Home » अयोध्येत हॉटेल उद्योगाची भरभराट…

अयोध्येत हॉटेल उद्योगाची भरभराट…

by Team Gajawaja
0 comment
Ayodhya
Share

राम नगरी अयोध्येत (Ayodhya) पर्यटकांची संख्या वाढती आहे. सध्या अयोध्येत दरवर्षी 2 कोटी भाविक भेट देतात. पुढच्या वर्षी राममंदिर पूर्ण झाल्यावर ही संख्या दुपट्टीनं वाढणार आहे आणि या राममंदिराचा 2025 मध्ये संपूर्ण विकास झाल्यावर पर्यटकांच्या संख्येत चौपट वाढ होण्याची अपेक्षा आहे. धार्मिक पर्यटन वाढल्यामुळे आणि आवश्यक त्या सुविधा मिळाल्यामुळे पर्यटकांची संख्या सातत्यानं वाढत आहे. या येणा-या पर्यटकांमध्ये परदेशी पर्यटकांची संख्याही वाढली आहे. अशा पर्यटकांना सर्व सुविधायुक्त हॉटेल देण्यासाठी आता अयोध्येत स्पर्धा सुरु झाली आहे. अयोध्येत (Ayodhya) आता अनेक मोठे ग्रुप हॉटेल उभारणीसाठी पुढे येत असून या स्पर्धेमुळे भाविकांचा फायदा होईल असा कयास आहे.  

धार्मिक पर्यटन वाढल्याने सध्या अयोध्येचे आकर्षण वाढले. त्यातच राममंदिर भक्तांना खुले कधी होणार ही तारीख जाहीर झाल्यानं येथे पर्यटकांची संख्या अधिकच वाढली आहे.  या भाविकांना आता पंचतारांकित हॉटेल राहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.  अयोध्येत ताज, रॅडिसन आणि आयटीसी हॉटेलसारखे प्रमुख पंचतारांकित ब्रँड, तर ओयो सारख्या स्वस्त हॉटेल्ससह, मोठ्या संख्येने कंपन्या हॉटेल्स उघडण्यासाठी उत्सुक आहेत. या सर्व हॉटेल मिळून अयोध्येत 25,000 हजार खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध होतील अशी आशा आहे. दरवर्षी अयोध्येत (Ayodhya) येणा-या 2 कोटीहून अधिक भाविकांसाठी या पंचतारांकित हॉटेलमधील खोल्यांचा उपयोग होणार आहे.  

अयोध्येत (Ayodhya) सध्या मोठ्या हॉटेलची कंपन्यांची स्पर्धा लागली आहे. त्यात इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड, टाटा समूहाची हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपनी आघाडीवर आहे.  या कंपन्या दोन भव्य हॉटेल उभारणीसाठी प्रयत्न करीत आहेत.  याशिवाय  आयटीसी हॉटेल्स देखील अयोध्येत हॉटेल उभारत आहे.  मुख्य म्हणजे, अयोध्येत येणा-या राम भक्तांचा ओघ हा दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यामुळे आणखी दर्जेदार हॉटेल आली तरी त्यांना फायदाच होणार आहे.  कारण अयोध्येत भाविक ठराविक महिन्यात येतात असे नाही तर येथे बारा महिनेही भाविकांची गर्दी होत असल्याचे आढळून आले आहे.  जानेवारी 2024 मध्ये श्री राममंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आल्यावर ही गर्दी अधिक वाढणार आहे.  अयोध्या मास्टर प्लॅन-2031 अंतर्गत, 2031 पर्यंत, दरवर्षी 40 दशलक्ष लोक तेथे येणे अपेक्षित आहे.  त्याअनुशंगानं भाविकांसाठी अन्य सोयी सुविधा उभारण्यावरही भर देण्यात येत आहे.  त्यात हॉटेल व्यवसाय अधिक तेजीत असल्याचे सांगण्यात येते.  

हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म OYO ने अयोध्या विकास प्राधिकरण आणि उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या सहकार्याने 2023 मध्ये अयोध्येत जवळपास 50 नवीन मालमत्ता जोडण्याची योजना आखली आहे. यामध्ये 25 होम स्टे आणि 25 लहान आणि मध्यम आकाराची हॉटेल्स असतील.  त्यामुळे अयोध्येत येणा-या सर्वसामान्य रामभक्तांनाही रहाण्याची चांगली व्यवस्था उपलब्ध होणार आहे.  

याशिवाय अयोध्येत (Ayodhya) रिअल इस्टेट अँड डेव्हलपमेंटतर्फेही भव्य हॉटेल उभारण्यात येणार आहे.  आयएचसीएलने अयोध्येतील दोन नवीन मालमत्तांचे व्यवस्थापन करण्यासाठी करार केला आहे. यामध्ये विवांता ब्रँड अंतर्गत 100 खोल्यांचे हॉटेल आणि आणखी 120 खोल्यांचे जिंजर हॉटेल समाविष्ट आहे.  ही हॉटेल्स काही महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

अयोध्येतील या बहरलेल्या हॉटेल व्यवसायला पूरक येथील वातावरण होत आहे.  परदेशी पर्यटकांची ओघ सध्या अयोध्येत वाढला असून अयोध्येत उभारण्यात येणारी धावपट्टी पूर्ण झाल्यावर ही संख्या अधिक वाढेल असे सांगण्यात येते.   अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. धावपट्टीचे 90% आणि टर्मिनल इमारतीचे 75% काम पूर्ण झाले आहे. कंट्रोल टॉवर तयार आहेत. जुलैपर्यंत विमानतळाचे बांधकाम पूर्णत्वास जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  याशिवाय विमान उड्डाणाच्या संदर्भात विमानतळ प्राधिकरण एअर इंडियाशी चर्चा चालू आहे.  ऑक्टोबर 2023 पर्यंत अयोध्येतून विमान सेवा सुरु होईल, असा अंदाज आहे.  हे विमानतळ अवध विद्यापीठाजवळ 821 एकर जागेवर विकसित केले आहे.  

=======

हे देखील वाचा : शाही घराण्यातून येते ‘ही’ अभिनेत्री!

======

या विमानतळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते श्री रामजन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात येत आहे. विमानतळाची मुख्य इमारतही राम मंदिराप्रमाणे असणार आहे. विमानतळाची मुख्य इमारत राजस्थानमधील बनशी पहारपूर येथील दगडांनी बांधली जाणार आहे.  याच महिन्यापासून विमानतळाच्या पासून दगडी बांधकामाला सुरुवात झाली आहे.  या विमानतळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे  नाईट लँडिंगसाठी धावपट्टीही होणार आहे. अशा अनेक सुविधा अयोध्येत सध्या करण्यात येत आहेत.  पर्यायानं येथे पर्यटकांचा ओघ वाढत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.