सध्या ट्विटरच्या चिमणीची चीव चीव बदलली आहे. ही ट्विटरची चिमणी आता एलन मस्क (Elon Musk) या अब्जोपतीच्या नावावर झाली आहे. टेस्ला या बहुराष्ट्रीय कंपनीचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या एलन मस्क यांनी नुकतेच ट्विटर या सोशल मिडीयाला आपल्या खिशात घातले आहे. जवळपास 3,368 अब्ज रुपयांचा हा व्यवहार जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला.
एलन मस्क (Elon Musk) यांच्या नावाची ही चर्चा जशी चालू आहे, त्यासोबत चार वर्षापूर्वी मस्क यांनी ट्विटरबाबत केलेलं एक ट्विट आणि त्याला अमेरिकन पत्रकारांनी दिलेलं उत्तर सुद्धा सध्या सोशल मिडीयावर गाजत आहे. 21 डिसेंबर 2017 रोजी मस्क यांनी, “मला ट्विटर आवडतं”, असं ट्विट केलं होतं. त्यावर मस्क यांनी ट्विटर विकत घ्यावं, असं ट्विट एका अमेरिकन पत्रकारानं केलं होतं. गम्मतीत झालेला हा संवाद एलन मस्क यांनी मात्र खरा करुन दाखवला आणि आता ते ट्विटरचे मालक झाले आहेत.
एलन मस्क (Elon Musk) म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कल्पक व्यावसायिक म्हणून परिचीत आहेत. टेस्लाचे संस्थापक असलेल्या एलन मस्क यांच्या नावावर किती कंपन्या आहेत याची मोजदाद करता येणार नाही. त्यात आता ट्विटरनं भर घातली आहे. ट्विटर हे सोशल मीडिया माध्यम म्हणून ओळखले जाते. संवादाच्या या माध्यमावर एलन मस्क यांनी आपला शिक्का मारला आहे. मात्र ट्विटरवर आपलं नाव नोंदवताना त्यांनी केलेली व्यावहारीक खेळी आता चर्चेत आहे.
यासोबत त्यांनी बरोबर 52 महिन्यापूर्वी केलंलं एक ट्विटही चर्चेत आलं आहे. 21 डिसेंबर 2017 रोजी रात्री 11.20 वाजता एलन मस्क (Elon Musk) यांनी मला ट्विटर आवडतं, असं ट्विट केलं होतं. त्याला अमेरिकन पत्रकार डेव्ह स्मिथ यांनी, “विकत घेतलं का नाही?” असं उत्तर दिलं होतं. त्यावर मस्क यांनी ट्विटरची किंमत किती, असा प्रती प्रश्न केला होता. या ट्विटच्या 52 महिन्यांनंतर म्हणजेच 25 एप्रिल 2022 रोजी एलन मस्क यांनी ट्विटर 3,368 अब्ज रुपयांना विकत घेतलं. मस्कने ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी 4,148 रुपये दिले आहेत.
एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर पत्रकार डेव्ह स्मिथ यांनी प्रथम ट्विट करुन मस्क यांचे अभिनंदन केले. शिवाय मस्कसोबतचे संभाषण मला आयुष्यभर लक्षात राहील, असं म्हणत या संवादाचा स्क्रीन शॉटही त्यांनी ट्विटरवर शेअर केला. स्मिथच्या या ट्विटला 2 तासांत 3.60 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
ट्विटरच्या खरेदी – विक्रीचा हा व्यवहार मस्क यांनी अवघ्या आठवड्याभरात केला. 4 एप्रिल रोजी मस्क यांनी ट्विटरचे 9.2% शेअर्स प्रथम खरेदी केल्याची माहिती दिली. 15 एप्रिल रोजी, त्यांनी थेट ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. त्यावेळी, ट्विटरच्या शेअरहोल्डर्सपैकी एक असलेले सौदी प्रिन्स अल वालीद बिन तलाल एलान यांनी मस्क यांची ऑफर नाकारली. परंतु मस्क यांनी सात दिवस ट्विटरच्या व्यवस्थापनाबरोबर बैठका करुन ट्विटर आपल्या खिशात घातलंच.
=======
हे देखील वाचा – आपल्यापेक्षा 24 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आपल्याच शिक्षिकेशी विवाह करणारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
=======
मस्क यांनी नेहमीच आपण भाषण स्वातंत्र्याच्या बाजूनं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच ट्विटर या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील भाषण स्वातंत्र्य धोक्यात येईल अशी शक्यताही काहींनी व्यक्त केली आहे. मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करत ट्विटरचे नवे मालक मस्क आता नव्या धोरणांवर लक्ष देत आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष टोनाल्ड ट्रम्प यांनीही या व्यवहाराचे स्वागत केले, पण ट्विटरवर येण्यापेक्षा आपण आपल्या वैयक्तिक सोशल मिडीयवरच रहाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.