आपल्या देशात प्रत्येक सणाला महत्त्व आहे आणि त्यामागे आरोग्यदायी दृष्टीकोन आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आवळा नवमी साजरी (Avla Navami Celebration) केली जाते. या आवळा नवमीलाही असेच आरोग्यदायी महत्त्व आहे. याला अक्षय नवमी किंवा कुष्मांडा नवमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यात येते. या तिथीला भगवान विष्णूने कुष्मांड राक्षसाचा वध केला. याचदिवशीपासून आवळ्याचे सेवन करण्याचीही प्रथा आहे. आवळा हे फळ थंडीची चाहूल लागल्यावर बाजारात विकायला येते. साधारण पुढचे तिन महिने ताजे आवळे बाजारात मिळतात. हे आवळे म्हणजे आरोग्यासाठी वरदान आहे. यामध्ये सी व्हिटॅमीनचा भरपूर साठा असल्यानं एक आवळा रोज खाल्ला तरी केसांपासून पोटापर्यंतच्या सगळ्या समस्या दूर होतात.

भारतीय आहार पद्धतीही आरोग्यदायी आहारपद्धती आहे. प्रत्येक ऋतुमध्ये येणा-या फळाचे महत्त्व सांगण्यात आले आहे, आणि त्याचा आहारात समावेश करण्यात आला आहे. तसेच एक चवीला आंबट आणि तुरट फळ म्हणजे आवळा. हे छोटे, हिरव्या रंगाचे आवळे रोज खाल्ले तर अनेक आजारांना आपसूकच दूर सारले जाते. हे आवळे नेमके कधी खावेत..त्यासाठी आवळा नवमी दिवस साजरा (Avla Navami Celebration)केला जातो. याच मुहूर्तावर आवळ्याचा रोजच्या आहारात समावेश केला जातो. काही ठिकाणी आवळ्याच्या झाडाची पूजाही करतात आणि तेव्हा घरी आवळ्याचा वापर केलेले खाद्यपदार्थ बनवले जातात. याचा भगवान विष्णुला नैवेद्य दाखवून मग सर्व कुटुंब त्यांचे सेवन करते. नेहमीच्या आहारात आवळ्याचा समावेश असल्यावर त्याचा किती फायदा होतो, हे कळल्यावर तुम्ही सुद्धा नित्यनियमानं आवळा खायला सुरुवात कराल. खरे तर आवळा नवमीकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर या दिवशी आवळ्याच्या झाडाची पुजा केली जाते. त्यामागे आयुर्वैदिक दृष्टिकोनही आहे. आवळा हे फळापेक्षा औषध मानले जाते. त्याचे सेवन अमृतासारखे आहे. या बदलणा-या ऋतूमध्ये आणि येणा-या थंडीच्या मौसमात आवळ्याचे सेवन सुरु केल्यास पुढचा सगळा ऋतुकाळ उत्तम आरोग्याचा जातो असे सांगितले जाते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळ्याच्या सेवनाने केस आणि त्वचाही सुंदर होते. त्याचबरोबर पचनसंस्थाही निरोगी राहते. आवळा हे तंतुमय फळ असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, आवळ्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. तसेच पोटाशी संबंधित असलेले अनेक विकार दूर करण्यासाठी आवळा हे सर्वात पौष्टिक फळ असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात आवळा म्हणजे भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला खजिनाच म्हणावा लागेल.
===========
हे देखील वाचा : थंडाव्यात मेथीच्या लाडवाची गोडी….
===========
आवळा नियमीत सेवन केल्यास शरीराचे शुद्धीकरण करण्यास मदत होते. यामध्ये असलेले पौष्टिक घटक आपल्या शरीरातील घातक घटक नैसर्गिकरित्या काढून टाकण्यास मदत करतात. आवळ्याचे सेवन केल्यास युरिन इन्फेक्शनपासून बचाव होतो. ज्यांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी आवळ्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.आवळ्याचे सेवन केले तर रोजच्या भोजनाचे पचन चांगले होते. तसेच शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. आवळा हे असे फळ आहे, की त्यामधील व्हिटॅमीन सी कधीही संपत नाही. आवळा हा कच्चा खातात, त्यासोबत वाफवलेला आणि सुकलला आवळाही खाल्ला जातो. जेव्हा आवळा मिळत नाही, तेव्हा आवळ्याची पूडही जेवणात वापरली जाते. पण कशाही प्रकारे आवळा खाल्ला तरी त्यातील उपयोगी गुणधर्म कमी होत नाहीत. (Avla Navami Celebration)
त्यामुळे कशाही प्रकारे आवळ्याचे सेवन हे फायदेशीर ठरते. आवळ्याचे सतत सेवन केल्याने दृष्टी सुधारते. केस काळे राहतात. आवळ्याची पावडर केसांना लावल्याने केस लांब, दाट आणि सुंदर होतात. केस काळे करण्यासाठीही आवळा फायदेशीर आहे. लोखंडी कढईत रात्रभर भिजत ठेवलेली आवळा पावडर केसांना लावल्यास केसांची पोत सुधरण्यास मदत होते. केस काळे होतात, शिवाय त्यातील कोंडाही दूर होतो. एकूण काय आवळा हे एक पूर्ण फळ आहे. आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळेच अगदी पद्मपुराणातही आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आहारात आवळ्याचे नियमीत सेवन केल्यानं आरोग्य सुधारते. थंडीच्या मौसमात येणारे हे फळ त्यामुळेच अमृतफळ म्हणूनही ओळखले जाते.
सई बने