रशियातील तीव्र भूकंपानंतर जपानसह अमेरिका आणि अन्य देशांनाही त्सुनामीचा सामना करावा लागत आहे. हे सर्वच दृश्य भयावह आहे. रशियन जिओफिजिकल एजन्सीने भूकंपाचे मुळ केंद्र असलेल्या कामचटकामध्ये 30 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त दिले आहे. या भागातील बहुतांश इमारती या भूईसपाट झाल्या आहेत. याच भूकंपानंतर जपानलाही 5.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असून त्याचे केंद्र नैऋत्य जपानच्या कागोशिमा प्रीफेक्चरमध्ये होते. या 2025 मध्येही जपानमध्ये अनेक भूकंप झाले असून त्यापैकी काहींची तीव्रता 6.0 किंवा त्याहून अधिक होती. जपानमध्ये भूकंप हे टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे होतात. (Japan)
जपान पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसलेला देश आहे. इथे अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना मिळतात, त्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होतो. पण या सर्वात जपानमध्ये भूकंपामुळे होणारे नुकसान हे फार कमी असते. जपानच्या टोकियो, ओसाका आणि योकोहामा या शहरामध्ये अनेक गगनचुंबी इमारती आहेत. भूंकपप्रवण असलेल्या या भागातील अशा इमारतींना नुकसान होत नाही, याचे सर्व श्रेय जपानच्या तंत्रज्ञानाला द्यावे लागेल. घर उभारण्यासाठी जपानमध्ये काही कडक नियम आहेत, शिवाय घर बांधणीसाठी जे सामान वापरले जाते, ते भूकंप प्रतिरोधक असते. याच नियमावलीमधून तयार झालेल्या जपानच्या घरांचे कितीही तीव्रतेचा भूकंप झाला तरी, फारसे नुकसान होत नाही. परिणामी येथे भूकंपामुळे मानवी हानीही कमी होते. (International News)
जपानी द्वीपसमूह पॅसिफिक रिंग ऑफ फायरच्या काठावर, युरेशियन, फिलीपीन आणि पॅसिफिक टेक्टोनिक प्लेट्सच्या काठावर आहे. येथे एक टेक्टोनिक प्लेट दुसऱ्याच्या खाली जाते, त्यामुळे असाधारण दाब निर्माण होतो. या भूकंपामुळे इतके शक्तिशाली हादरे बसतात की एक सामान्य शहर देखील जमिनीवर कोसळू शकते. पण जपानमध्ये ही परिस्थिती गृहित धरुनच घरांची निर्मिती होते. मुळात येथील बांधकाम व्यवसायातील सर्वोच्च व्यक्तिपासून ते कामगारांपर्यंत सर्वांनाच यासंदर्भातील अद्यायवत तंत्रज्ञानाची माहिती असते. जपानमध्ये भूकंपामुळे होणारी हानी टाळण्यासाठी घरे बांधताना अनेक विशेष तंत्रे आणि मानके पाळली जातात. (Japan)
त्यात मुख्य नियम म्हणजे, जी इमारत बांधायची आहे, तिच्यासाठीचे सामान हे कमीत कमी वजनाचे असावे लागते. अगदी इमारतींच्या बीम, स्तंभ आणि भिंतींची किमान जाडी निर्धारित केलेली असते. त्यामुळे भूकंपाच्या धक्क्यांचा या इमारती सहजपणे सामना करु शकतात. जपानच्या शहरी भागात अनेक उंच इमारती आहेत. या उंच इमारतींमध्ये भूकंपाचे धक्के सहन करण्यासाठीचे उच्चप्रतीचे डॅम्पर्स वापरले जातात. हे डॅम्पर्स म्हणजे, जाड रबर मॅट्स असतात. त्यामुळे इमारतीचे वजनही कमी राखण्यास मदत होते. मुळात जपानमध्ये एखाद्या इमारतीचा प्लॅन पास करतांनाच त्यामध्ये वापरण्यात येणा-या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात येते. भूकंपाचे धक्के जाणवत असतांना ही इमारत कंपन कशाप्रकारे सहन करु शकते, याचे प्रत्यक्षिक घेतले जाते. अशा भक्कम इमारतींमधील घरांमध्येही भूकंपापासून बचाव करण्याची उपाययोजना आवश्यकता करावी लागते. (International News)
जपानी घरांमध्येही भूकंपाच्या हालचाली ओळखणारे आणि एअरबॅग फुगवणारे सेन्सर बसवलेले असतात. भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यावर यामुळे घर जमिनीपासून काही सेंटीमीटर उंचावले जाते. या घरावर भूकंपाच्या धक्क्याचा प्रभाव कमी होतो. या सगळ्यात महत्त्वाची ठरते ती नागरिकांमधील असलेली भूकंपाप्रती जागरुकता. जपानमधील सर्वच शाळांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी भूकंप आल्याचा भोंगा वाजवला जातो. यातून शालेय मुलांना भूकंप आल्यावर आपला जीव कसा वाचवायचा याची माहिती दिली जाते. असाच सराव येथील सर्वच कार्यालयांमध्येही होतो. जपानच्या सर्वच शाळा, कार्यालये आणि इमारतींमध्ये आवश्यक भूकंप बचाव किट तयार ठेवण्यात आलेला असतो. यात प्रथमोपचार किट, पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असतो. (Japan)
==============
हे देखील वाचा :
Japan’s Earthquake : जपानच्या शक्तिशाली भूकंपानंतर 18 देशांना त्सुनामीचा धोका !
=============
भूंकप आल्यास जे मृत्यू होतात, त्यात इमारतींचा भाग पडून होणा-या मृत्युची संख्या अधिक असते. पण जपानमध्ये याच घराच्या भिंती हलक्या फुलक्या पण भक्कम अशा तयार केल्या जातात. जपानच्या बांधकाम व्यवसायामध्ये अधिक मजबूत इमारत कोण बांधणार याची स्पर्धा असते. यासाठी हे व्यावयायिक अनेक शास्त्रज्ञांना घराच्या बांधकाम साहित्यावर प्रयोग करण्यासाठी मोठे आर्थिक योगदान देतात. यासर्वातून जी घरे जपानमध्ये बांधली गेली आहेत, आता त्यातील तंत्रज्ञानाचा प्रचार अन्य देशांमध्येही होत आहे. जपानमध्ये 1923 मध्ये 7.9 तीव्रतेचा भूकंप आला होता. या भूकंपामुळे टोकियो आणि योकोहामा उद्ध्वस्त झाले. त्यानंतर जपाननं या भूकंपामुळे होणा-या मनुष्यहानीला टाळण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले. आज टोकियोमधील स्कायट्री टॉवर ही जगातील दुसरी सर्वात उंच इमारत आहे. ती याच तंत्रज्ञानावर आधारीत आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics