात.

सनातन धर्मात, भगवान शंकर हे संपूर्ण विश्वासाठी उर्जेचे मूळ स्रोत मानले जातात. भगवान शंकराची अनेक रुपे असली तरी त्यातही ज्योतिर्लिंग रूप सर्वात पवित्र मानले जाते. भारतात अशी १२ पवित्र ज्योतिर्लिंगे आहेत, ज्यांचे केवळ घेण्यानं मोक्षाची प्राप्ती होते, असे मानले जाते. या १२ ज्योतिर्लिंगाबाबत आख्यायिकाही आहे. त्यानुसार, ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात एकदा कोण श्रेष्ठ आहे यावर वाद सुरु झाला. हा वाद वाढल्यावर तिथे भगवान शंकर अग्नीच्या अंतहीन खांबाच्या रूपात प्रकट झाले. यावेळी ब्रह्माने वरच्या टोकाचा शोध घेतला आणि विष्णू खालच्या टोकाचा, परंतु दोघेही अयशस्वी झाले. त्यानंतर भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी सर्वत्र समान असलेले तत्व म्हणजे शिव असल्याचे सांगितले. भगवान शंकरापासून निर्माण झालेला हा दिव्य प्रकाश जिथे दिसला त्याच जागी, पृथ्वीवर १२ ज्योतिर्लिंगे प्रकट झाली. ( Importance of the 12 Jyotirlingas )

यातील पहिले ज्योतिर्लिग गुजरातमध्ये आहे. सोमनाथ मंदिर हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. पौराणिक कथेनुसार, चंद्रदेवाला शापातून मुक्त करण्यासाठी भगवान शंकर येथे प्रकट झाले. या मंदिरातील शिवलिंग हे चमत्कारी होते, ते अर्ध्या अतंरावर तरंगत असल्याचे सांगण्यात येते. मात्र एकूण १७ वेळा हे मंदिर लुटले गेले. १०२६ मध्ये गझनीच्या महमूदने मंदिर लुटले आणि त्याला आग लावली. प्रत्येकवेळी मंदिर भव्य स्वरुपात उभारण्यात आले. आता या मंदिराचे भव्य स्वरुप पाहण्यासाठी आणि सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येथे रोज हजारो भाविक येतात.

आंध्रप्रदेशमधील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगही विशेष आहे. हे ज्योतिर्लिंग श्रीशैलम पर्वतावर आहे. येथे भगवान शंकर आणि देवी पार्वती दोघांचीही पूजा केली जाते. असे म्हटले जाते की, शिव आपला मुलगा कार्तिकेयला शांत करण्यासाठी येथे आले होते. मध्यप्रदेशमधील उज्जैनचे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे त्याच्या आगळ्या वैशिष्टासाठी भाविकांमध्ये अधिक प्रिय आहे. दक्षिणेकडे तोंड करून असलेले हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे. येथे केली जाणारी भस्म आरती लोकप्रिय असून मंदिरात पहाटे तीन वाजल्यापासून भाविक हर हर महादेवच्या गजरात दर्शनासाठी गर्दी करतात. ( Importance of the 12 Jyotirlingas )

=======

हे देखील वाचा : Lord Shiv : महाशिवरात्री विशेष: महादेवांच्या डोक्यावर चंद्र का आहे?

=======

मध्यप्रदेश राज्यातील आणखी एक मंदिर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. नर्मदा नदीतील ओम आकाराच्या बेटावर असलेले हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन स्वरुपात पुजले जाते. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊनच पवित्र नर्मदा यात्रा सुरु होते, आणि येथेच नर्मदा यात्रा संपतेही. त्यामुळे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते.

झारखंड राज्यातील बैद्यनाथ धामही ज्योतिर्लिंग आहे. हे देवघरमध्ये स्थित एक ज्योतिर्लिंग आहेच शिवाय ते एक शक्तीपीठही असल्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. पौराणिक कथेनुसार, रावणाने येथे भगवान शंकराची तपश्चर्या केली होती. या ज्योतिर्लिंगाची आराधना केल्यामुळे आजारांपासून मुक्तता होते, अशीही भाविकांची धारणा आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे स्थान हे त्याच्या धार्मिक महत्त्वासोबत नैसर्गिक सौदर्यांसाठीही ओळखले जाते. या मंदिराबाबत त्रिपुरसूराच्या वधाची कथा सांगितली जाते. येथूनच भीमा नदीचा उगम होत असल्यामुळे नदीच्या उगमस्थळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. ( Importance of the 12 Jyotirlingas )

महाराष्ट्रातीलच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावात आहे. येथे गोदावरी नदी जवळच्या ब्रह्मगिरी पर्वतापासून उगम पावते. या मंदिराच्या आत, तीन लहान लिंगे आहेत, जी ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवांचे प्रतीक मानली जातात. शिवपुराणानुसार, ब्रह्मगिरी पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी सातशे रुंद पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढल्यानंतर, ‘रामकुंड’ आणि ‘लक्ष्मण’ मंदिरांपर्यंत पोहोचता येते. येथेच आता कुंभमेळा होणार आहे. तामिळनाडूमधील रामनाथस्वामी ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून हिंदू धर्मातील चार धाम पैकीही एक मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या भव्य द्रविड वास्तुकलेसाठी ओळखले जाते. असे मानले जाते की, भगवान रामाने लंका जिंकल्यानंतर येथे भगवान शंकराची पूजा केली. तसेच भगवान हनुमानाने आणलेले विश्वलिंगाची देखील येथे पूजा केली.

गुजरात राज्यातील नागेश्वर ज्योतिर्लिंगही त्याच्या वैशिष्ट्यामुळे ओळखले जाते. द्वारकेजवळ स्थित, हे ज्योतिर्लिंग नाग देवतेशी संबंधित आहे. येथे, भगवान शंकराने भक्त सुप्रियाचे रक्षण केल्याची आख्यायिका सांगितली जाते. ज्योतिर्लिंगांमध्ये काशीमधील विश्वनाथ ज्योतिर्लिंगाला अधिक महत्त्व आहे. काशीला मोक्षाचे शहर म्हटले जाते. येथे असलेले ज्योतिर्लिंग अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिराचे मुख्य देवता श्री विश्वनाथ आणि विश्वेश्वर म्हणून ओळखले जातात. त्याचा अर्थ विश्वाचा स्वामी आहे. पहाटे तीनपासून विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येथे येतात. उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंगाला जाण्यासाठी जगभरातील शिवभक्त उत्सुक असतात. हिमालयात स्थित, हे सर्वात उंच ज्योतिर्लिंग आहे. पांडव आणि आदि शंकराचार्यांशी संबंधित आख्यायिका या मंदिराबाबत सांगितल्या जातात. या सर्व ज्योतिर्लिंगासोबत महाराष्ट्रातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे. घुश्मा नावाच्या भक्त महिलेच्या भक्तीने प्रसन्न होऊन, भगवान शंकर प्रकट झाल्याची कथा सांगितली जाते. ( Importance of the 12 Jyotirlingas )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.