उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोकणातील दिग्गज नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व सध्या खासदार असलेल्या नारायण राणे यांनी कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी असा दावा केला, की नितेश राणे यांना 50 हजारच्या मताधिक्याने विजय मिळेल. राणे यांनी असा आत्मविश्वास व्यक्त करावा याला तसे सबळ कारणही आहे कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतः राणे यांचा विजय झाला तेव्हा त्यांना 42 हजारांचे मताधिक्य होते. त्यात आणखी भर पडेल, असा त्यांचा अंदाज आहे. हा अंदाज कितपत खरा ठरेल? कणकवली मतदारसंघात लढत कशी असेल? मतदारसंघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेत आहोत. विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहाणार आहोत कणकवली विधानसभा मतदारसंघ. (Kankavali)
एकूणच सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्यातही कणकवली हा राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. सुरुवातीला ते शिवसेनेत असताना त्यांनी या मतदारसंघाची बांधणी केली. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये असताना पंधरा-वीस वर्षे त्यांनी तो मतदारसंघ जपून ठेवला आणि त्यानंतर आता ते भाजपमध्ये असले, तरी त्यांचा हा मतदारसंघ शाबूत आहे. जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली, तेव्हापासून सिंधुदुर्गात राणेविरुद्ध शिवसेना अशीच लढत होत आली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये एकसंघ शिवसेनेची भाजपसोबत युती होती आणि राणे तेव्हा भाजपमध्येच होते. (Political News)
त्यांना किंवा त्यांच्या चिरंजीवांना उमेदवारी मिळू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी जंग जंग पछाडले होते, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. तरीही राणेविरोधकांनाच शिवसेनेच्या वतीने अंतर्गत रसद पुरवण्यात आली होती, हे सर्व राजकीय निरीक्षकांना माहीत आहे. अशा परिस्थितीत कणकवलीमधल्या लढाईकडे सगळ्यांचे लक्ष आहे कारण नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश हे तिथून उमेदवार आहेत. दोन वेळेस तिथून निवडून आलेले नितेश राणे यंदा विजयाची हॅट्रिक करणार का, असा एक प्रश्न आहे. त्यांच्या विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे. वर म्हटल्याप्रमाणे नितेश राणे यांना दोन टर्मचा अनुभव आहे आणि तो त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. (Kankavali)
======
हे देखील वाचा : पनवेल मतदारसंघ कोणाच्या बाजूने?
========
त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये तडफदार हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून त्यांचे नाव प्रस्थापित झाले आहे. त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो. दुसऱ्या बाजूने, संदेश पारकर हे तसे तुल्यबळ उमेदवार म्हणता येतील, पण त्यांना एक अडचणीची गोष्ट ठरू शकते, ती म्हणजे त्यांना उमेदवारी देण्यात झालेला उशीर. महायुतीचे जागावाटप रेंगाळल्यामुळे ज्या अनेक उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे, त्यात पारकर यांचेही नाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कणकवली मतदारसंघांत सहा उमेदवार उभे असून त्यांच्यात आणखी एक संदेश पारकर आहेत. त्यामुळे मतांची विभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आले असल्यामुळे अल्पसंख्याकांची मते आपसूकपणे राणे यांच्या विरोधात जातील, असा एक होरा महाविकास आघाडीच्या बाजूने मांडण्यात येतोय. परंतु नसीम खान नावाचे उमेदवार तिथे उभे आहेत, ते अल्पसंख्याकांची काही मते खाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच ही निवडणूक खूप चुरशीची होईल, असे आज तरी वाटत नाही. नितेश राणे यांच्या दृष्टीने हा एक सोपा पेपर असेल, असा अंदाज आहे. अर्थात मतदार कोणता कौल देतात हे निकालाच्या दिवशीच कळेल. (Political News)