Home » प्रगत देशात मतदान कसे होते ?

प्रगत देशात मतदान कसे होते ?

by Team Gajawaja
0 comment
America Voting
Share

जगातील सर्वात प्रगत देश म्हणून मिरवणा-या अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुका येत्या 5 नोव्हेंबरला होत आहेत. दर चार वर्षांनी अमेरिकेत ही निवडणूक प्रक्रिया होते. तंत्रज्ञानात पुढे असलेल्या या अमेरिकेतील ही निवडणूक मात्र कुठल्याही मशीन किंवा एव्हीएमच्या आधारे होत नाही. तर बॅलेट पेपरच्या आधारे होते. निवडणूक जरी 5 नोव्हेंबर रोजी होणार असेल तरी आता अमेरिकेच्या काही राज्यात मतदानाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. एकूण या देशातील हे मतदान आणि त्यानंतर अध्यक्षांची निवड कशी होते, हे जाणून घेऊयात.
अमेरिकेत 5 नोव्हंबर रोजी अध्यक्षीय निवडणूक होत आहे. यात डेमोक्रेटिक पक्षातर्फे कमला हॅरिस तर रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प या दोघांमध्ये ही लढत होणार आहे. या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरुवातीला डेमोक्रेटिक पक्षातर्फे विद्यमान अध्यक्ष जो बिडेन यांचेच नाव पुढे होते. मात्र बिडेन यांचे वय आणि आजारपण पाहता त्यांनी 21 जुलै रोजी या निवडणुकीतून माघार घेतली आणि 5 ऑगस्टला कमला हॅरिस यांचे नाव पुढे आले. (America Voting)

हॅरिस यांचे नाव नक्की झाल्यावर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना कडवे आव्हान मिळणार हे निश्चित झाले. कारण बिडेन यांचे अनेक निर्णय वादाचे ठरले होते. त्याउलट ट्रम्प यांचे धोरण अमेरिकेतील युवा पिढीला आकर्षित करणारे आहे. सध्याच्या निवडणूक वातावणावरुन या दोन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर होणार हे नक्की आहे. सध्या यूएस सिनेट, हाऊस, गव्हर्नर आणि राज्य विधानमंडळांच्या निवडणुकांसोबत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत. अध्यक्षीय निवडणुकीसाठी प्रमुख राज्यांमध्ये ऍरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. तर निवडणुकीमध्ये परराष्ट्र धोरण, इमिग्रेशन, हवामान आणि आरोग्य सेवा सारखे मुद्दे मुख्य आहेत. (International News)

ट्रम्प आणि हॅरिस यांच्यातील जो उमेदवार विजयी होईल, ते अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज हाती घेतील. अर्थात भारताच्या तुलनेत अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ चालणारी असते. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियात ‘इलेक्टोरल कॉलेज’ या शब्दाला महत्त्व आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेत याचा उल्लेख आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेची रचना करतांना यासंदर्भात प्रश्न उभा राहिला होता. अमेरिकन संविधान निर्मात्यांचा एक वर्ग अध्यक्ष निवडण्याचा अधिकार अमेरिकन संसदेला असावा या बाजूने होता. दर दुसरा गट जनतेच्या थेट मतदानाद्वारे अध्यक्ष निवडून यावा यासाठी आग्रही होता. या वादात ‘इलेक्टोरल कॉलेज’ हा या दोन गटांच्या अपेक्षांमधील दुवा मानला गेला. (America Voting)

भारतात किती पक्ष आहेत हा संशोधनाचा विषय ठरतो. मात्र अमेरिकेत दोन पक्ष आहेत. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक. या पक्षातील अध्यक्ष बनण्याची इच्छा असलेले उमेदवार प्रथम एक समिती तयार करतात. त्यातून निधी संकलन करण्याचे मोठे काम होते. साधारण दोन वर्ष आधी हे संकलन करण्यात येते. त्यातूनच जनमानस कुठल्या बाजुला आहे, याचा अंदाज लावण्यात येतो. यानंतर अमेरिकेतील 50 राज्यांचे मतदार पक्षाचे प्रतिनिधी निवडतात. राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर बैठका घेऊन ही निवड होते. हे प्रतिनिधी दुसऱ्या फेरीत पक्षाच्या अधिवेशनात सहभागी होतात आणि पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड करतात. मग राष्ट्रपती पदाचा उमेदवार त्याच्या पक्षातून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असेल हे जाहीर करतो. तिसरी फेरी अधिक महत्त्वाची असते. आपण डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील वादविवादांबद्दल ऐकले असेल. ही वादविवाद फेरीच पुढचा टप्पा असतो. (International News)

======

हे देखील वाचा :  अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !

======

यात मतदारांचा कौल कुठे असेल हे ठरले जाते. मग निवडणुकीची अंतिम प्रक्रिया चालू होते. यात अध्यक्षपदासाठी ‘इलेक्टोरल कॉलेज’ मतदान होते. शिवाय राज्यांचे मतदार एक किंवा दुसऱ्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा समर्थक असलेल्या मतदाराची निवड करतात. हे मतदार एक ‘इलेक्टोरल कॉलेज’ बनवतात, ज्यामध्ये एकूण 538 सदस्य असतात. हेच ‘इलेक्टोरल कॉलेज’चे सदस्य मतदानाद्वारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. सर्वशक्तीमान अमेरिकेचा राष्ट्रपती होण्यासाठी किमान 270 इलेक्टोरल मतांची गरज असते. यात प्रत्येक राज्यातील मतदारांचा कोटा निश्चित असतो. यातून जे अध्यक्ष निवडले जातील ते 8 जानेवारी 2025 रोजी अधिकृतपणे शपथ घेणार आहेत. एकूण अमेरिकेची मतदान प्रक्रिया थोडी जटील असली तरी भावी अध्यक्ष कोण याचा अंदाज आधीच अभ्यासकांना काढता येतो. त्यातून तेथील ध्येयधोरणे ठरवली जातात. (America Voting)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.