न थांबणाऱ्या पावसामुळे आला महापुर पहिल्या मजल्यापर्यंत साचलं पाणी, घरांचं झालयं नुकसान आणि झालीये जीवितहानी. अशा बातम्या प्रत्येक पावसाळ्यात टीव्हीवर पाहायला मिळतातच कारण पावसाळ्यात कुठेना कुठेतरी पावसामुळे पुर येतोच. पण जर १८१४ च्या काळात लंडनमध्ये टीव्ही असते तर त्यावर बातम्या आल्या असत्या की लंडनच्या सेंट गिल्स जिल्ह्यात बिअरचा महापूर आला आहे. या बिअरच्या महापुरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तुम्हाला हे ऐकून विचित्र वाटलं असेल पण लंडनमध्ये १८१४ मध्ये खरंच बिअरचा महापूर आला होता. काय होती ही जगाच्या इतिहासातील अजब आणि मद्यपेयींसाठी सुवर्ण घटना? जाणून घेऊया. (Horse Shoe Brewery Company)
लंडनच्या सेंट गिल्स जिल्ह्यात १७६४ मध्ये हॉर्स शो ब्रुअरी ही बिअर बनवणारी फॅक्टरी स्थापन करण्यात आली. ही फॅक्टरी पोर्टर बिअर बनवण्यासाठी फेमस होती. लंडनमध्ये लोकं बिअर आवडीने पित होते. हॉर्स शो ब्रुअरी या फॅक्टरीमध्ये बिअरचा साठा ठेवण्यासाठी मोठी टाकीही बांधली होती. सुरुवातीला या टाकीची क्षमता १५०० बॅरल म्हणजे दोन ते अडीच लाख लीटर इतकी होती. पण हळू हळू बीअर पिणाऱ्यांची संख्या इतकी वाढली की, हॉर्स शो ब्रुअरी या कंपनीने दरवर्षी १० लाख बॅरलपेक्षा जास्त बिअर तयार करण्यास सुरूवात केली. या कंपनीची बिअर संपूर्ण लंडनमध्ये प्रसिद्ध होती. या कंपनीत बिअरचा साठा करण्यासाठी आता २२ फुट उंच लाकडी टाक्या बनवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये साडे पाच ते सहा लाख लीटर बिअर साठवली जात होती. या टाक्यांना बंद करण्यासाठी ३२० किलोचं लोखंडाच झाकण वापरलं जायचं. (International News)
बिअर बनवणं आणि ती साठवणं हे हॉर्स शो ब्रुअरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी रोजचं काम होतं. १७ ऑक्टोबर १८१४ रोजी सुद्धा हे काम ते करतं होते. तेव्हा एका कामगाराची नजर बिअर साठवण्यासाठी ठेवलेल्या एका टाकीकडे गेली ज्याच झाकण नीट बंद करण्यात आलं नव्हतं म्हणून ते जागेवरुन घसरलं होतं. कामगार याची तक्रार घेऊन फॅक्टरीच्या Supervisor कडे गेला. पण त्या Supervisor ने त्याची तक्रार गांभीर्यने घेतली नाही. उलटं त्याने बिघडलेलं झाकण लवकरच दुरुस्त केलं जाईल अशी सूचना कामगाराला केली. कामगार पुन्हा कामाच्या जागेवर येतो तोच बिअरच्या एका टाकीत विस्फोट झाला आणि त्या टाकीच्या धारेमुळे दुसऱ्या टाक्यांचं सुद्धा नुकसान झालं आणि त्यातून सुद्धा बिअर गळती सुरू झाली. (Horse Shoe Brewery Company)
या फॅक्टरीच्या मागे एक झोपडपट्टी होती. अचानक आलेल्या बिअरच्या लाटेमुळे फॅक्टरीची मागची भिंत पडली आणि त्यामुळे ही बिअरची लाट झोपडपट्टीमध्ये घुसली. भिंत कोसळल्यामुळे १४ वर्षाच्या एलेनॉर कूपरचा मृत्यू झाला. बिअर लंडनच्या रस्त्यावर वाहत होती आणि समोर येणाऱ्या प्रत्येक घराला माणसांना वाहून नेतं होती. या लाटेमध्ये हन्ना बामफील्ड ही मुलगी तिच्या आईसोबत घरासकट वाहून गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. या बिअरच्या लाटा १५ फुट उंच होत्या असं म्हटलं जात. जर हा पूर १-२ तासांनंतर आला असता, तर संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या जास्त लोकांना त्याचा फटका बसला असता. (International News)
======
हे देखील वाचा : तुम्ही चीनचा लसूण खात असाल तर !
======
एका बाजूला बिअरची लाट वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट गिळत चालली होती, आणि दुसऱ्या बाजूला काही लोकं ग्लास, मग, बादल्या भरून बिअर घेऊन जातं होते. जेव्हा हा बिअरचा महापूर ओसरला तेव्हा काळालं की, या दुर्घटनेमुळे ८ जणांचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे या सर्व प्रकरणात कोर्टाने हॉर्स शो ब्रियूअरी या कंपनीला निर्दोष ठरवलं. यासोबतच त्यांनी या घटनेला ‘अॅक्ट ऑफ गॉड’ असं म्हटलं. असं म्हणणं कमीच होतं म्हणून की काय, त्यांनी कंपनीला सरकार तर्फे ७,२५० पौंडांची भरपाई सुद्धा दिली. असा होता हा लंडनमध्ये आलेला वचित्र बिअरचा महापुर. (Horse Shoe Brewery Company)