भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. या विविध भाषांप्रमाणेच प्रत्येक प्रांतामधल्या खाद्यपदार्थाचीही ओळख आहे. मात्र या सर्व खाद्यपदार्थांमध्ये एक वस्तू तुम्हाला हमखास मिळेल, ती म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याच्या (Curry Leaves) पानांची फोडणी पडल्याशिवाय कुठलाही भारतीय पदार्थ पूर्ण होत नाही. ही कढीपत्त्याची पानं फक्त पदार्थांचा स्वाद वाढवतात असे नव्हे तर तो खाद्यपदार्थ आरोग्यदायीही करतात. कढीपत्याचा (Curry Leaves) वापर जिथे रोज होतो, त्या घरात जेवण पचनाबाबतच्या तक्रारी फार कमी प्रमाणात आढळतात. तसेच केसांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या कढीपत्त्याचा (Curry Leaves) मोठा हातभार आहे. कढीपत्त्याची ताजी पाने म्हणजे भारतीय आहारातील आवश्यक असा भाग आहे. स्वयंपाक करतांना तेल, मोहरी सोबत ही कढीपत्त्याची (Curry Leaves) पाने टाकलीच जातात. दक्षिण भारतीय सांबार मसाल्यामध्ये ही कढीपत्त्याची पाने टाकल्याशिवाय ते सांबर पूर्ण होतच नाही. ही कढीपत्त्याची पानं जरी लहान असली तरी ती जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात. त्यात लोह, प्रथिने असे आवश्यक पोषक घटक आढळतात. हे सर्व पोषक घटक शरीराच्या आरोग्यासाठी आणि खासकरुन केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात.
कढीपत्त्यांच्या (Curry Leaves) पानांचा उपयोग कसा होतो याचा थोडक्यात आढावा घेऊया. कढीपत्त्याची पानं ही केसांसाठी वरदान मानली जातात. अगदी केसांची वाढ होण्यासाठी ते केस दुभंगण्याची समस्या जाणवत असेल त्यांनाही कढीपत्त्यांच्या (Curry Leaves) पानांची पावडर किंवा ही पानं तेलात उकळून लावली तर त्याचा फायदा होतो. हिवाळ्यात, बहुतेकांना केसांमध्ये कोंड्याची समस्या जाणवते. कोंडा झाल्यास केस गळू लागतात. केसांमध्ये कोंडा झाल्यास केसांची मुळे कमकुवत होऊन केस तुटायला लागतात. शिवाय कोंडा वाढल्यास केसात सतत खाज येते आणि असे केल्यास केसात पुळ्या येण्याची शक्यता असते. अनेकवेळा या पुळ्यांमधून रक्तही येतं. या सर्वांचा परिणाम केसांवर होतो आणि केस गळतीचे प्रमाण वाढते. ही कोड्यांची समस्या दूर करण्यासाठी कढीपत्त्याची पानं वरदान ठरतात. याचा वापर केल्याने केसांमधील कोंडा तर दूर होतोच, शिवाय केसांची मुळं मजबूत होतात आणि डोक्यामध्ये झालेल्या जखमाही भरुन निघतात. कढीपत्त्यात (Curry Leaves) जीवनसत्त्वे, लोह, प्रथिने आणि असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. हे सर्व पोषक केसांच्या वाढीसाठी खूप मदत करतात आणि त्यांना मजबूत करण्यासाठी काम करतात. कढीपत्त्यातील या औषधी गुणांमुळे केसांची वाढ चांगली होते आणि केस दाट होण्यासाठी मदत होते. हिवाळ्यात कढीपत्त्याचा वापर करतांना खोबरेल तेलात ही पानं टाकून त्याला गरम करावे. असे तेल थंड झाल्यावर त्याचा ठराविक दिवासांनी केसांना मसाज करावा. काही तासांनी केस धुवावे, असे नियमीत केल्यास कोंडाही दूर होतो आणि थंडीत केस रुक्ष होतात, हा केसांचा रुक्षपणा या तेलामुळे दूर होतो आणि केसांची वाढ होते. कढीपत्त्याबरोबरच (Curry Leaves) या तेलामध्ये कापूरचाही वापर केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. कापूर डोक्यामध्ये जखमा झाल्या असतील तर त्या भरुन काढण्यास मदत करतो. हे मिश्रण केसांना काही दिवस लावल्यास त्याचा फायदा लवकरच दिसून येतो.
केसांसाठी वरदान असलेली कढीपत्त्याची पानं आरोग्यासाठीही तेवढीच पुरक आहेत. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश नियमीत करा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. थंडीमध्ये कफ, कोरडा कफ यांचा त्रास जाणवतो. यातही कढीपत्त्याचा (Curry Leaves) वापर फायदेशीर होतो. कढीपत्ता बारीक करून मधासोबत खाल्यास कफाचे प्रमाण कमी होते. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते. काहींना त्वचेवर पांढरे डाग पडतात, पुरळ येते. अशावेळी कढीपत्त्याचा वापर जेवणात करावा आणि ही कढीपत्त्याची पानं बारीक करुन या पुरळावर लावावी. असे केल्यास हे पुरळ निघून जाते. तसेच त्वचेला होणारी जळजळ कमी होते.
========
हे देखील वाचा : अल्ट्रासाउंडपूर्वी चिकट जेल ‘या’ कारणास्तव लावले जाते
========
यासोबतच जर पचनाचा त्रास जाणवत असेल किंवा जुलाब होत असतील तर कढीपत्त्याची(Curry Leaves) पानं बारीक करुन ताकात टाकून घेतली जातात. यामुळे पोटातील दोष दूर करण्यास मदत होते. बहुतांश भारतीय कुटुंबात ताजी कढीपत्त्याची पानंच जेवणात वापरली जातात. पण काही ठिकाणी ही कढीपत्त्याची पानं मिळत नाहीत, तिथे कढीपत्त्याच्या पानांच्या पावडरचाही वापर करण्यात येतो. काहीवेळा कढीपत्त्याच्या (Curry Leaves) पानांची चटणी करुन तिचा रोजच्या आहारात वापर केला जातो. जेणेकरुन रोज पोटात थोडातरी कढीपत्ता जाईल, याची काळजी घेतली जाते. कढीपत्ता हा सर्व ऋतुंमध्ये फायदेशीर आहे. पण थंडीमध्ये ही कढीपत्त्याची पानं आहारात नियमीत घेतली तर त्वचा कोरडी होण्याची समस्या दूर होते. वर्षाचे बाराही महिने या पानांनी आहाराची गुणवत्ता वाढते तसेच आरोग्यालाही वरदान मिळते.
सई बने…