Home » वाळवंटाचे गाव कसे झाले जगातील सर्वोत्तम गाव

वाळवंटाचे गाव कसे झाले जगातील सर्वोत्तम गाव

by Team Gajawaja
0 comment
Best Village
Share

गुजरातमधील एक वाळवंटी गाव.  लोकसंख्या अगदी दोनशेच्या आसपास.  गाव पाकिस्तानच्या सीमेजवळ.  त्यामुळे विकासाची वाणवा.  मात्र या गावातील गुलबेग मियॉं यांना गावात रण उत्सव सुरु करण्याची कल्पना सुचली.  ही कल्पना त्यांनी लगेच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कानी घातली.  नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यानं या वाळवंटी गावात रण महोत्सव सुरु झाला.  बघता बघता गावात सुविधा येऊ लागल्या.  पर्यटन वाढलं.  परदेशी पर्यटक रण महोत्सव  बघण्यासाठी येऊ लागले.  पर्यटन वाढल्यानं स्थानिकांना रोजगार मिळाला.  आर्थिक प्रगती झाली.  त्यासोबत वाळवंट असलेल्या गावात सुविधांचा सुकाळ झाला.  आता गुजरात कच्छमधील धोर्डो गाव जगातील सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक गाव म्हणून गौरवण्यात आले आहे.  या गावाला आता जागतिक ओळख मिळाली आहे.  (Best Village)

जागतिक पर्यटन संघटनेने गुजरातमधील धोर्डो गाव हे उत्कृष्ट गाव म्हणून घोषित केले.  जागतिक पर्यटन संघटनेने जाहीर केलेल्या 54 उत्कृष्ट पर्यटन गावांच्या यादीत धोर्डो गावाचा समावेश आहे.  यानंतर धोर्डो गाव कसे आहे, हे बघण्यासाठी नेटक-यांच्या उड्या पडू लागल्या आहेत. या गावाचे फोटो बघितल्यावर असे कुठले गाव भारतात आहे, याची आणखी चौकशी सुरु झाली आहे.  धोर्डो गावचा हा बदल झाला तरी कसा हे जाणण्यासारखे आहे.  (Best Village)

धोर्डो जगाच्या नकाशावर येण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाते. त्यासोबत धोर्डो गावातील गुलबेग मियाँ यांना जाते.  गुलबेग मियाँ यांनी या गावात रण उत्सव सुरु करण्याचे स्वप्न पाहिले. त्यांचा मुलगा मियां हुसैन यांनी वडिलांची इच्छा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुलबेग मियाँ यांच्या सूचनेची अंमलबजावणी केली.  त्यासोबत धोर्डो गावाचा विकास सुरु झाला. आता धोर्डो गावात गुलबेग मियाँ यांचे स्मारक आहे. त्यांचा मुलगा मियां हुसेन हा या गावचा सरपंच आहे.  धोर्डो गावात गुलबेग मियाँ यांच्या कुटुंबियांना प्रचंड मान आहे.  हेच गाव आता जगाच्या नकाशावर अग्रस्थानी आहे.  विशेष म्हणजे, याच धोर्डो गावात G20 च्या पहिल्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे आयोजनही झाले होते.   

गुजरातच्या विकासाचा चेहरा आणि पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेले धोर्डो गाव बघण्यासाठी आता हजारो पर्यटक जात आहेत.  धोर्डो हे कच्छ जिल्ह्यात वसलेले आहे.  भुजपासून सुमारे 86 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात जाण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.  धोर्डो गावात हिवाळ्यात मिठ तयार होते.  पांढऱ्या मिठामुळे वाळवंटातील या गावाला आगळे सौदर्य प्राप्त होते. आता याच गावात गुजरात सरकार दरवर्षी रण उत्सव आयोजित करते. (Best Village)

काही वर्षापूर्वी धोर्डो गावात घरांची संख्या अगदी शंभर पर्यंत होती. हे गाव इतके छोटे होते, की गुजरातमधीलही अनेकांना त्याची माहिती नव्हती.  शिवाय गाव पाकिस्तानच्या बॉर्डरवर असल्यामुळे या गावची लोकसंख्या अगदी मोजकी होती.  पण रण महोत्सवामुळे गावाचा सर्व चेहरा बदलून गेला.  धोर्डो गावात रण उत्सव सुरु झाला आणि आवश्यक पायाभूत सुविधा आल्या.  या गावात पारंपरिक भुंगा म्हणजेच गोलाकार घरे आहेत.  ही गोलाकार घरेच पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत. (Best Village)  

90 च्या दशकात दिवसभराचा रण उत्सव या गावात होत असे.  मात्र  2008 मध्ये तंबूत उत्सव सुरू झाला. गुलबेग मियाँ यांचा मुलगा मियां हुसैन हा या उत्सवासाठी मेहनत घेत आहे.  या उत्सवात गावातील महिलांनी केलेल्या कलावस्तु अग्रस्थानी असतात. डिसेंबर ते फेब्रुवारी असे तीन महिने हा उत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात पर्यटकांची मोठी गर्दी असते.  त्यात परदेशी पर्यटकांची संख्या मोठी असते.  याच रण महोत्सवानं या धोर्डो गावाला नवी दिशा दिली. आता वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) ने 2023 मधील उत्कृष्ट पर्यटन गावांमध्ये धोर्डोचा समावेश केला आहे.

============

हे देखील वाचा : ‘या’ मंदिरात फुलांप्रमाणे निखारे अंगावर उडविले जातात

============

 सांस्कृतिक विविधता, स्थानिक मूल्ये आणि खाद्य परंपरा जपणाऱ्या गावांना हा सन्मान दिला जातो.  2021 पासून अशा सुंदर गावांची यादी जाहीर होत आहे.  त्याअनुशंगानं ग्रामीण भागात पर्यटनाला चालना देण्याचे काम सुरु आहे.  यावर्षी या पुरस्कारासाठी 260 अर्ज आले होते.  त्यापैकी 54 गावांची निवड करण्यात आली.  धोर्डो व्यतिरिक्त, चिलीमधील बरांकास, जपानमधील बे, स्पेनमधील कांतावेजा, इजिप्तमधील दाशूर, कोरिया प्रजासत्ताकमधील डोंगबीक, लेबनॉनमधील डौमा, पोर्तुगालमधील एरिकेरा,आणि कोलंबियातील फिलांडिया या गावांचाही समावेश पर्यटनासाठी सर्वोत्तम गावांच्या यादीत करण्यात आला आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.