आपण नुसतं साप म्हटलं तरी भल्या भल्यांची तंतरते, इतका या प्राण्याचा धाक सगळीकडे आहे. बिनविषारी, निमविषारी आणि विषारी अशी सापांची कॅटेगरी ! आपल्या हिंदू धर्मात सापाला प्रचंड महत्त्व आहे. भगवान शिवशंकर यांच्या गळ्यापासून ते अनेक पुराणकथांमध्ये सापांचा उल्लेख आपल्याला मिळतो. साप तसा देशात सगळीकडेच मिळतो. मग त्याचे प्रकार म्हणजेच धामण, दिवड, कवड्या, कुकरी, नानेटी आणि विषारी सापांमध्ये घोणस, फुरसं, नाग, मण्यार हे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पाय नसलेला हा प्राणी सरपटत इतक्या वेगळा धावू शकतो, मग विचार करा त्याला पाय असते तर ? पण सापांना तर पाय होतेच आता यावर तुमचा विश्वास बसला नसेल, पान सापांना खरंच पाय होते. (History Of Snake)
आपल्या पृथ्वीवर एकेकाळी डायनोसॉर या मोठ्या प्राण्यांचं राज्य होतं. पण साडे सहा कोटी वर्षांपूर्वी एक मोठा उल्का पृथ्वीवर आदळला आणि डायनोसॉर समूळ नष्ट झाले. पण याच डायनोसॉर्सच्या मेसोझोईक एरामध्ये काही मोठ्या सरड्यासारखे प्राणीसुद्धा होते, जे वॅरनिडे (Varanidae) या कुळातले होते. म्हणजेच हे पाली, मॉनिटर लिजर्ड किंवा कोमोडो ड्रॅगनसारखे असायचे, ज्यांना बरेच मोठे पाय होते. या कुळातळे प्राणी जवळपास ९-१० कोटी वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात होते आणि याचवेळी त्यांचे पाय गळायला सुरुवात झाली.
त्यांचे पाय गळण्याची दोन कारणं सांगितली जातात, एक म्हणजे उत्क्रांती आणि दुसरं म्हणजे सतत जमिनीवर घासून किंवा बिळात राहून ते गळून पडले. उत्क्रांतीच्या काळातच या सापांनी शिकार करायला सुरुवात केली होती, त्यामुळे शिकार करून करून हे पाय नष्ट झाल्याचं सांगितलं जातं. यानंतर आज जे साप आपण पाहतो, हे त्यांचच आधुनिक रूप आहे. सध्या वॅरनिडे कुळातील एकच चार पायांचा प्राणी हयात आहे, तो म्हणजे मॉनिटर लिजर्ड ! याशिवाय इतर जे प्राणी होते, त्यांचे पाय गळून ते साप झाले असं शास्त्रज्ञ सांगतात. (History Of Snake)
ब्राजीलमध्ये याच प्राण्यांचे जीवाश्म सापडले आहेत, जे जवळपास १० कोटी वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातय. यामध्ये युपोडोफिस, हासियोफिस, पाचारहाचिस आणि नजाश या प्रजाती होत्या, ही सर्व त्यांची सायंटिफिक नावं आहेत. या सापांना आखूड पाय होते आणि त्यांना प्रोटो-स्नेक म्हटलं गेलय. हे सर्व तेव्हाच नामशेष झालेत, पण ते खरंच प्रोटो-स्नेक म्हणजेच आजच्या सापांचे पूर्वज होते का ? याबाबत अजूनही शास्त्रज्ञांमध्ये वाद पाहायला मिळतो.
तशी आपल्या हिंदू धर्मात सापांना पाय असल्याची एखादी पौराणिक कथा मिळत नाही. याउलट एकेकाळी पृथ्वीवर महाकाय साप होते, अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातच नुकतच गुजरातमध्ये एका ५० फुटांच्या सापाचे अवशेष सापडले आहेत, ज्याला वासुकी इंडिकस असं नाव ठेवलय. पण सापांना पाय असण्यासंदर्भात बायबलमध्ये एक गोष्ट ऐकायला मिळते. ती म्हणजे गार्डन ऑफ इडनमध्ये असताना Adam आणि Eve ला सफरचंद खायला सापाने प्रवृत्त केलं. त्यावेळी सापाला पाय होते. यावेळी ईश्वराने सापाला पोटावर रांगण्याचा श्राप दिला आणि अशा प्रकारे सापाचे पाय नष्ट झाले. याव्यतिरिक्त एक चीनी आख्यायिका आहे, त्यात लिहिलंय की, माणसांना त्रास दिल्याबद्दल मिंग साम्राज्याच्या जेड या राजाने सापांना शिक्षा दिली आणि त्यांचे पाय कापून ते बेडकांना खाऊ घातले. (History Of Snake)
तसं आख्यायिकांवर विश्वास ठेवता येणार नाही, कारण सायन्सने अनेक पुराव्यांचा भांडार आपल्यासमोर खुला ठेवलाच आहे. त्यामुळे एकेकाळी पायाने चालता येणारा प्राणी नंतर सरपटायला लागला आणि शेवटी तो साप झाला, हे सिद्ध झालं आहे. मुळात साप हे माणूस जन्माला येण्याच्या अगोदरपासूनच अस्तित्वात होते. सध्या जगात सापांच्या साडे तीन हजारपेक्षा जास्त जाती आहेत. त्यात भारत ३०० च्या वर जाती आहेत आणि यामध्ये काही ठराविक आणि हातावर मोजण्याइतक्याच जाती विषारी आहेत. विचार करा पायांसारखे अवयव नसतानाही सापांची चाल वैशिष्ट्यपूर्ण आणि फास्ट असते.
================
हे देखील वाचा : नागचंदेश्वराचे महात्म्य !
================
आपल्याला असं वाटतं की, आपल्या भारतातच फक्त सापांची म्हणजेच नागदेवताची पूजा केली जाते. पण खरंतर Ancient मेसोपोटॅमिया, प्राचीन ग्रीसमधले Gnosticism मानणारी लोकं, आफ्रिकेतील डांगबी, Ancient इजिप्त, कंबोडियातील ख्मेर साम्राज्य अशी अनेक जण सापांची पूजा करत होते. त्यामुळे साप या प्राण्याला जगभरात वेगळच महत्त्व आहे. पण काळानुसार सापांनाही मारण्याच्या गोष्टी खूप वाढल्या आहेत. आपल्या भारतातच प्रत्येक साप विनाकारण मारले जातात, त्यामुळे ईकोसिस्टम स्टेबल ठेवण्यासाठी अतिशय गरजेच्या असलेल्या साप या प्राण्याला वाचवणं प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. (History Of Snake)