अमेरिकेत सध्या इमिग्रेशन विभागाचे कर्मचारी किती निष्ठूरपणे वागत आहे, याचे एक उदाहरण समोर आले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन क्रॅकडाउनमुळे या विभागातील एजंट हे मोठ्या व्यक्तिंनाच नाही तर लहान मुलांनाही पकडत आहेत. नुकतेच या इमिग्रेशन विभागानं चक्क एका पाच वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. या मुलाला पकडून मग त्याच्या वडिलांना पकडण्यात आले. वडिलांना पकडण्यासाठी पाच वर्षाच्या मुलाला प्यादे म्हणून वापरल्यामुळे अमेरिकेतील इमिग्रेशन विभागावर चहूबाजुनं टीका होत आहे. मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस येथील ही घटना आहे. अमेरिकेचा इमिग्रेशन विभाग, प्रामुख्याने अमेरिकेच्या नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवा, देशातील कायदेशीर इमिग्रेशन फायदे आणि सेवांचे व्यवस्थापन करण्याचे काम करते. ग्रीन कार्ड, नागरिकत्व, आश्रय, वर्क परमिट आणि व्हिसा याचिका संदर्भात नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार या विभागाला आहे. ( ICE Arrests Child Minneapolis )

हा विभाग कायदेशीर इमिग्रेशन हाताळतो, बेकायदेशीरपणे कोणी अमेरिकेत प्रवेश घेतला असेल तर त्यांना पकडण्याचे सर्वाधिकारही या विभागाला आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर या इमिग्रेशन विभागाला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. अमेरिकेत बेकायदेशीरपणे रहाणा-यांना शोधण्यासाठी विशेष गट स्थापन करण्यात आले. सोबतच ज्यांचा व्हिसा संपला आहे, वा ज्यांनी कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, अशांचाही शोध घेऊन त्यांना पकडण्याचा अधिकार या विभागाला देण्यात आला आहे.
एका अहवालानुसार २०२३ पर्यंत अमेरिकेत अंदाजे १४ दशलक्ष बेकायदेशीर स्थलांतरित असल्याची माहिती पुढे आली आहे. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम या बेकायदेशीर नागरिकांना देशाच्या बाहेर काढण्याचे काम सुरु केले. त्यातून इमिग्रेशन एजंटांना अनेक अधिकार मिळाले. मात्र आता हे एजंट त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याची ओरड सुरु झाली आहे. या इमिग्रेशन विभागाच्या कर्मचा-यांनी एका व्यक्तिला पकडण्यासाठी त्याच्या पाच वर्षाच्या मुलाचा अमिष म्हणून वापर केला. मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस येथील प्रीस्कूलमधून घरी परतत असताना ५ वर्षीय लियाम कोनेजो रामोस आणि त्याचे वडील एड्रियन अलेक्झांडर कोनेजो एरियास यांना संघीय एजंटांनी अटक केली. ( ICE Arrests Child Minneapolis )
पाच वर्षाचा लियाम कोनेजो रामोस हा प्रीस्कूलमध्ये जातो. याच लियामला आधी ताब्यात घेण्यात आले. शाळा प्रशासन आणि एड्रियन कुटुंबाच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली आहे. दुपारी एजंटांनी मुलाला आणि त्याच्या वडिलांना त्यांच्या घराजवळ थांबवले. लियाम तेव्हा वडिलांसोबत गाडीमध्ये होता. त्यानंतर या कर्मचा-यांनी लियामला ताब्यात घेतले.
माहितीनुसार लियाम कोनेजो रामोसची आई गर्भवती आहे. ही सर्व घटना होत असतांना तिने घरामध्ये स्वतःला कोंडून घेतले होते. लियामला आणखी एक लहान भाऊ असून तोही तेव्हा त्याच्या आईसोबत घरामध्ये होता. आता लियामच्या वडिलांना, एड्रियन अलेक्झांडर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी लियामलाही आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या दोघांनाही आता टेक्सासमधील डिली डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर इमिग्रेशन विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात आली. मात्र या विभागाच्या अधिका-यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या मुलाच्या वडिलांना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आले होते. ( ICE Arrests Child Minneapolis )
=======
हे देखील वाचा : Dictator Donald Trump : इंटरनॅशनल गुंडा
=======
या पथकाचा सुगावा लागून मुलाचे वडील, मुलाला सोडून पळून गेले. त्यानंतर आयसीई अधिकारी मुलासोबत राहिले. नंतर मुलाचे वडिल परत आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत पत्रकारांनी उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनाही प्रश्न विचारले, तेव्हा त्यांनीही यासर्वामध्ये इमिग्र्रेशन विभागाच्या कर्मचा-यांचा काहीही दोष नसल्याचे स्पष्ट केले आहे. एड्रियन अलेक्झांडर २०२४ मध्ये इक्वेडोरहून अमेरिकेत आले. त्यांच्यावर निर्वासित खटला सुरू असून त्यांना देश सोडण्याचे कोणतेही आदेश नाही. असे असूनही, इमिग्रेशन विभागानं केलेल्या कारवाईवर एड्रियन यांच्या वकिलांनीही टीका केली आहे.
या घटनेनंतर, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलांचा आधार घेऊन त्यांच्या पालकांना अटक करण्याची ही चौथी घटना या भागात झाली आहे. त्यामुळे शाळेतील उपस्थिती झपाट्याने कमी झाली आहे. या भागातील शिक्षकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या घटनेपूर्वी, ८ जानेवारी २०२६ रोजी मिनियापोलिसमध्ये आयसीई अधिकाऱ्यांनी एका महिलेवर गोळी झाडली, ज्यामुळे मोठी निदर्शने झाली आहेत. ( ICE Arrests Child Minneapolis )
सई बने
