Home » ‘उघडले स्वर्गाचे द्वार’

‘उघडले स्वर्गाचे द्वार’

by Correspondent
0 comment
India national cricket team | K Facts
Share

१७ ऑक्टोबरपासून दुबई व ओमान येथे टी२० विश्वचषकाची स्पर्धा सुरु झाली. २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला रंगणार आहे. यानिमित्ताने २००७ च्या पहिल्या टी २० विश्वचषक (ICC Men’s T20 World Cup) स्पर्धेच्या स्मृती जाग्या झाल्या.

२००७ च्या दक्षिण आफ्रिकेतील, पहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेची जेव्हा घोषणा झाली तेव्हा भारतात त्याबाबत फारशी उत्सुकता नव्हती. भारतात तेव्हा टी२० क्रिकेट फारसे रुजले नव्हते. कपिल देवच्या अनधिकृत इंडियन क्रिकेट लीगमुळे या प्रकारच्या क्रिकेटची थोडीशी तोंडओळख झाली होती एवढेच. भारतीय क्रिकेट मंडळाची एकही अधिकृत टी २० स्पर्धा तोपर्यंत होत नव्हती.

दुसरे म्हणजे २००७ च्या मार्चमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी खराब होऊन साखळी स्पर्धेतच बाद होण्याची नामुष्की भारतावर ओढवली होती त्यामुळे क्रिकेटप्रेमी संघावर नाराज होते. द्रविड, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली, लक्ष्मण, कुंबळे यासारख्या दिग्गज खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यास उत्सुक नसल्याचे जाहीर केले. यामुळे संघातील जेष्ठ खेळाडूंच्या शिफारशीनुसार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) कप्तानपदी निवड करण्यात आली. सेहवाग, गौतम गंभीर, हरभजन, युवराज, पठाण बंधू यांनी संघात पुनरागमन केले.

पहिला स्कॉटलंडविरुद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तानशी झाला. रॉबिन उथप्पाने या सामन्यात उपयुक्त ५० धावांची खेळी केली. भारताच्या ९ बाद १४१ या धावसंख्येच्या उत्तरादाखल पाकिस्तान संघाने ७ बाद १४१ धावा केल्या व सामना ‘टाय’ झाला. शेवटच्या चेंडूवर उथप्पाच्या अचूक फेकीवर श्रीशांतने मिस्बाहला धावबाद केले आणि सामन्याचा निर्णय सुपर ओव्हर मध्ये लागला व भारताने सामना जिंकला. सामन्यानंतर धोनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला की सामन्याचा निर्णय हॉकीसारखा लागला.

या विजयानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध १० धावांनी हरला पण नंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका याना हरवून भारत उपांत्य फेरीत पोहोचला. इंग्लंडविरुद्ध सेहवाग-गंभीर जोडीने शतकी सलामी दिल्यावर युवराजने केवळ १६ चेंडूत ५८ धावा काढताना स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा चेंडूंवर सहा षटकार खेचून सोबर्स व रवी शास्त्री यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आर पि सिंगने चार विकेट्स घेऊन भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपांत्य सामना पुन्हा एकदा युवराजने गाजवला. त्याने ७० धावा काढताना भारताला १८८ धावांची मजल गाठून दिली. गोलंदाजीत श्रीशांत, इरफान पठाण, आर. पि. सिंग, हरभजन यांनी ऑस्ट्रेलियाला १७३ धावात रोखले व भारताने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या सामन्यात श्रीशांतने हेडनचा त्रिफळा उडवल्यावर खेळपट्टीवर हात आपटून व्यक्त केलेला आनंद दीर्घ काळ स्मरणात राहील.

पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात गंभीरने आक्रमक ७५ धावा काढल्या तर रोहित शर्माने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करून नाबाद ३० धावा केल्या व भारताने १५७ धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ १५२ धावात बाद झाला. सामन्यातील शेवटचे षटक जोगिंदर शर्माने टाकले. पहिल्याच चेंडूवर मिस्बाहने षटकार खेचला आणि पुढचा चेंडू स्कुप करण्याच्या प्रयत्नात तो श्रीशांतकडे स्क्वेअरलेगला झेल देऊन बाद झाला आणि मैदानात एकच जल्लोष झाला कारण भारताने अनपेक्षितपणे विश्वचषकाला गवसणी घातली होती.

भारतात (Board of Control for Cricket in India) या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ठिकठिकाणी भव्य पडदे लावून सामना दाखवण्याची व्यवस्था केली होती. बहुतेक नोकरदार नेहमीपेक्षा लवकरच घरी पोहोचले होते तर बाजारपेठा ओस पडल्या होत्या. सामना जिंकल्यानंतर रस्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी झाली. १९८३ साली एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतरच्या झालेल्या जल्लोषाच्या आठवणी या वेळी जाग्या झाल्या. भारतीय संघ परत आल्यावर खेळाडूंची विमानतळापासून प्रचंड मिरवणूक काढण्यात आली.

या ऐतिहासिक अजिंक्यपदामुळे भारतात टी २० (T20 World Cup) ची  लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आणि लगेचच २००८ पासून आयपिएल च्या नव्या युगाची सुरुवात झाली.

 T20 World Cup 2007
T20 World Cup 2007

आता तर इंडियन प्रीमियर लीग हीच भारतीय क्रिकेटची ओळख बनली आहे आणि असंख्य गुणवान खेळाडू या स्पर्धेमुळे प्रकाशझोतात येत आहेत. ही स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट मंडळ, खेळाडू, उद्योगपती यांच्यासाठी सर्व इच्छा पूर्ण करणारी ‘कामधेनूच’ ठरली आहे.

जणू २००७ च्या टी२० विश्वविजेतेपदाने भारतीय क्रिकेटसाठी ‘उघडले स्वर्गाचे दार’असा चमत्कार केला असे म्हणणे वावगे ठरू नये.

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.