१४ जानेवारी १७६१ मराठ्यांच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस… महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या पानिपताच्या रणसंग्रामात पडल्या. त्यावेळी सर्वांना वाटलं होतं की, इतकं बलाढ्य साम्राज्य आता नक्कीच कोलमडून पडणार. त्यात ब्रिटीशांची कुरघोडी सुरूच झाली होती. मात्र अशावेळी एक मराठा सरदार असा पेटून उठला, ज्याने पानिपताचा बदला तर घेतलाच पण यासोबतच दिल्लीसुद्धा काबीज केली. त्यांचं नाव होतं, अलिजा बहाद्दर… महादजी शिंदे (Mahadaji Shinde) ! त्यांचा दरारा इतका होता की, त्यावेळी दक्षिण आशियातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून महादजी यांच्याकडे पाहिलं जायचं. या ‘द ग्रेट मराठा’ (The Great Maratha) बद्दल जाणून घेऊ.
शिंदे घराण आजही ग्वालियरमध्ये राजेशाही थाटात राहतं. या घराण्याची सुरुवात राणोजी शिंदे यांनी केली होती. यांचे पाच पुत्र म्हणजे जयाप्पाजी राव शिंदे, दत्ताजी राव शिंदे, ज्योतिबा राव शिंदे, तुकोबा राव शिंदे आणि महादजी शिंदे…! पानिपतच्या तिसऱ्या युद्धात शिंदेंची अख्खी पिढी गारद झाली. पण त्यांचा एक वारस अजूनही जिवंत होता, ते म्हणजे महादजी… मुळात महादजी यांनी तळेगाव-उंबरीची लढाई, बेळूरची लढाई संभाजीनगर, साखरखेडले, पंजाब, मालव, राजपुताना, बुंदेलखंड, रोहिलखंड, फतेहाबाद अशा अनेक मोहिमा गाजवल्या होत्या. १७४५ ते १७६१ हा मराठ्यांचा राज्य विस्तारातला सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात महादजी शस्त्रविद्येत पारंगत झाले. पानिपतच्या लढाईतही त्यांचा सहभाग होता आणि ते जखमीसुद्धा झाले होते. कसे-बसे आपला जीव वाचवून ते ग्वालियरमध्ये आले आणि पानिपतचा बदला घेण्याची आणच घेतली. (Mahadaji Shinde)
पानिपतच्या युद्धानंतर पेशवेपदावर थोरले माधवराव आले. त्यांनी महादजींना १७६८ साली सरदारकी दिली. यानंतर १७७० ते ७१ दरम्यान महादजी विसाजीपंत बिनीवाल, रामचंद्र कानडे, सरदार तुकोजी होळकर आणि आपल्या सेनेसोबत दिल्लीकडे निघाले. त्यावेळी राजस्थानमध्ये राजपूत राजांनी उठाव केला होता. मथुरा – भरतपूर (Mathura – Bharatpur) येथील जाट राजांनीही बंडखोरी केलेली होती. ती महादजी यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी दिल्लीकडे कूच केलं. त्यावेळी मुघल बादशाह दिल्लीमध्ये नाममात्र होता. कारण ही सल्तनत पूर्णपणे खिळखिळी झाली होती. याचा फायदा उचलून रोहील्यांनी दिल्ली हाकायला सुरुवात केली आणि नजीबखान रोहील्याचा मुलगा झाबेता खान (Zabita Khan) हा दिल्लीचा कारभार बघत होता. याच झाबेता खानवर हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला.(History)
दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलमने 1770 च्या सुमारास दिल्लीतून पळ काढला होता आणि तो बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल्ल्यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी अशी विनंती शाह आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर त्यावेळी मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला सोडवलं. यानंतर मराठ्यांनी शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला. बिनीवाले आणि कानडेंच्या सोबतीने महादजींनी झाबेता खानला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला. महादजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला आणि शाह आलमलाच दिल्लीच्या गादीवर बसवलं. (Mahadaji Shinde)
यानंतर महादजी (Mahadaji Shinde) आणि तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पानिपत, शामली हा उत्तरेतला भाग जिंकला. हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, गोजगड हे जिंकत नजीबखानाने तयार केलेली राजधानी नजीबाबादपर्यंत पोहोचले. इथे आणखी एक ऐतिहासिक गोष्ट घडली. ती म्हणजे महादजींनी नजीबखानाची कबरच उखडून टाकली आणि पानिपताचा बदला घेतला. एकेकाळी पानिपतच्या युद्धात आपलं सर्वस्व हरवलेले मराठे पुन्हा एकदा उत्तरेत आपला दरारा पसरवू लागले. यावेळी झाबेताखानने फत्तरगडाच्या खंदकात लपवलेली ३० लाखांची लूटसुद्धा मराठ्यांना मिळाली. महादजी शिंदेंकडे सशस्त्र सैन्याचं आधुनिकीकरण करणारा सेनापती म्हणूनही पाहिलं जातं. (Mahadaji Shinde)
============
हे देखील वाचा : नाहीतर Vicky Kaushal ने औरंगजेबांची भूमिका साकारली असती !
============
आपल्या सैन्यात मराठ्यांसोबत उत्तरेतले सैनिकसुद्धा असावेत, असं महादजी (Mahadaji Shinde) यांना वाटायचं त्यामुळे त्यांनी उत्तरेत सैन्य भरतीच सुरु केली. महादजी यांच्या सैन्यात फ्रेंच अधिकारीसुद्धा होते. सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं. त्यावेळी महादजी यांच्या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्रं होती. आपल्या उत्तर हिंदुस्तानातल्या वास्तव्यादरम्यान महादजी जवळपास १४ वर्ष मथुरेत होते. इथूनच महादजी यांना प्रसिद्धी मिळू लागली. ब्रिटिशांनीही त्यांना ‘द ग्रेट मराठा’ ही पदवी दिली होती. याशिवाय मेहरबान श्रीमंत सरदार शिंदे बहादर, नाईब वकील ए मुतालिक, अमीर-ऊल-उमरा, महाराजा ऑफ ग्वालियर, हिसम-अस-सल्तनत आणि अलिजा बहादर अशा अनेक पदव्या मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे महादजी यांची मर्जी राखायची म्हणून शाह आलम बादशाहने संपूर्ण भारतात गोहत्या न करण्याचा फर्मान काढला. (Mahadaji Shinde)
त्यावेळी त्यांची ताकद इतकी वाढली होती की त्यांना दक्षिण आशियातले सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखलं जायचं. युद्धभूमी सोडली तर महादजी हे उत्तम कवीदेखील होते. ते मराठी व हिंदी भाषांत कविता करत होते. याशिवाय त्यांनी भागवत पुराणही लिहीलं होतं. पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग रचले. इतकी वर्ष दिल्लीमध्ये वास्तव्य केल्यानंतर महादजी शिंदे १७९२ साली पुण्याला परतले. यानंतर वानवडीमध्येच १२ फेब्रुवारी १७९४ साली महादजी यांचं ज्वरामुळे निधन झालं. एकेकाळी मराठेशाहीची अत्यंत दयनीय अवस्था असताना मात्र महादजी शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा थेट दिल्लीपर्यंत पोहोचवल्या.